Smart Farming: प्रयोगशीलतेला व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड

Agriculture Success Story: नाशिकच्या बार्डे गावातील पंडित रामभाऊ वाघ हे गेली वीस वर्षे शेतीत अभ्यास, नियोजन व प्रयोगशीलता याच्या जोरावर उत्पादनवाढ साधत आहेत. त्यांनी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिकांची निवड, काढणीपश्चात व्यवस्थापन व विक्री या सर्व टप्प्यांवर व्यावसायिक दृष्टिकोन बाळगला आहे.
Pandit Wagh and their Family
Pandit Wagh and their FamilyAgrowon
Published on
Updated on

Sustainable Farming: नाशिक जिल्ह्यातील बार्डे (ता. कळवण) येथील प्रयोगशील शेतकरी पंडित रामभाऊ वाघ हे शेतीत दोन दशकांपासून अभ्यासपूर्ण वाटचाल करत आहे. सुधारित लागवड पद्धतीसह बाजारपेठेतील मागणीनुसार किफायतशीर पिकांची निवड यातून उत्पादकता वाढीचा सूक्ष्म नियोजन साधले जाते. काढणीपश्‍चात प्रतवारी, बाजारपेठ अभ्यास व विक्री नियोजन अशा सर्व टप्प्यांवर काटेकोर व्यवस्थापन करत असल्याने उत्पन्नवाढ साधली आहे. निरंतर प्रयोगशीलतेला व्यावसायिक दृष्टिकोनाची जोड दिल्यामुळेच समृद्धीची फळे चाखायला मिळत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील बार्डे (ता. कळवण) येथील पंडित रामभाऊ वाघ हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. हलाखीच्या परिस्थितीमुळे १९९२-९३ मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर ते शेतीत आले. वडील रामभाऊ हे पारंपरिक जिरायती पिके घेत. पंडित यांनी शेतीमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष लक्ष दिले. शेती सुधारण्यासाठी प्रयोग करू लागले. धडपडी आणि प्रयोगशील वृत्तीला त्यांनी २००१ पासून व्यावसायिकतेची जोड दिली. २००५ पासून भाजीपाला लागवड क्षेत्र वाढववे.

२००७ ते २०१४ पर्यंत शेतीला पूरक म्हणून रेशीम शेतीही केली. याच काळात २.५ एकर क्षेत्रावर शेडनेटची उभारणी करत त्यात काकडी, ढोबळी मिरची अशी पिके घेतली. आता हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, टोमॅटो अशा पिकांवर बाजारपेठेचा अंदाज घेत भर देत आहेत. भाजीपाला पिकामध्ये दरातील चढ-उतार हीच मोठी समस्या आहे. त्यामुळे पिकाचा उत्पादन खर्च कमी ठेवण्यावर प्रामुख्याने भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांत खरीप हंगामात मका व रब्बी हंगामात उन्हाळ कांदा ही त्यांची दोन प्रमुख पिके बनली आहेत.

Pandit Wagh and their Family
Agriculture Success Story: पालकरांकडील आंब्याला मिळालेय जागेवरच मार्केट

कांदा झाला हक्काचे पीक

रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा या पिकामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत शास्त्रीय व्यवस्थापन करतात.

दरवर्षी १० ते १२ एकरावर कांदा लागवड

जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय खताला प्राधान्य. रासायनिक खतांचा मर्यादित व नियंत्रित वापर यामुळे खर्चात बचत साधते.

दरवर्षी १ ते १५ डिसेंबर दरम्यान पुनर्लागवडीचे नियोजन असते. त्यासाठी १० गुंठे क्षेत्रावर मल्चिंगवर कांदा बीजोत्पादन केले जाते. त्यासाठी मल्चिंग पेपरवर डेंगळे लागवड करतात. बियाणे खर्च कमी राहतो.

अन्नद्रव्य व्यवस्थापनात सेंद्रिय खतांसोबत आवश्यक तिथे रासायनिक खतांचा वापर करतात. रोग व कीड नियंत्रणासाठी प्रामुख्याने निमतेल व जैविक घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे खर्चात बचत होते.

एकरी सरासरी १८० क्विंटल उत्पादनात सातत्य आहे. मात्र २०० क्विंटलपर्यंत नेण्यासाठी जमीन सुपीकता, अन्नद्रव्य व्यवस्थापनावर त्यांचे काम सुरू आहे.

साठवणुकीद्वारे करतो विक्री नियोजन

साधारण मार्चमध्ये काढणी करतात. प्रतवारी करून कांदा चाळीत साठवला जातो. या प्रक्रियेत चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले व खराब कांदे वेगळे केले जातात. एप्रिलपासून स्थानिक बाजारात टप्प्याटप्प्याने प्रतवारीनुसार विक्रीस सुरुवात होते. पुढील खरीप हंगाम सुरू होण्याच्या दरम्यान जून आणि जुलै महिन्यांत कांदा विक्रीचे नियोजन असते. यासह साठवलेला कांदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने

विक्री करतात. व्यवस्थित केलेल्या साठवणुकीमुळे

बाजारात दर चांगला असताना विक्री करण्याचा उद्देश साध्य होतो.

