
Agriculture Success Story : तांबिले बंधूंपैकी रामेश्वर कामानिमित्त फिरतीवर असत. कृषी, पशू- दुग्ध विकास अधिकारी, शेतकरी यांच्यासोबत त्यांची ऊठबस असे. त्यातूनच १९८९ मध्ये त्यांनी कृषी सेवा केंद्र सुरू केले. त्याच वर्षी मेहकर (जि. बुलडाणा) आणि रिसोड (जि. वाशीम) येथून दोन संकरित गायी आणल्या. शेतातील लाकूड फाटा वापरून कमी खर्चात गोठा उभा केला. दररोज अठरा ते वीस लिटर दूध उपलब्ध होऊन परभणी येथील शासकीय डेअरीला जाऊ लागले. रोजचे ऐंशी- शंभर रुपये उत्पन्न हाती येऊ लागले.
व्यवसायातील गोडी वाढू लागली. गायींची संख्या सहापर्यंत गेली. सहा- सात वर्षांनंतर परभणी डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत विस्कळीतपणा आला. नाइलाजाने १९९६ मध्ये दुग्ध व्यवसाय बंद करावा लागला. श्यामराव व रुस्तुमराव अजूनही शेतमजुरी करीतच होते. त्या वेळी सहा गायी विकल्या. सन १९९९ मध्ये कृषी सेवा केंद्रही बंद केले. संचय झालेल्या रकमेतून गावालगत दीड एकर जमीन मात्र त्यांनी खरेदी केली.
पुन्हा शेतीचा मार्ग आणि दुग्ध व्यवसायही
घरची जमीन साडेबावीस एकरांपर्यंत पोहोचली होती. घरप्रपंच चालविण्यासाठी ही शेती फायदेशीर करणं गरजेचं झालं होतं. मग मजुरांवरील खर्च कमी करून तिघा भावांसह कुटुंबातील सर्व सदस्य शेतात राबू लागले. विहीर, बोअर खोदून ओलिताची सोय केली. हळद तसेच १९९९ ते २००३ पर्यंत खासगी कंपनीसाठी कपाशी बीजोत्पादन घेतले. सन १९९८ मध्ये तांबिले बंधूंनीच गावात सर्वप्रथम सोयाबीनची लागवड केली.
शेतीतून आर्थिक स्थैर्य मिळू लागले तसे आणखी चौदा एकर क्षेत्र खरेदी केले. एकीकडे छत्तीस एकरांपर्यंत शेतीचा विस्तार झाला असला, तरी दुसरीकडे खर्च वाढले होते. पावसाच्या भरवशावर सारी शेती करणे जोखमीचे झाले होते. मग १९९६ ते २००५ या कालावधीत कुक्कुट व शेळीपालनाची जोड शेतीला दिली. गावातील उद्यमशील विक्रमजी बटवाडी पिठाची गिरणी चालवायचे. त्यांनी दुग्धव्यवसाय कसा शेतीला भक्कम आधार कसा देऊ शकतो याबद्दल समजावले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यात नशीब अजमावून पाहायचे असे ठरवून पुढे जाण्यावर तांबिले बंधूंचे एकमत झाले.
व्यवसायाने घेतली गती
या वेळी मात्र दुग्ध व्यवसायात यशस्वी व्हायचेच असा निर्धारच जणू केला होता. त्यातूनच पुढील वाट सुकर झाली. सन २००५ मध्ये लोणी (जि. नगर) येथील बाजारातून दोन संकरित (एचएफ) गायी आणल्या. गावापासून दीड किलोमीटरवरील शेतात गोठा उभारला. त्यासाठी साठ हजार रुपये खर्च झाला.
चारा-पाण्याचा अंदाज घेऊन आणखी तीन गायी घेतल्या. पाच-सहा शेळ्याही होत्या. दोन वेळेचे मिळून गायींचे रोजचे चाळीस ते पन्नास लिटर दूध उपलब्ध होऊ लागले. हिंगोली मार्गे परभणी येथील सरकारी डेअरीला दूध पुरवठा करणारी यंत्रणा होती. पण गावातील संकलन कमी असल्याने डेअरीचे वाहन येत नव्हते.
अशावेळी तांबिले यांनीच पुढाकार घेत आणखी पाच गायी घेतल्या. त्यातून रोजचे दूध संकलन शंभर लिटरपर्यंत पोहोचले. अन्य शेतकऱ्यांकडूनही तांबिले दूध घेऊ लागले. आता सरकारी डेअरीची गाडी गावात येऊन परभणीला दूध घेऊन जाऊ लागली. दरम्यान २००६ मध्ये रामेश्वर यांनी कृष्णाई सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थेची स्थापना केली.
वाढला पसारा
दुग्ध व्यवसायाचा पसारा वाढू लागला तशा शेळ्या अर्धालीने सांभाळायला दिल्या. कष्टांना कुठे कमी नव्हती. पहाटे चार वाजता उठून शेतातून गावात डोक्यावर दुधाचे कॅन वाहून पाणंद रस्त्यातून चिखल तुडवत यावं लागायचं. दूध वाढल्यावर रेड्याच्या पाठीवरून वाहतूक होऊ लागली. तरीही अडचणी थांबायचं नाव घेत नव्हत्या. अखेर गोठा हलविण्याचा निर्णय घेतला. सन २००९-१० मध्ये रामेश्वर यांनी संस्थेच्या माध्यमातून गावालगत दीड एकर क्षेत्र खरेदी करून तेथे डेअरी फार्म स्थापित केला. त्यास पशुसंवर्धन- दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अनुदानाची मोठी मदत मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.