Sweet Potatoes
Sweet PotatoesAgrowon

Sweet Potatoes Cultivation : वाळवा तालुक्यात २०० एकरांवर रताळी लागवड

वाळवा तालुका ऊस पिकाचा हुकमी पट्टा. या पट्ट्यात ऊस पिकाला होणारा वाढता खर्च व मिळणाऱ्या कमी दराला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी रताळीसारख्या नगदी पिकाकडे आपले लक्ष वळविले आहे.

नवेखेड, जि. सांगली : वाळवा तालुका ऊस पिकाचा (Sugarcane Crop) हुकमी पट्टा. या पट्ट्यात ऊस पिकाला होणारा वाढता खर्च व मिळणाऱ्या कमी दराला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी रताळीसारख्या नगदी पिकाकडे आपले लक्ष वळविले आहे. तालुक्यात सुमारे २०० एकरावर रताळीची लागवड झाली आहे.

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या खोऱ्यात वसलेला वाळवा तालुका अनेक मोठे साखर कारखाने तालुका व तालुक्याच्या बाजूला आहेत. राज्यात साडे बारा टक्के उताऱ्यासाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. अनेक पट्टीचे ऊस उत्पादक शेतकरी या तालुक्यात आहेत.

तालुक्यातील शेतकरी मात्र घटणारे उत्पन्न, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, मजुरीचे मशागतीचे वाढते दर यांनी मेटाकुटीस आला आहे. त्यातच सतत उसावर पीक घेण्याच्या पद्धतीने उत्पन्न घटून जमिनीचा पोत बिघडला आहे.

Sweet Potatoes
Sweet Potatoes : मुरूडच्या बाजारात कोर्लईतील रताळी दाखल

पर्यायाने पुढील पिकाचेही उत्पन्न कमी होतेय. यावर पर्याय म्हणून या ऊसट्ट्यातील शेतकऱ्यांनी रताळी लागवडीला प्राधान्य दिले आहे. वर्षभर कोणत्याही हंगामात ते घेऊ शकतात. साधारणपणे आडसाली ऊस गेल्यानंतर खोडवा ठेवण्याऐवजी खोडवा काढून रताळीला प्राधान्य दिले जाते.

यासाठी ज्या शेतकऱ्यांचे रताळी पीक काढणी योग्य झाले आहे त्यातील काढणीपूर्व कापलेले वेल बियाणे म्हणून वापरले जाते. बऱ्यापैकी ते मोफत मिळते. तीन फुटी सरी सोडून बोधावर ते वेल डोळे बघून लावले जातात.

नंतर गरजेप्रमाणे पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. दोन भागलनी करून पसरलेले वेल पुन्हा बोधावर दाबून घेतले जातात. तीन-चार महिन्यात वेलींनी संपूर्ण जागा व्यापते.

रासायनिक खतमात्रा अगदी नाममात्र दिली जाते व जमिनीत रताळीची वाढ जोमाने होते. चार महिन्यांनंतर ही रताळी ट्रॅक्टर किंवा बैलाच्या नांगरीने काढून मुंबई बाजारपेठेत त्याची विक्री होते. एकरी सात ते ९ टनांत उत्पन्न मिळते.

प्रतिकिलो १० रुपयांपासून २८ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळतो. रताळी काढणीनंतर जमिनीचा पोत सुधारतो. पुढील पिकला त्याचा फायदा होतो. रताळी खरेदी करणारे अनेक व्यापारी आहेत. रताळी लावण आणि काढणी हाच मुख्य खर्च असतो. तो साधारण एकरी बारा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे.

ऊस पिकाला पर्ययी पीक म्हणून अनेक शेतकरी रताळी लागवड करत आहेत. चार महिन्यांत चांगले उत्पन्न मिळवून देणारे हे पीक आहे. वाळवा तालुक्यात लागवड क्षेत्रात वाढ होत आहे.
प्रकाश घार्गे,वाळवा तालुका कृषी अधिकारी
गावोगावी शेतकऱ्यांकडून रताळी खरेदी करणारे खरेदीदार वाढत आहेत. ते शेतकऱ्यांना दरात मारत आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघामार्फत थेट मुंबईमधील व्यापाऱ्याला मालाची विक्री करावी.
भागवत जाधव, रताळी उत्पादक शेतकरी नवेखेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com