
Agriculture Success Story : गोरनाळे (ता. जामनेर, जि. जळगाव) गावाला कापूसवाडी (ता. जामनेर) येथील मध्यम प्रकल्पातील पाण्याचा आधार आहे. हा प्रकल्प गावापासून चार किमीवर असून, शेतकऱ्यांनी जलवाहिनीद्वारे शेतासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. येथील चंद्रकलाताई वाघ यांनी कुटुंबात एकी ठेवून शेतीतून प्रगती साधली आहे.
पती सीताराम वाघ यांच्या सोबत शेतीतील जबाबदाऱ्या पार पाडल्या. चंद्रकलाताई अल्पशिक्षित आहेत. परंतु शिक्षणातील अडसर त्यांच्या प्रगतीत कधीच आली नाही. शेतीकामे पाहत मुलांच्या शिक्षणाची मोठी जबाबदारी चंद्रकलाताईंनी पार पाडली. आपण अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकलो नाही, पण आपली मुले शिकून मोठी व्हावीत या विचाराने मुलांच्या शिक्षणावर भर दिला. मुले संदीप, जीवन व मोहन यांना उच्चशिक्षण दिले. सध्या जीवन नोकरी करतात, तर संदीप शेती अवजारे भाडेतत्त्वाने देण्याचा व्यवसाय करतात. मोहन कृषी पदवीधर असून शेतीची जबाबदारी सांभाळतात.
सध्या वाघ कुटुंबाची स्वतःची २५ एकर शेती असून भाडेतत्वावर ३५ एकर शेती घेतली आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर दिला जातो. विविध शेती कामे, लागवडीसह काढणी अशा सर्व कामांकडे चंद्रकलाताईंचे बारकाईने लक्ष असते. लागवड नियोजन, विपणन व खते आदी मुख्य जबाबदाऱ्या मोहन यांच्यावर असतात.
सिंचन सुविधांची उपलब्धता
शेतीमधून वित्तीय स्थिती सुधारल्यानंतर डोंगराळ, खडकाळ जमिनीत मातीची भर घालत उत्पादनक्षम केली आहे. जलसंकट लक्षात घेऊन शेतातील एका टेकडीवर ४४ बाय ४४ मीटर व ३० फूट खोलीचे तसेच ३४ बाय ३४ फूट आणि ३० फूट खोलीची दोन शेततळी तयार केली. कापूसवाडी येथील सिंचन प्रकल्पातून आठ किलोमीटर अंतराची जलवाहिनी आणली आहे. यामुळे बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने शेती बागायती झाली.
शेती क्षेत्राचा विस्तार
चंद्रकलाताई दररोज सकाळी शेतात जाऊन शेतीकामे करण्यावर भर देतात. पीक पेरणी, काढणी आदी कामांत त्या पारंगत आहेत. हरभरा, गहू आदी मोघडावर पेरणी चंद्रकलाताईंशिवाय केली जात नाही. कांदा पेरणीही त्या कुशलपणे करतात. त्यांच्या हाताची पेरणी कधीच वाया गेली नाही, असे वाघ कुटुंबीय सांगते.
वाघ दांपत्याकडे वडिलोपार्जित पाच एकर खडकाळ, माळरानाची शेती होती. चांगला पाऊस झाला, तर उत्पादन हाती येई. अनेकदा कमी पावसाने पिके येत नव्हती. अशा स्थितीत संसाराचा गाडा हाकून प्रगती साध्य करणे आव्हानात्मक होते. पशुधनाचा सांभाळही केली. शेतात राबून हळूहळू प्रगतीचा आलेख उंचावत नेला. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आज पाच एकराची शेती २५ एकरांपर्यंत विस्तारली आहे, असे चंद्रकलाताई अभिमानाने सांगतात.
शेतासाठी पाणी हवे, यासाठी त्या सतत अस्वस्थ असायच्या. त्यासाठी विहीर खोदण्याचे ठरले. खोदकाम कामातही त्यांनी हातभार लावला. पुरुषाप्रमाणे माती काढणे, बैल हाकण्यासारखी कष्टाची कामेही त्यांनी केली. विहिरीला पाणी आले आणि शेती बागायती झाली. पुढे ड्रीप व अन्य यंत्रणेतून शेतीचा व कुटुंबाचाही विकास झाला.
