Sweet Potato : नवरात्रीला ‘शाहूवाडी’ रताळ्यांचा गोडवा

Sweet Potato Rate : नवरात्रीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात रताळे काढणीस वेग आला आहे. या कालावधीमध्ये तालुक्यातील रताळ्याला राज्यभरातून मोठी मागणी असते.
Sweet Potato
Sweet PotatoAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका हा दुर्गम आहे. तालुक्यामध्ये खरीप पिकांबरोबरच अनेक गावांमध्ये रताळ्याची लागवड केली जाते. नवरात्र ते दिवाळीच्या दरम्यान रताळे पिकापासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी रताळ्याच्या लागवडीत गुंतलेले असतात.

गणेशोत्सव झाला की रताळ्याच्या काढणीचे वेध लागतात. गणेशोत्सव ते नवरात्र हा रताळ्याचा मुख्य हंगाम. या काळात रताळ्याला चांगले दर मिळतात. शाहूवाडी तालुक्यात प्रामुख्याने भात, ऊस लागवड आहे. गेल्या वीस वर्षांपासून रताळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पेरीड, कडवे, निनाई परळे, आळतूर, निळे, करुंगळे,भोसलेवाडी, शाहूवाडी, चनवाड, वाळूर, कासार्डे या परिसरांतील रताळी लागवड मोठ्या प्रमाणात आहे. नवरात्रोत्सवात रताळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते.

कोकणातील रत्नागिरी,खेड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, पुणे कर्नाटक, वाशी, गुजरात, आदी बाजारपेठांत येथील लाल रंगाची गोड रताळी जातात. खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड केली जाते. रेताड मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. केवळ तीन महिन्यांचे पीक नवरात्रोत्सवात काढणीस येत असल्याने सणासुदीला शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो.

Sweet Potato
Sweet Potato : महशिवरात्रीसाठी रताळी, कवठांची मोठी आवक

पावसाचा उत्पादनावर परिणाम

यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने अनेक गावांमध्ये रताळे लागवड वाढली. रताळ्याच्या लागवडीनंतर काही काळ पावसाची उसंत लागते. शाहूवाडी हा डोंगरी तालुका असल्याने पावसाचे प्रमाण अधिक असते. यंदाही पावसात सातत्य होते. सलग पाऊस झाल्याने रताळ्याच्या वाढीवर परिणाम झाला. रताळ्याची वाढ सावकाश होत असल्याने गणेशोत्सवानंतर काढणीस होणारी सुरुवात दहा ते पंधरा दिवसांनी उशिरा झाली आहे.

यामुळे गणेशोत्सव झाल्यानंतर ज्या प्रमाणात रताळी बाजारात यायला हवी होती ती आली नाहीत.ज्यांच्याकडे रताळ्याची चांगली वाढ झाली आहे, त्या शेतकऱ्यांना चाळीस रुपये किलोपर्यंत दर मिळाला. जशी रताळ्याची काढणी वाढेल तसे दर खाली आले असले तरी सध्या किलोला ३० ते ३२ रुपयांपर्यंत दर टिकून आहे.

मुंबई, गुजरातलाही मागणी

शाहूवाडीच्या पश्चिम भागातील लाल मातीतील रताळ्यांना मोठी मागणी असते. शेतकऱ्याकडून रताळी घेऊन अनेक व्यापारी मुंबई, गुजरात, पुणे, नवी मुंबई, कऱ्हाड या बाजारपेठेत विकतात. जिल्ह्यात शाहूवाडी, चंदगड, राधानगरी या तीन तालुक्यांत रताळी हे पीक घेतले जाते.

सध्या दर चांगले असल्याने रताळी उत्पादकांत समाधान आहे. रताळी काढण्याचा हंगाम जोरात सुरू आहे नाशिक, मालेगाव, वाशी, मुंबई, पुणे येथील व्यापारी जागेवर येऊन रताळी खरेदी करीत आहेत. त्याबरोबरच स्थानिक परिसरातील ग्राहकांशी संपर्क साधून रताळी खरेदी होत आहे. जागेवर रोख पैसे देऊन रताळी खरेदी केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

किफायतशीर पीक

हे साडेतीन महिन्याचे पीक आहे. वेल लागवडीपासून काढणीपर्यंत व्यवस्थापनाचा खर्च इतर पिकांपेक्षा कमी लागतो. यामुळे मशागतीकडून हे पीक परवडते. भाजीपाल्याच्या दरात सातत्य नसते, अगदी तशीच परिस्थिती रताळे उत्पादकांची आहे. यामुळे दर चांगला लागला तर समाधानकारक उत्पन्न मिळू शकते.

