Fruit Market : रमजान निमित्त फळांच्या मागणी, दरातही वाढ

Article by Ganesh Gore : रमजान महिन्यातील रोजे (उपवास) सोडण्यासाठी रसदार फळांना मागणी वाढली आहे. रमजान महिन्यानिमित्त पुणे बाजार समितीतील फळांच्या उलाढालीचा आढावा...
Fruit Market
Fruit Market Agrowon

Ramadan Festival Fruit Rate : मुस्लिम धर्मामध्ये रमजान हा पवित्र महिना असून, या काळात दिवसभर कडक उपवास केला जातो. त्यात रात्री इफ्तार करून उपवास सोडला जातो. वाढत्या उन्हाच्या काळामध्ये असलेल्या या उपवासांमध्ये शरीरातील साखर आणि पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी फळफळावळ, खजूर आहारात घेण्याचा रिवाज आहे. त्यामुळे या काळात प्रामुख्याने कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्ष, डाळिंब, संत्री, मोसंबी अशा फळांच्या मागणीमध्ये मोठा वाढ होते. अनेक कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकरी हा हंगाम साधण्यासाठी लागवडीचे नियोजन करत असतात.

पुणे बाजार समितीतील या फळांच्या मागणी आणि दराबाबत माहिती देताना प्रमुख अडतदार नितीन कुंजीर यांनी सांगितले, की बहुतांश शेतकरी रमजान महिन्यातील ही वाढती फळांची मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजन करत असतात. कारण या महिन्यात सरासरीच्या आवकेच्या दुप्पट आवक होऊनही दरदेखील २० ते ३० टक्‍क्यांनी वाढत असल्याचा अनुभव आहे.

द्राक्षांची आवक आणि दर

मार्च- एप्रिलदरम्यान द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असतो. रमजान निमित्त द्राक्षाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू असते. अनेक व्यापारी त्यासाठी थेट बागांची खरेदी करण्यावर भर देत असल्याचे बाजार समितीतील द्राक्षाचे अडतदार अरविंद मोरे यांनी सांगितले. पुणे बाजार समितीमध्ये इंदापूर, दौंड, बारामती, फलटण, तासगाव, सोलापूर, बार्शी या भागांतून द्राक्षाची आवक होत असते. यात थॉमसन, माणिक चमन, सुपर सोनाका, शरद सीडलेस, जम्बो (काळी) या वाणांचा समावेश आहे. या वाणांना साधारण ४० ते १०० रुपये प्रति किलोला दर असतो.

...असे आहेत दर (रुपये प्रति किलो)

थॉमसन माणिक चमन ४०-६० रुपये

जम्बो (काळी) ६० ते १००

सुपर सोनाका ५० ते ६०

Fruit Market
Fruit Market Rate : पाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलल्या, फुलांसह फळांची वाढली मागणी

कोठून होते कलिंगड, खरबुजाची आवक?

सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीलगत असलेल्या अनेक गावांमध्ये कलिंगड, खरबुजाची लागवड होते. सोबतच नगर, कर्जत, श्रीगोंदा, इंदापूर, दौंड, बारामती अशा काही तालुक्यांमध्येही या पिकांची लागवड होत असते. साधारणपणे कलिंगडाची ५० ते ६० टन आणि खरबुजाची ४० ते ५० टन प्रति दिन इतकी सरासरी आवक होत असते. रमजान महिन्यामध्ये हीच आवक सरासरीच्या तुलनेत दुप्पट असते.

कलिंगडाचे वाण : वैशिष्ट्ये आणि दर

कलिंगडामध्ये शुगर किंग आणि शुगर क्वीन हे वाण प्रामुख्याने आहेत. तर यामध्ये मॅक्स आणि किरण या दोन वाणांची आवक होत असते.

शुगर किंग आणि क्वीन हे रसदार, रवाळ वाण असून, गोडीला चांगले असतात. यांचे दर प्रति किलोला १२ ते १६ रुपये एवढे असतात. तर बिगर हंगामात याचे दर ८ ते १० रुपये प्रति किलो एवढे असतात.

मॅक्स या वाणाचा आकार सरासरीच्या आकारापेक्षा मोठा असतो. याचे दर १५ ते १८ रुपये प्रति किलो एवढा असतो.

किरण हा वाण लंबगोल आणि आकाराने मोठा असतो. रवाळ असल्याने मागणी आणि दर चांगले असतात. याचे दर प्रति दर १२ ते १४ रुपये प्रति किलो एवढे असतात.