सरपंचपदाचा मान
आयुष्यभर कष्ट घेतलेल्या चंद्रकलाताईंना गावची पहिली महिला सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. जानेवारी २०२४ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या उत्तम काम करत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी गावातील केळी शेतीला प्रोत्साहन दिले. राज्याचे तत्कालीन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची मदत व सहकार्यामुळे ग्रामविकासाच्या कामांना बळ मिळाले, असे चंद्रकलाताई सांगतात.
गावात आजवर सामाजिक सभागृहाचे बांधकाम, काँक्रिटीकरण व सांडपाणी व्यवस्थापनासंबंधी प्रकल्प, शेतरस्त्याचे डांबरीकरण, महिला बचत गटांसाठी प्रोत्साहनपर काम, ग्रामविकासाच्या विविध कामांसाठी पाठपुरावा अशी विविध कामे केली आहेत.
व्यवस्थापनात काटेकोरपणा
हळद, केळी पिकाची गादीवाफा पद्धतीने लागवड. यामुळे कमी पाऊस किंवा अतिपावसातही पिकांना वाचविणे शक्य होते.
पीक फेरपालटीवर अधिक भर.
बहुपीक पद्धतीमुळे एका पिकाचे नुकसान झाले तरी इतर पिकांतून नुकसानीची भर निघते.
ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन केल्यामुळे खतांवरील खर्च कमी करून कार्यक्षम वापर होण्यास मदत.
यांत्रिकीकरणावर भर दिल्याने मजुरी खर्चात बचत.
काटकसरीबाबत कटाक्ष
काटकसर करून शेती भाडेतत्वावर घेण्यास सुरुवात केली. पीक व्यवस्थापनात बदल करून हळद, कापूस व केळी पिकांतून समृद्धी आली. दरवर्षी शेतीच्या आर्थिक उत्पन्नाचा हिशेब लावून आर्थिक शिस्तीवर भर दिला जातो. कोणत्या पिकात कोणत्या कारणांमुळे हानी झाली. किती आणि कोणत्या कारणांमुळे नफ्यात वाढ झाली आदी बाबींची नोंद ठेवली जाते. मागील वार्षिक उत्पन्न कसे राहिले, हे लक्षात घेऊन पुढील वर्षभर पिकांचे नियोजन व आर्थिक अंदाजपत्रक तयार केले जाते. शेतीतील उत्पन्नातून शेतीमध्ये सुधारणा, सिंचन स्रोतांचे बळकटीकरण, यंत्रणांची देखभाल, उत्पादनक्षम बाबींमध्ये गुंतवणूक यावर भर वाघ कुटुंबाचा भर असतो.
विविध फळ पिकांवर भर
दरवर्षी १५ एकरांत २५ हजार उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली जाते. मृग व कांदेबाग लागवड असते. सोबत लिंबू, पेरू, पपई आदी फळझाडांसह मिरची, वांगी, कलिंगड, खरबूज या पिकांची लागवड आहे. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने कंदांचा वापर केळी लागवड केली जायची. आता सुधारित तंत्राचा अवलंब केला आहे. उतिसंवर्धित रोपे, फ्रूट केअर तंत्रज्ञान अवलंब, बाजाराचा अंदाज घेऊन लागवड कालावधी निश्चिती या बाबींवर भर दिला जातो.
शेतीमालाची थेट विक्री
केळी व कापसाची जागेवरून विक्री होते. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बाजाराचा अभ्यास करून विक्रीचा निर्णय घेतला जातो. शेती रस्त्यानजीक असल्याने मजुरी खर्च कमी लागतो. गुणवत्तापूर्ण केळी उत्पादनामुळे खरेदीदार जागेवरून खरेदी करतात.
ताळेबंद ः (एकरी खर्च, निव्वळ नफा हजार रुपयांत)
पीक खर्च नफा
केळी ६० हजार एक लाख (सरासरी)
कापूस २४ हजार ४० हजार
हळद ५० हजार एक लाख ८०
कलिंगड ७० हजार एक लाख २० हजार
पपई ७० हजार दीड लाख
(बाजारपेठेनुसार दरात चढ उतार होतात. त्यानुसार नफ्यात बदल होतो.)
- मोहन वाघ, ८६६८८४५५११
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.