नवरात्रात सलग उपवास असल्याने रताळ्याला नवरात्रीच्या पहिल्या पाच ते सहा दिवसांपर्यंत चांगली मागणी असते. यामुळे शेतकरी बहुतांशी काढणी याच काळात करतात. रताळ्याचे सरासरी एकरी वीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. पीक आणि दर चांगला असेल तर खर्च वजा जाता एकरी ५० हजारांचे उत्पन्न मिळते, असे या भागातील प्रयोगशील शेतकरी सांगतात.

Sweet Potato
Sweet Potatoes Cultivation : वाळवा तालुक्यात २०० एकरांवर रताळी लागवड

कोल्हापुरात वाढली आवक

नवरात्रीच्या काळात कोल्हापूर बाजार समितीत रताळ्याची आवक झाली, की ती हमखास शाहूवाडी तालुक्यातील असे म्हटले जाते. बाजार समितीतील बहुतांशी भाजीपाला व्यापाऱ्यांकडे मलकापूर तालुक्यातील रताळी येतात. गावरान रताळ्यांना जास्त मागणी असते.

नवरात्रीच्या अगोदर आठ दिवसांपासून रताळ्याचा हंगाम सुरू होतो. ऐन हंगामात दररोज दोन ते तीन ट्रक रताळी बाजारपेठेत दाखल होतात. दर वर्षीचा हा ‘पॅटर्न’ ठरलेला आहे. जसे गुळाचे सौदे लिलाव पद्धतीने होतात तसेच सौदे रताळ्याचे होतात. पहाटे टेंपोमध्ये रताळ्याची पोती भरून कोल्हापूर बाजारपेठेत दाखल होतात. इतर भाजीपाल्याच्या सौद्याबरोबरच रताळ्याचाही सौदा निघतो.

नवरात्रीच्या दरम्यान सातत्याने आवक होते. वर्षभर मात्र आवक अत्यंत कमी असते. इतर वेळी आवक बेळगाव भागातूनच होते. मात्र या रताळ्याला कमी मागणी असते. मलकापूर भागातील रताळ्यांना खास चव, गोडी असते. यामुळे ग्राहकदेखील याच रताळ्यांना प्राधान्य देतात. सकाळी रताळ्याचा सौदा झाल्यानंतर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमार्फत ही पोती स्थानिक किरकोळ विक्रेत्यांना विकली जातात.

किरकोळ विक्रेते शहराबरोबरच जिल्ह्यातील अनेक गावे आणि कोकणातील काही गावांमध्ये ही रताळी पोहोचवितात. या पिकाचा हंगाम वर्षभर सुरू नसल्याने केवळ रताळ्याचा व्यापार करणारे व्यापारी कोल्हापूर बाजार समितीत फारसे दिसत नाहीत. सध्या कोल्हापूर बाजारपेठेत दररोज एक ते दीड हजार पोती रताळ्याची आवक होत आहे. रताळ्यास मागणीनुसार दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर मिळत आहे.

अंगणात रताळ्याचा ढीग

रताळ्यामध्ये लाल आणि बेळगावी असे दोन प्रकार आहेत. बेळगावी रताळ्याचे उत्पादन लाल रताळ्यापेक्षा थोडे अधिक असते. पण दराच्या बाबतीत मात्र लाल रताळे भाव खाऊन जाते. यामुळे बहुतांशी शेतकरी लाल रताळ्याचे उत्पादन घेतात. नवरात्रीच्या काळामध्ये शाहूवाडी तालुक्यातील रताळी उत्पादक गावांमध्ये गावांमध्ये काढणीला वेग आला आहे. रताळी काढून ती पाण्यात स्वच्छ धुवून वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. शेतकऱ्यांच्या घरासमोर रताळी भरलेली पोती दिसतात. रताळ्याची वर्गवारी करून पन्नास किलोची पोती भरून कोल्हापूरसह अन्य बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत.

यंदा रताळ्याला सुरुवातीपासून दर चांगले आहेत. गेल्या आठवड्यापेक्षा दर कमी असले, तरी किलोला ३० रुपयांपर्यंत किंवा त्याहून अधिक दर मिळत आहेत. आणखी चार ते पाच दिवस तरी हेच दर कायम राहतील अशी शक्यता आहे. मी दोन एकर रताळी केली आहे. सध्या काढणी सुरू आहे. आतापर्यंत ५० किलोची १२५ पोती काढणी झाली आहे. ३५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
- दिनकर पाटील, ९८३४२ ०१४११ (आरोळ,ता. शाहूवाडी, जि.कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com