खरबूज वाण : वैशिष्ट्ये आणि दर

खरबुजामध्ये कुंदन, सन, बॉबी हे प्रमुख वाण असले, तरी त्यात एकूण आवकेच्या ८० टक्के आवक ही कुंदन वाणाची असते. कारण कुंदनचे फळ गोड, सुगंधी आणि पाणीदार असते. मात्र जास्त आवक असल्याने तुलनेने दर कमी असतात. (सरासरी दर - २२ ते ३५ रु. प्रति किलो)

सन : या वाणाचे खरबूज फळ रंगाने पिवळे असून, आतील गर पांढरा असतो. याची आवक १० टक्के असून, गुणधर्म सरासरी असल्याने मागणी दर सारखेच असतात. (सरासरी दर - २२ ते ३५ रु. प्रति किलो)

बॉबी : या वाणाचे फळ हिरवट पिवळे असते. आवक सरासरीच्या १० टक्के असून, टिकाऊपणा आणि गोड चवीमुळे दर तुलनेने अधिक असतात. (सरासरी दर - ३५ -४० रु. प्रति किलो)

पपईची आवक आणि दर

पपईची साधारण दररोज ३५ ते ४० टन आवक होत असते. ही आवक प्रामुख्याने पुणे जिल्‍ह्यासह लगतच्या नगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतून होते. अन्य काळात पपईचा दर १० ते १५ रुपये प्रति किलो असला तरी रमजानच्या काळामध्ये त्याला २० ते २५ रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळतो.

Fruit Market
Fruit Orchard Management : उन्हाळ्यात फळबागांची काळजी कशी घ्यावी

परदेशी फळांची उलाढाल वाढतेय...

रमजान आणि उन्हाळ्यामुळे फळबाजारात सध्या मोठ्या प्रमाणात परदेशी फळांची आवक होत आहे. रंग, दर्जा, चव, आकर्षक पॅकिंग आणि टिकाऊपणामुळे परदेशी फळांना ग्राहकांची मागणी वाढत आहे. गेल्या काही वर्षांत घाऊक बाजारात परदेशी फळे विक्रीला येण्याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. परिणामी आयात फळांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही संख्या वाढली आहे.

परदेशी फळांमध्ये प्रामुख्याने सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, चेरी, पिअर, मोठी द्राक्षे, गोड चिंच यांसह विविध फळांना मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परदेशांसह भारतातही शीतगृहे आणि एकूणच शीतसाखळी व्यवस्थित जपली जात असल्यामुळे फळांचा दर्जा शेवटपर्यंत चांगला राहतो. बाजारात रविवारी ८० ते १०० टन आणि अन्य दिवशी ४० ते ५० टन इतकी परदेशी फळांची आवक होत असल्याचे परदेशी फळांचे प्रमुख विक्रेते सलीम बागवान यांनी सांगितले.

आयात फळे आणि देश

सफरचंद : चिली, साऊथ आफ्रिका, इटली, स्पेन, बेल्जियम, इराण, टर्की, अमेरिका (वॉशिंग्टन), न्यूझीलंड, पोलंड, तुर्कस्तान, अर्जेंटिना

किवी : इराण, न्यूझीलंड, इटली, ग्रीस, चिली

ड्रॅगन फ्रूट : व्हिएतनाम

मोठी द्राक्षे : चिली, अमेरिका

ब्लू बेरी, लाल आणि हिरवा पेरू, रबूतान, मँगो स्टीम, पपनस, गोड

थायलंड

प्लम : इजिप्त, इटली, स्पेन, चिली

रेड चेरी : चिली, ऑस्ट्रेलिया, इराण, अमेरिका

पिअर : साऊथ आफ्रिका

...असे असतात दर

प्रकार घाऊक बाजारातील दर (रुपये) किरकोळ बाजारातील

दर (रुपये)

टर्की सफरचंद २८००- ३४०० (१८ किलो) २०० (एक किलो)

ड्रॅगन फ्रूट १०००-१२०० (२० फळे) २०० (एक किलो)

साऊथ आफ्रिका रॉयल गाला ३६००-४००० (१८ किलो) २५०-३०० (एक किलो)

ऑरेंज १२००-१६०० (१५ किलो) १४०-१५० (एक किलो)

किवी १२००-१५०० (१८ पाकिटे) १०० (तीन फळे)

मोठी द्राक्षे १५०० (४.५ किलो) ३५०-४०० (एक किलो)

पिअर १६००-२०००

(१२.५ किलो बॉक्स) १६० (एक किलो)

लिची २६००-२८०० (१० किलो) ३५० (एक किलो)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com