Mango Farming : दुर्गम भातपट्ट्यात आंबा बागेचा प्रयोग

Article by Vinod Ingole : दुर्गम व भाताचा जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील धाबेटेकडी येथील ललित सोनवाणे यांनी पीकबदल साधून एक एकरात केसर आंब्याची लागवड करण्याचा प्रयोग केला आहे.
Mango Farming
Mango FarmingAgrowon

विनोद इंगोले

Mango Orchard Management : विदर्भातील गोंदिया हा दुर्गम तसेच भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील धाबेटेकडी (ता. अर्जुनी मोरगाव) गाव आहे. इडियाटोह प्रकल्पाचे पाणी या भागातील शेतीला मिळते. सिंचन सुविधांमुळे संकरित धानाची (भात) एकरी दोन क्‍विंटलपर्यंत उत्पादन वाढ मिळविण्यात येथील शेतकरी यशस्वी झाले आहेत.

गावातील ललित सोनवाणे हे अल्पभूधारक असून त्यांच्याकडे अवघी तीन एकर शेती आहे. त्यात पारंपरिक धान (भात) घेण्यावरच त्यांचा भर होता. धानाला २१८३ रुपये प्रति क्विंटल हमीभाव असून, व्यापारी १९०० ते २००० रुपये दराने खरेदी करतात. परिणामी, या शेतीतून जास्त काही अपेक्षा राहत नाही. तरीही शेतकऱ्यांनी या पिकाची कास धरून ठेवली आहे.

धान उत्पादकता वाढली, तरी दरांत होणाऱ्या चढ-उतारामुळे अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने पर्यायी पिकाचा शोध ललित यांनी घेण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी पाच वर्षे नाशिक, सांगली, सातारा, पुणे या भागांत जाऊन तेथील शेतकऱ्यांची अर्थकारणाला गती देणाऱ्या व्यावसायिक पिकांची माहिती घेतली.

ग्राहकांकडून कायम मागणी असलेले, पैसा देणारे, तुलनेने कमी मजूरबळ लागणारे व विदर्भातील वातावरणात तग धरणारे पीक म्हणून आंबा हे पीक त्यांना योग्य वाटले. त्यानुसार दोन एकर धान व उर्वरित एक एकर आंबा लागवडीचे नियोजन केले.

Mango Farming
Kesar Mango Management : केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

अभ्यास व लागवड नियोजन

ललित यांचा अभ्यास दौऱ्यात आंबा बागायतदारांशी संपर्क आला होताच. त्यातूनच पुणे, पिंपरी-चिंचवड भागांत आंब्याच्या विविध जाती घेतलेल्या एका आंबा बागायतदाराशी संपर्क होऊन त्यांच्याकडे जाणे झाले. एकदिवसीय प्रशिक्षण घेतले.

इस्राईल तसेच एकूणच आंबा लागवडीविषयी यू-ट्यूब व अन्य सोशल मीडियाद्वारे अतिसघन व अन्य लागवड पद्धतींचाही अभ्यास केला. सोबतच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांच्या संपर्कातही ललित होते. त्यातून शास्त्रोक्‍त आंबा बाग व्यवस्थापनाचे तंत्र जाणून घेतले.

लागवडीपूर्वी धान बांधाचे ‘जेसीबी’च्या साह्याने सपाटीकरण करून घेतले. प्रामुख्याने केसर व दशहरी या जातींच्या आंबा वाणांची लागवड जुलै २०१९ मध्ये केली. दहा बाय चार फूट या पद्धतीने एका एकरात सुमारे एक हजार झाडांचे व्यवस्थापन सुरू केले आहे.

व्यवस्थापनातील बाबी

आसोला (ता. लाखांदूर, जि. भंडारा) येथील शासकीय रोपवाटिकेतून रोपांची खरेदी केली. त्यातील ९५ टक्के रोपे जगली आहेत. सुरुवातीपासूनच सेंद्रिय खतांच्या वापरावर सर्वाधिक भर दिला. घरच्या दोन देशी गायी, म्हैस अशी चार जनावरे आहेत. त्यांच्या शेण-गोमूत्रापासून जिवामृत तयार केले जाते.

पाण्यासाठी बोअरवेल, कॅनॉलची सुविधा असून, ठिबक सिंचन केले आहे. जूनमध्ये बागेची छाटणी केली जाते. बाग नवी असताना त्यात आल्याचे आंतरपीक घेतले. त्यातून तीन टन उत्पादन घेऊन किलोला ७० रुपये दराने विक्री केली. त्यातून दोन लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्नदेखील मिळवले.

बागेत परागीकरणाला प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने नागपूर येथील वनामती येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित दहा दिवसांचे मधमाशीपालन प्रशिक्षण घेतले. दहा पेट्या अनुदानावर मिळाल्या. परंतु या भागात असलेला एक पक्षी हवेतच मधमाश्‍या खाऊन टाकतो. परिणामी, मधमाश्‍याची संख्या कमी होत गेल्याने मधपेट्या बागेत ठेवण्याचा प्रयोग फसला. मात्र निराश न होता व्यवस्थापनात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरूच आहे.

Mango Farming
Mango Orchard Management : निर्यातयोग्य केसर आंबा उत्पादनासाठी करावयाची कामे

विकसित केली बाजारपेठ

सन २०२२ मध्ये बागेचे उत्पादन सुरू झाले. त्या वेळी एकूण बागेतून दीड टन उत्पादन मिळाले. व्यापारी, मध्यस्थ यांना आंबा न देता थेट ग्राहकांनाच सर्व विक्री करायची असेच ठरविले होते. त्यानुसार बाजारपेठ मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला. आंबा बागायतदारांच्या विविध व्हॉट्‍सॲप ग्रुपवर ललित आहेत.

तसेच ग्राहकांचे नेटवर्कही वाढवण्यास सुरुवात केली. बागेतील आंब्याची छायाचित्रे पाहून ग्राहक त्यांना संपर्क करू लागले. पहिल्या उत्पादनाला ८० ते १०० रुपये प्रति किलो दर मिळाला. मोरगाव अर्जुनी या तालुक्‍याच्या ठिकाणी ललित यांचे भागीदारीत कृषी सेवा केंद्र आहे.

तेथेही आंबा विक्रीस ठेवला. शिवाय मित्राच्या ‘जनरल स्टोअर्स’मध्ये उपलब्ध केला. या सर्व प्रयत्नांमधून संपूर्ण म्हणजे दीड टनांपर्यंत आंब्याची विक्री झाली.

पुढील प्रयत्नही यशस्वी

सन २०२३ मध्ये चार टन आंबा उत्पादन झाले. पहिल्याप्रमाणे बाजारपेठ मिळवण्याचा हा दुसरा प्रयत्नदेखील यशस्वी झाला. नागपूरसह विविध ग्राहकांना ‘ट्रॅव्हल बस’च्या माध्यमातून पुरवठा करण्यात आला. बाजारात ६० ते ७० रुपये प्रति किलो दर असताना थेट विक्रीमुळे १०० ते १२० रुपये दर मिळवता आला.

यंदा बहुतांश झाडांना फळांचे ‘सेटिंग’ चांगली असून, १० ते ११ टन उत्पादनाची व उत्पन्नाचीही अपेक्षा आहे. तालुका परिसरात आंबा बागेचा ललित यांचा हा पहिलाच प्रयोग असावा. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनाही या फळबागेसाठी प्रेरणा मिळाली आहे.

ललित सोनवाणे ९८३४८७२५२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com