
Agriculture Success Story : कसबे तडवळे (ता. जि. धाराशिव) येथील जमाले या एकत्रित कुटुंबाची सुमारे ५२ एकर शेती आहे. कुटुंबातील तुळशीदास हे गावापासून काही किलोमीटरवरील कळंब येथील सरस्वती प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. थोरले बंधू संजय बहारीन या आखाती देशात १९९३ पासून नोकरीत आहेत.
तर धाकटे बंधू भजनदास व त्यांची पत्नी चंद्रकला पूर्णवेळ शेळीपालन व शेती पाहतात. कुटुंबाने २००५ ते २०१३ पर्यंत दुग्ध व्यवसाय नेटाने केला. परंतु दुधाचे दर, तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर न ठरल्याने व्यवसाय बंद केला.
शेळीपालन व्यवसाय
कुटुंबाकडे शेतीला जोडधंदा म्हणून पूर्वीपासूनच शेळीपालन होते. पंचवीसपर्यंत संख्या होती. दरम्यान, परदेशातील थोरले भाऊ संजय यांनी या व्यवसायाच्या विस्तारीकरणास प्रोत्साहन दिले. मग ६० उस्मानाबादी शेळ्या आणून दुग्ध व्यवसायासाठीच्या शेडमध्येच हा व्यवसाय सुरू केला. पहिल्या वर्षी शेळ्या व पिले मृत्युमुखी पडले.
पशुवैद्यकांच्या मदतीने शास्त्रीय विश्लेषण होऊन दूषित पाण्यामुळे मरतुक होत असल्याचा निष्कर्ष मिळाला. त्यानंतर व्यवस्थापनात सुधारणा केली. पाण्याची गुणवत्ता सुधारली. वर्षातून चार वेळा लसीकरण सुरू केले.
त्यातून शेळ्यांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यात यश मिळाले. व्यवसायास आकार येऊ लागला. मागील दहा वर्षांच्या अनुभवातून शेळ्यांची संख्या एक हजारांपर्यंत नेण्यास यश आले. आजमितीला संख्या ८०० पर्यंत आहे. बहुतांश सर्व संकरित उस्मानाबादी शेळ्या आहेत.
बोअर- उस्मानाबादी संकर
उस्मानाबादी बकऱ्याचे वजन ३५ ते ३८ किलो दरम्यानच असायचे. या व्यवसायात आर्थिक फायद्यासाठी वजनाला महत्त्व आहे. त्यादृष्टीने वजनवाढीसाठी अभ्यास सुरू केला. फलटण येथील निंबकर फार्मला भेट दिली. तेथे बोअर जातीचा बकरा दिसून आला. त्याचे वजन दीडशे किलोपर्यंत होते.
या जातीचे बकरे काटक, दणकट, वजनदार, रुबाबदार असून प्रतिकारशक्तीही चांगली असते. या बाबी लक्षात घेऊन येथून दोन हजार रुपये प्रति किलो रुपये दराने १६ किलो वजनाचे चार बकरे आणि चार हजार रुपये प्रति किलोने दराने सहा पाटी आणल्या.
त्यानंतर बोअर जातीच्या बोकडाच्या आधारे उस्मानाबादी शेळीची संकरित जात तयार करण्यास सुरुवात केली. आज काही पिढ्यांपर्यंत हा संकर करून पैदास केली जात आहे. अभ्यास म्हणून बीटल, जमनापारी व सिरोही या जातीच्या शेळ्यांचेही संगोपन होते.
व्यवस्थापनातील बाबी
बंदिस्त पद्धतीने शेळीपालन. त्यामुळे व्यवस्थापनातील बाबी. खाद्य या बाबी नियंत्रणात ठेवता येतात.
३२० बाय ३८ फूट व २८० बाय ६० फूट आकाराची दोन शेडस. त्यात २५ बाय २३ फुटाचे कप्पे.
नर, मादी, पिले यांची स्वतंत्र कप्प्यांमध्ये विभागणी.
शेळ्या मोकळ्या बांधण्यासाठी दोन ठिकाणी तार कुंपण. शेडच्या बाहेर गुळी ठेवण्यासाठी मोठे शेड.
चार मजूर तैनात. त्यांना राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या.
बंधू संजय यांनी परदेशातून यंत्र पाठवले आहे. त्यावरून शेळी गाभण आहे की नाही हे समजते. त्यानुसार पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन त्यांचे स्वतंत्र संगोपन होते.
हिरव्या चाऱ्यासाठी अडीच एकर क्षेत्र. हायड्रोपोनिक तंत्राने दोन युनिटद्वारे मका चाऱ्याचे उत्पादन.
आठवड्याला आठ ते दहा किलो चारा त्यातून मिळतो. त्यातून खाद्यखर्चात बचत झाली आहे. सोयाबीन, हरभरा व तुरीची गुळी घरच्या शेतातून होते उपलब्ध.
जागेवरच मिळवले मार्केट
तुळसीदास सांगतात की बोअर बकरा लाखाला विकला जाऊ शकतो यामुद्द्यावरून काहींनी वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सुमारे ११० किलो वजनाचा बकरा पैदाशीसाठी दीड लाखांना विकल्याचे कळाल्यानंतर सर्वांनाच माझ्या व्यवसायाचे महत्त्व पटले.
आज उस्मानाबादी पाटी प्रति किलो ५०० रुपये, संकरित शेळी ७०० रुपये, तर पैदाशीसाठी बोकड १५०० रुपये प्रति किलो दराने विकण्यात येतो. आठ वर्षात ५० हून अधिक बकऱ्यांची विक्री झाली. आजपर्यंत एकही शेळी बाजारात नेऊन विकावी लागली नाही. सर्व विक्री शेडवरून झाली.
स्थानिकसह लातूर, नांदेड, यवतमाळ, पुणे, मुंबई तसेच परराज्यांतून ग्राहक येतात. सध्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य होत नाहीय एकदा यवतमाळ येथील प्राध्यापक महाशयांना बोअर व उस्मानाबादी संकर खरा वाटला नाही. मात्र त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी अनेक ग्राहक मिळवून दिले.
उल्लेखनीय उलाढाल
महिन्याला चार ट्रॉली लेंडीखत मिळते. या भागात द्राक्ष क्षेत्र वाढत असल्याने त्यास चांगली मागणी आहे. साडेसात हजार रुपये प्रति ट्रॉली दराने त्याची विक्री होते. या उत्पन्नामुळे व्यवसायातील खर्चात मोठी बचत झाली आहे, बायोगॅसचा मोठा आधार आहे. शेडमध्ये सौर पॅनेल यंत्रणा उभारून ऊर्जानिर्मिती सुरु आहे.
त्यातून चोवीस तास वीज उपलब्ध होत आहे. व्यवसायातील एकूण उत्पन्नातून काही लाखांची उलाढाल करणे शक्य झाले आहे. कुटुंबाने आर्थिक प्रगती करताना चार ट्रॅक्टर्सची खरेदी केली. बावीस एकर जमीन घेतली. पाच बोअर्स, दोन विहिरी आहेत. खासगी कंपनीसाठी दूध संकलन केंद्र उभारून दिवसाला दहाहजार लिटरपर्यंत संकलन केले जाते. कुटुंबातील नव्या पिढीने उच्चशिक्षण घेतले असून पाच जण डॉक्टर आहेत.
तुळशीदास जमाले ९५२५२५७९७९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.