
Kolhapur Rural Entrepreneurship : कोल्हापूर जिल्ह्यातील चिंचवाड (ता.शिरोळ) येथे सतीश नामदेव कदम यांचे एकत्रित कुटुंब राहते. आहे. त्यांची तीन एकर शेती असून प्रामुख्याने उसाचे पीक आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसाय हा कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. घरच्या पाच म्हशी व एक देशी गाय आहे.
गावातील सोसायटीत कर्मचारी असलेल्या सतीश यांनी तेथील नोकरी सोडल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी दुग्धप्रकियेवर आधारित पदार्थ तयार करण्यास सुरवात केली. सुरवातीला गावातच पदार्थ तयार केले जायचे. मात्र त्यास व्यावसायिकता स्वरूप देण्याच्या उद्देशाने जयसिंगपूर शहरातील कोल्हापूर- सांगली रस्त्यावर भाडेतत्त्वावर जागा घेऊन युनिट उभारले.
चुलीवरील पदार्थांची ‘स्पेशालिटी’
अलीकडील काळात पदार्थ तयार करताना प्रामुख्याने सिलिंडर गॅस आधारित शेगडीचा वापर केला जातो. कदम यांनी मात्र सुरुवातीपासूनच चुलीवर पदार्थ तयार करण्यास सुरवात करून त्यांचा वेगळा स्वाद तयार केला व आपले वेगळेपण जपले.
बर्फी हे त्यांचे सर्वांत लोकप्रिय असलेले उत्पादन आहे. बासुंदी किंवा तत्सम उत्पादन तयार करताना मंद आचेवर दूध आटवण्याचा कालावधी साडेतीन तास इतका मोठा आहे.
त्यामुळे दुधाचा टिकाऊपणाही चांगला आहे. कदम यांची स्वतःची डेअरी आहे. घरच्या दुधाबरोबरच अन्य शेतकऱ्यांकडीलही १५० ते २०० लिटर दुधाचे संकलन ते करतात. पदार्थ निर्मितीसाठी वापर होऊन उर्वरित दूध डेअरीकडे पाठवले जाते.
दूध घेताना आठ किंवा त्याहून अधिक फॅटच्या दुधाचा वापर होतो. दुधाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. या सर्व गोष्टींमुळे पदार्थांची चव एकसमान ठेवणे शक्य झाले आहे. ग्राहकांकडून सातत्याने स्वाद, चवीबाबत ‘फीडबॅक’ घेतला जातो. त्यामुळे गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करणे शक्य होते.
सिद्धेश्वर ब्रॅण्ड झाला लोकप्रिय
ग्राहकांच्या मागणीचा अंदाज तसेच सण-समारंभ, लग्नसोहळे व अन्य कार्यक्रम लक्षात घेऊन दररोज त्याप्रमाणात पदार्थांची निर्मिती होते. बर्फी, बासुंदीची विक्री पाव किलोपासून एक किलोच्या पॅकिंगमध्ये होते. बर्फीच्या एका किलो पॅकिंगमध्ये ३० नग असतात. प्रति किलो ४०० रुपये असा बर्फीचा दर आहे.
घरच्या दुधापासून खवा तयार करून पेढे तयार केले जातात. त्यांची ५०० रुपये प्रति किलोप्रमाणे दराप्रमाणे विक्री होते. केवळ म्हशीच्या दुधाचा वापर करून, तसेच कोणतेही ‘प्रिझर्व्हेटिव्ह’ न वापरता चुलीवरची बर्फी अशा ‘टॅगलाइन’ने श्री सिद्धेश्वर या ब्रॅण्डनेमने बर्फी व अन्य पदार्थांची विक्री केली जाते. स्थानिक ग्राहकांबरोबरच मुंबई, पुणे येथेही नियमित ग्राहक तयार झाले आहेत.
पदार्थांच्या विक्रीसाठी मित्रमंडळीही मदत करतात. त्याद्वारे अन्य शहरांमध्येही विक्री होते. खासगी ट्रॅव्हल्स माध्यमातून पुणे, मुंबई येथे बर्फी पाठविली जाते. जयसिंगपूर भागातील नातेवाइकांच्या माध्यमातून अमेरिका, इंग्लंड व आखती देशांतील नातेवाईकांपर्यंत आपली बर्फी पोचली असल्याचे कदन अभिमानाने सांगतात. जयसिंगपूर शहरातील भडंगाचा ब्रॅंड याआधीच प्रसिद्ध आहे. त्यात आता कदम कुटुंबीयांच्या पदार्थांनाही सर्वत्र पसंती दिली जात आहे.
एकत्रित प्रयत्नांची गोडी
कदम कुटुंबीयांच्या या व्यवसायाला एकत्रितपणाची गोडी आहे. सतीश यांची आई जयश्री यांचे प्रक्रिया उद्योगात मोठे योगदान आहे. सतीश यांची पत्नी सरिता, विनोद यांची पत्नी पल्लवी व प्रमोद यांची पत्नी मेघा हे सदस्य देखील व्यवसायाला मोठा हातभार लावतात. सतीश यांची पदवीधर झालेली मुलगी गायत्री नियोजनात प्राधान्याने मदत करते.
पुतण्या कुणालकडे कुल्फी विक्रीची जबाबादारी आहे. घरात १३ सदस्य असून सर्वजण आपापली कामे समन्वयाने व गुण्यागोविंदाने करीत असल्याने पदार्थ निर्मिती सहजपणे आणि वेळेत होते. मजुरांची मदत घेण्याची गरज शक्यतो भासत नाही. ताजी, गरम बर्फी व बासुंदी घेण्यासाठी ग्राहक लांबून येतात. अनेक ग्राहक कायमस्वरूपी होत असल्याने व्यवसायाचा आलेख वाढत असल्याने सतीश यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण पदार्थांची निर्मिती
अलीकडील काळात कदम कुटुंबीयांनी अभ्यासातून नावीन्यपूर्ण पदार्थनिर्मितीही सुरु केली आहे. यामध्ये मिल्क केक सारख्या वैशिष्ट्यपूर्ण केकचा समावेश आहे. दूध, खवा, ड्रायफ्रूटस, केशर, देशी गायीचे तूप वापरून या केकची निर्मिती केली आहे.
प्रति किलो साडेपाचशे रुपये त्याची किंमत ठेवली आहे. मागणीनुसार पाव व अर्धा किलो प्रमाणात केक तयार केले आहेत. याच बरोबर सेंद्रिय गुळाचा वापर करून तयार केलेली कुल्फी वैशिष्ट्यपूर्ण आहेच. मात्र मावा, गुलकंद, मॅंगो, जांभूळ आदी फ्लेवर्समध्येही कुल्फी तयार केली आहे.
सोबतच बदाम शेक, काजू शेक, लस्सी अशी श्रेणी विस्तारित केली आहे. घरातच तयार केलेल्या म्हशीच्या तुपाचीही विक्री होते. कोल्हापूर- जयसिंगपूर रस्त्यावर पदार्थ निर्मिती केंद्र आहे. तेथे विक्रीसाठी ‘आऊटलेट’ही सुरू केले आहे.
काही पदार्थ गावी म्हणजे चिंचवाड येथेही तयार केले जातात. महिन्याला सुमारे एक लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत व्यवसायाचे स्वरूप पोचले आहे. येत्या काळात व्यवसायाचा याहून विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सतीश कदम ९८२२८५११५२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.