खरीप हंगामात मका पिकाला पसंती

स्थानिक पातळीवर विस्तारलेल्या कुक्कुटपालननासाठी आवश्यक पोल्ट्रीफीड मका व सोयाबीनच्या वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन मका पीक घेतले जाते. नैसर्गिक आपत्तीमध्ये सोयाबीनचे अधिक नुकसान होत असल्यामुळे सोयाबीन कमी ठेवले जाते. पशुखाद्य कंपन्यांकडून स्थानिक पातळीवर खरेदी होऊन २४ तासात पैसे मिळतात. मक्याचे सरासरी एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्याला सरासरी २,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळतो. शिवाय घरच्या जनावरांसाठी चाराही उपलब्ध होतो. परिणामी, हे पीक किफायतशीर असल्याचे पंडित वाघ यांचे मत आहे. मका पिकाचे उत्पादन ३५ क्विंटलपर्यंत नेण्यासाठी

त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पेरणीचा खर्च वाचविण्यासाठी पेरणी, बेडनिर्मिती व तणनाशक फवारणीचे एकत्रित यंत्र स्वतः तयार केले आहे. काढणीनंतर मका साठवून

ठेवला जातो. बाजारातील दरानुसार टप्प्याटप्प्याने विक्री केली जाते.

Pandit Wagh and their Family
Agriculture Success Story: पारंपरिक शेतीला फळबाग, पशुपालनाची जोड

नियोजन दृष्टिक्षेपात

स्वमालकीची १० एकर, तोड बटाई पद्धतीने ५ एकर

रासायनिक खतांचा नियंत्रित वापर करून जैविक व वनस्पतिजन्य निविष्ठांच्या वापरावर भर

दोन ठिकाणी शिवार असल्याने देखरेखीसाठी ‘सीसीटीव्ही’ बसवले आहेत.

सिंचन स्रोत दोन विहिरी, पाइपलाइन व शेततळे, पाणी उपशासाठी सौर कृषी पंपाचा वापर

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब.

शेतमजुरांसाठी सर्व सुविधायुक्त निवासव्यवस्था.

ज्ञानात गुंतवणूक...

कृषिविषयक पुस्तके, मासिकातून शेतीची माहिती मिळवतात. ‘ॲग्रोवन’चे पहिल्या दिवसापासून वाचक.

इंटरनेट व समाजमाध्यमांच्या काळात ते ११ वर्षांपासून समाजमाध्यमावर ‘कसमादे शेतकरी’ गट चालवतात. तर ‘महाराष्ट्र ओनियन फार्मर्स’, ‘ही मैत्री विचारांची’ अशा शेतकरी समूहाचे सक्रिय सदस्य आहेत.

कृषिविषयक परिसंवाद, चर्चासत्र व प्रशिक्षणात आवर्जून सहभाग घेतात. प्रदर्शनांना व प्रयोगशील शेतकऱ्यांना भेट देतात.

विविध माध्यमांतून मिळालेल्या माहितीचा व ज्ञानाचा शेतामध्ये वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतात. ज्ञान मिळविण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेमध्ये मिळणारा परतावा कितीतरी पटीने अधिक असतो.

संशोधक शेतकरी

शेतीकामे सोपी करण्यासाठी, कष्ट आणि खर्चात बचत करण्यासाठी यंत्रे, अवजारे विकत घेण्यासोबतच गरजेनुसार स्वतः तयार केली आहेत. त्यात भाजीपाला लागवडीसाठी मार्कर, फवारणीसाठी ब्लोअर, शेतीमाल वाहण्यासाठी लोडर यांचा समावेश आहे. अलीकडे भंगारमधील मोटरसायकल मिळवून तयार केलेला ‘बहुपयोगी पॉवर टिलर’ कमी

खर्चात दोन बैलांचे काम करतो. स्थानिक परिस्थितीनुसार बेडवरील पेरणीसाठी पेरणी यंत्रात बदल केले आहेत. या स्वनिर्मित यंत्रांमुळे कामे वेगाने होतात. मजुरी खर्चात २५ टक्क्यांपर्यंत बचत होते. सध्या कांदा प्रतवारी यंत्र, चाळीमध्ये कांदा हालचालीसाठी ‘कन्व्हेअर बेल्ट’ यावर काम सुरू आहे.

उत्पन्न आणि आर्थिक नियोजन

उत्पादनाच्या मुख्य टप्प्यावर खर्च कमी करूनही गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवणे. बाजारपेठेचा आढावा घेऊन उत्पादने विक्रीचे नियोजन करतात. त्यामुळे फायद्याचे प्रमाण वाढते. शेतीतून साधारण २५ लाखांवर उलाढाल होते. आलेल्या शेती उत्पन्नातून १० लाख शेती भांडवल, १.५० लाख रुपये दरवर्षी शेतीविकासासाठी बाजूला काढले जातात. या रकमेतून आजवर सिंचन स्रोतांचे बळकटीकरण, केंद्रीय सूक्ष्मसिंचन व्यवस्था, जमिनीचा विकास, कांदा साठवण व्यवस्था, शेतीमाल हाताळणी- प्रतवारी शेड, शेततळे, यंत्रे व अवजारे खरेदी असा पायाभूत विकास केला आहे.

मुलगी तनुजा ही फिजिओथेरपी तर मुलगा यश अन्नप्रक्रिया विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे.

आजवरच्या प्रवासात पत्नी आशा यांची मोलाची साथ.

सेवानिवृत्त कृषी अधिकारी मोहन वाघ, निवृत्ती वाघ यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत असल्याचे ते सांगतात.

प्रयोगशीलतेचा सन्मान

गेल्या २० वर्षांपासून सातत्याने शेतीत वेगळे प्रयोग करत आहेत. त्यामुळे अनेक शेतीविषयक पुरस्कार मिळाले आहेत.

२०२४ मध्ये जय किसान फार्मर्स फोरमतर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्कार

२०१५ मध्ये कसमादे कृषी महोत्सवात ‘शेतीनिष्ठ शेतकरी’,

२०२२ मध्ये कृषिथॉन कांदा उत्पादक पुरस्कार तर

२०२४ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे पुसा (दिल्ली) येथे ‘डिस्ट्रिक्ट मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया’

- पंडित वाघ, ७५८८८१७७६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com