Soybean Seeds : दर्जेदार सोयाबीन बियाण्यासाठी चला काटेवाडीला...

Soybean Seeds Production : सातारा जिल्ह्यातील काटेवाडी गावात शेतकऱ्यांचे दोन गट बीजोत्पादनात सक्रिय असून, त्या माध्यमातून कृषी विद्यापीठांच्या सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे तयार होण्यास चालना मिळाली आहे.
Soybean Seed Production Area
Soybean Seed Production AreaAgrowon

विकास जाधव

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेगाव फलटण रस्त्यावर काटेवाडी हे ७०० पर्यंत लोकसंख्या असलेले छोटे गाव आहे. पाण्याचा बाहेरील कोणताही स्रोत गावाला नसून विहिरी व बोअरवेल यांच्या माध्यमातून बागायती शेती केली जाते. पूर्वी ऊस, कांदा, भाजीपाला मोठ्या प्रमाणात केला जायचा. गावातून दररोज दोन टेंपो भाजीपाला मुंबई, पुणे येथे पाठवला जाई. सन २०२० च्या दरम्यान कृषी विभागाने शेतकरी गट स्थापन करणे व त्या अंतर्गत सोयाबीन बीजोत्पादन करणे हा मार्ग गावातील शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील संधी, अर्थकारण तपासले. त्यातून ‘आत्मा’अंतर्गत मानाप्पा शेतकरी गटाची स्थापना झाली. अध्यक्षपदी चंद्रकांत कोरडे, तर सचिवपदी विकास पांडेकर यांची निवड झाली. चंद्रकांत कोरडे, विकास पांडेकर, बजरंग कचरे, बाळासाहेब जगदाळे, अजित जगदाळे, राजेंद्र कचरे, विकास जगदाळे, शिवाजी कचरे, विजय कचरे, पोपट कोरडे, रमेश कोरडे, शशिकांत कचरे, अरुण कचरे, राहुल कोरडे, राजेंद्र कर्णे, रमेश जगदाळे, जयश्री घनवट, धनाजी कचरे, विजय कचरे आदी सदस्य झाले.

Soybean Seed Production Area
Soybean Seed Treatment : सोयाबीनवरील किड, रोग टाळण्यासाठी या बीजप्रक्रिया करा

बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी

गटाच्या माध्यमातून सभासदांनी एकूण १५ एकरांत फुले संगम ७२६ वाणाचे बीजोत्पादन घेतले. त्यासाठी आवश्यक विलगीकरण अंतर ठेवले. बैलचलित यंत्राद्वारे तसेच ‘बीबीएफ’च्या साह्याने पेरणी केली. रासायनिक, जैविक बीजप्रक्रिया, तसेच काढणीपर्यंतचे सर्व व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले. गटातील सदस्य एकरी १५ ते १६ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात यशस्वी झाले. जिल्ह्यातील औंध येथे प्रतवारी व पॅकिंग प्रक्रिया केली. त्या वर्षी सोयाबीनला दर चांगले असल्याने बियाण्याला प्रति किलो १२८ रुपये (प्रति २५ किलो बॅगेस ३२०० रु.) दर मिळाला. पुढील वर्षी फुले किमया ७५३ या वाणाचे पायाभूत बियाणे आणून गटातील सर्वांनी हा कार्यक्रमदेखील यशस्वी राबवला. सन २०२२ मध्ये श्री. सावतामाळी या नावाने अजून एक शेतकरी गट स्थापन झाला. अध्यक्ष राजाराम कचरे, सचिव विजय कोरडे, खजिनदार नितीन कोरडे व दत्तात्रय कोरडे, विवेक पांडेकर, सखाराम कचरे असे शेतकरी गटाच्या माध्यमातून सक्रिय झाले.

Soybean Seed Production Area
Soybean Seed : सोयाबीन बियाण्याची महागाई, हमीचा अभाव

उंचावले अर्थकारण

आजमितीला गावात खरिपातील एकूण पिकांच्या ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीन बीजोत्पादन घेतले जाते. पेरणीसाठी ‘बीबीएफ’ यंत्राचा वापर केला जातो. फुले-संगम ७२६, फुले किमया ७५३ व दूर्वा ९९२ या गटाच्या नावाने ब्रॅडिंग, पॅकिंग करून स्थानिक परिसरासह वाशीम येथे बियाणे विक्री केली जात आहे. बीजोत्पादनासाठी लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी एकत्रित होते. कृषी व आत्मा विभाग तसेच जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालय यांची मदत होते. काटेवाडीतील शेतकरी पूर्वी सोयाबीन घेत. पण बाजार समितीत त्याला अपेक्षित दर मिळत नव्हते. बीजोत्पादनाचा मार्ग मिळाल्यामुळे अर्थकारण उंचावणे शेतकऱ्यांना शक्य झाले. बैलचलित यंत्राकडून बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर होऊ लागला. त्यातून उत्पादनात भरीव म्हणजे एकरी चार ते सहा क्विंटल वाढ झाली. बियाण्यास प्रति किलो ११० पासून १४० रुपयांपर्यंत दर मिळू लागला. मागील दोन वर्षांत बीजोत्पादनातून गावात ४० ते ४५ लाखांपर्यंत उलाढाल झाली आहे. आता शेतकऱ्यांच्या हाती चांगले पैसे येऊ लागले आहेत. मशागातीसाठी ट्रॅक्टर तसेच अवजारांची खरेदी झाली आहे.

नवीन शिकण्याचा ध्यास

नव्या गोष्टी शिकरण्याकडे ग्रामस्थाचा कल आहे. कृषी विभागाच्या कार्यशाळांना त्यांची उपस्थिती असते. रब्बीत कांदा प्रमुख पीक असते. अनेक शेतकरी जुन्या पद्धतीच्या चाळीत कांद्याची साठवणूक करतात. चांगल्या दरांसाठी हुबळी (कर्नाटक) येथे कांदा पाठवला जातो. कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला ४० ते ५० एकरांवर असतो. एक आड दिवस वाहनांद्वारे तो पुणे, मुंबई येथील मार्केटमध्ये पाठवला जातो. त्यामुळे ताजा पैसा हाती राहून शेतीस भांडवल कमी पडत नाही. काटेवाडी गाव निर्मलग्राम झाले आहे. ग्रामस्थांनी वृक्षारोपणावर भर दिला आहे.

आश्‍वासक विक्री : आजमितीला दोन्ही गटांच्या माध्यमातून गावातील ३५ हून अधिक शेतकरी सोयाबीन बीजोत्पादन करीत आहेत. सन २०२२ दोन्ही गटांचे मिळून तब्बल १४०० बॅग बियाण्याची विक्री सरासरी ३५०० रुपये प्रति बॅग दराने झाली. मागील वर्षी २२०० बँगांची विक्री झाली. यंदाच्या हंगामात १६ ते १७ हेक्टर सोयाबीन लागवड झाली आहे. मानाप्पा गट तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथून तर श्री सावतामाळी गट रहिमतपूर येथून प्रतवारी, पॅकिंग आदी पुढील प्रक्रिया करून घेत आहे.

राजाराम कचरे ९९२३५७८४४१ (अध्यक्ष, श्री सावतामाळी शेतकरी गट)

विकास पांडेकर ७२७७६३२१२१ (सदस्य, मानाप्पा शेतकरी गट)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com