
Rural Development : कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकपुर्ली (ता. राधानगरी) हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव विशेष करून भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. गावाची (ता. राधानगरी) तीस वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागे.
पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या गावाला विहिरींचाच काय तो आधार होता. उसासारखे पीक घेणे शक्यच नव्हते.
कालव्याच्या पाण्याच्या साह्याने गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर वांगी, वरणा, दोडका, कोबी आदी भाजीपाला पिके घेऊन संसाराला हातभार लावणे सुरू केले. दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली.
थोडी स्थिरता येते आहे असे वाटताच १९९० च्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून अर्थार्जन वाढत आहे हे लक्षात येऊ लागले.
मग बाकी ग्रामस्थांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्यास सुरुवात केली. उद्योजकता वाढीस लागली. अलीकडील काही वर्षांत सुमधुर बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारे गाव अशी ठिकपुर्लीची ओळख तयार झाली आहे.
जुन्या कौलारू घरांच्या जागी नव्या टुमदार वास्तु उभ्या राहत आहेत. अंगणात उभ्या चारचाकी गाड्या घराचे वैभव अधोरेखित करीत आहेत.
...अशी होते बर्फी निर्मिती
गावच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के कुटुंबांकडे एकपासून ते १० संख्येपर्यंत म्हशी आहेत.तर गावात बर्फी निर्मितीत सुमारे पंधरा व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून दररोज सुमारे १५०० लिटरपर्यंत दुधाची मागणी असते. तीन दशकांपासूनचे दुग्धोत्पादकांसोबत त्यांचे विश्वासाचे संबंध तयार झाले आहेत.
त्यामुळे दर्जेदार दुधाचा पुरवठा होतो. दूध संस्था ज्याप्रमाणे दर दहा दिवसांनी उत्पादकांना बिल देतात त्याच पद्धतीने हे व्यावसायिकही उत्पादकांना रक्कम देतात. डेअरीकडूनही दूध घेण्यात येते.
दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनविण्याच्या कामास सुरुवात होते. धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो. मोठ्या काहिलीत दहा लिटर दुधाचे आधण असते. गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधण लागते. दीड ते दोन तासांतबर्फी तयार होते.ग्राहकांची पसंती
दररोज सुमारे ४०० किलो म्हणजे १३ ते १४ हजार बर्फी नगांची निर्मिती होते. निव्वळ खव्याची बर्फी म्हणून ठिकपुर्लीची बर्फी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील ग्राहकांच्याही पसंतीस उतरली आहे.
जिभेवर येताच त्याचा विशिष्ट स्वाद आणि खमंगपणा जाणवतो. सुरुवातीला काही किलोमध्ये विकल्या जाणाऱ्या बर्फीची आता दररोज एक लाख रुपयांपुढे उलाढाल होत असावी.
रोजगार निर्मिती झाली
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यातील अनेक युवक नोकरी व्यवसायासाठी मुंबईकडे धाव घेतात. पण ठिकपुर्ली गाव त्याला अपवाद आहे. अन्य गावांच्या तुलनेचा येथील अनेक युवक दुग्ध व्यवसायात आहेत.
त्यातून स्थानिक रोजगार उपलब्ध होऊन शहरांकडे होणारे स्थलांतर टळले आहे. विशेष म्हणजे काही व्यावसायिक नोकरदारही पशुपालन करत असल्याचे चित्र गावात पाहण्यास मिळते.
बर्फीचा गोडवा परदेशापर्यंत
कोल्हापूर गारगोटी मार्गावर गाव असल्याचाही फायदा होतो. गावालगतच्या शेळेवाडी तसेच परिसरातील दुकानदारांसह जिल्ह्यातील काही गावे, निपाणी परिसर आणि कोकणात विकण्यासाठी येथून बर्फी जाते. मुंबई पुण्यालाही बर्फी पाठविली जाते.
३६० रुपये प्रति किलो, तर १२ रुपये प्रति नग असा त्याचा दर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून परदेशात स्थायिक झालेले किंवा कामानिमित्त जाणारे ही बर्फी सोबत आवर्जून घेऊन जातात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.