Floriculture : संकटांमधून सावरत फुलवले फुलशेतीतून सुखाचे रंग

Flower Farming : गारपीट तसेच विविध संकटांनी जानोरी (जि. नाशिक) येथील अल्पभूधारक गणेश वाघ यांच्या कुटुंबाची वारंवार कसोटी पाहिली. मात्र कुटुंबाने धैर्याने सर्व संकटांचा सामना केला. सूक्ष्म अभ्यास, तांत्रिक ज्ञानात पारंगत होऊन पॉलिहाउसमधील फुलशेती व शेवंती पिकात प्रावीण्य मिळवले.
Floriculture
FloricultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नाशिक जिल्ह्यातील जानोरी (ता. दिंडोरी) येथील युवा शेतकरी गणेश वाघ (वय वर्षे ३७) यांची वडिलोपार्जित अवघी सव्वा एकर शेती आहे. वडील गोपीनाथ पारंपरिक पद्धतीने भाजीपाला पिके घ्यायचे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने गणेश यांना दहावीत असतानाच शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर पूर्णवेळ त्यांनी शेतीलाच वाहून घेतले.

संकटांनी घेतली परीक्षा

नव्या पीक पद्धतीचा अवलंब, प्रयोगशीलता गणेश यांनी पहिल्यापासून जपली. सन २००८ च्या दरम्यान तास-ए- गणेश, ‘फ्लेम’ या द्राक्षवाणांची लागवड केली. मात्र गारपिटीने मोठे नुकसान झाले.

पण हिंमत व जिद्द न हारता हे पीक घेणे थांबवून २०११ मध्ये घर व जमीन तारण ठेवून १४ लाखांचे कर्ज घेतले. वीस गुंठ्यांत पॉलिहाउस उभारले. त्यात रंगीत ढोबळी मिरची घेतली. उत्पादन यशस्वी मिळाले पण अल्प दरांमुळे हाती काही लागले नाही. संकटाने पुन्हा परीक्षा पाहिली. तरीही हताश न होता पुन्हा नवे पर्याय गणेश शोधू लागले.

फुलशेतीचा पर्याय, पुन्हा संकटांनी घेरले

सन २०१० गणेश यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातून हरितगृहातील पीक उत्पादन तंत्रज्ञान विषयातील प्रशिक्षण घेतले. पुन्हा पदरमोड करून भांडवलाची उपलब्धता केली. सन २०१३ मध्ये विविध रंगांच्या डच गुलाबांची लागवड केली. गुणवत्तापूर्ण उत्पादन ही जमेची बाजू होती.

दर चांगले दर मिळत होते. पण सन २०१४ आणि २०१५ मध्ये दुष्काळाने घेरले. टँकरद्वारे पाणी विकत घेतले. अखेर भांडवल संपल्याने डोळ्यादेखत गुलाब बाग जळून गेली. सुमारे ६५ लाखांचे कर्ज डोक्यावर झाले. जमीन आणि पॉलिहाउस विकण्यापर्यंत वेळ आली. तरीही परिवाराने उरलेसुरले सर्व ध्येय व बळ एकवटून नवी वाट शोधण्यास सुरुवात केली.

शेवंतीच्या शेतीतून परिवार सावरला

परिचयाच्या व्यक्तीच्या माध्यमातून सहा टक्के दराने खासगी कर्ज घेऊन गणेश यांनी २०१६ मध्ये शेवंतीच्या रूपाने फुलशेतीचा नवा अध्याय सुरू केला. पहिली दोन वर्षे हे पीक समजून घेण्यात गेले.

अभ्यास, व्यवस्थापनात तडजोड नसणे व गुणवत्ता जपणे यातून हे पीक गणेश यशस्वी करीत चालले. आर्थिक स्थैर्यता मिळाली. बँकेचे कर्ज फेडता आले. दरम्यान, काही तरुण फूल उत्पादकांसोबत गणेश जोडले गेले. सह्याद्री शेतकरी कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांची भेट झाली. त्यातून नवे वाण, सुधारित लागवडीच्या अंगाने चर्चा झाली.

त्यानंतर गणेश यांनी कौटुंबिक फुलशेती सांभाळून स्थानिक व्यावसायिक फुलशेती प्रकल्पात व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले. येथे जिप्सोफिला, लिलियम, ओरिएंटल, इयुस्टोमा, लिमोनियम, शेवंती, कार्नेशन अशा आदींचा अनुभव त्यांना मिळाला. त्यातून आत्मविश्‍वास खऱ्या अर्थाने वाढला.

दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर फूलशेतीत काम करणारे अविनाश मोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. गरिबी, हालअपेष्टा यासह अनेक संकटे सोसून आज वाघ कुटुंबाने फुलशेतीतून आपल्या आयुष्यात आनंद, समाधानाचे रंग फुलवले आहेत. वडील गोपीनाथ, आई सुमन तसेच पत्नी जयश्री यांची गणेश यांना मोठी मदत झाली आहे.

Floriculture
Floriculture : जुन्नर तालुक्यात फुलले बटन फुलांचे मळे

बहरलेली शेवंतीची शेती (ठळक बाबी)

  • आज स्वतःच्या एक एकरासह ‘लीज’द्वारे पाच एकरांत पॉलिहाउसमध्ये शेवंती.

  • सफेद, पिवळी, लाल, गुलाबी, केसरी, ग्रीन व यलो बटन अशा अधिक उत्पादनक्षम ‘रॉयल्टी पेड’ वाणांची लागवड.

  • वर्षभर विक्रीसाठी फुलांची उपलब्धता होईल असे नियोजन.

  • संपूर्ण लागवड क्षेत्र ‘सीसीटीव्ही’ निगराणीखाली आहे.

  • काढणीपश्‍चात दोन शीतगृहांची सुविधा. पाच हजार बंडल्स साठवणुकीची व्यवस्था.

  • सुमारे ४० जणांना रोजगार दिला आहे.

  • ‘गणेश फ्लोरिटेक’ असे ब्रँडिंग.

  • उत्पादन, विक्री, अर्थकारण

  • वर्षभरात सुमारे १५ बॅचेस तर प्रति बॅच चार हजार बंडल सरासरी उत्पादन. प्रति बंडल १० काड्या, तर प्रति काडी ५ ते ६ फुले.

  • लग्न समारंभ, गणेशोत्सव, नवरात्र- दसरा, दिवाळी, ख्रिसमस यांसह शिक्षक दिन, मातृदिन, अन्य समारंभ, पंचतारांकित हॉटेलमध्ये सजावट आदीसाठी शेवंतीच्या विविध फुलांना मोठी मागणी.

  • कोरूरगेटेड बॉक्समधून मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळूर, सुरत, दिल्ली आदी शहरांमध्ये पाठवणूक.

  • ‘ब्रँडिग’ व ‘पॅकिंग’ आकर्षक असल्याने व्यावसायिक दर्जा वाढला आहे.

  • प्रति बंडल किमान ८० रुपये, तर कमाल १२० ते १३० रुपये दर.

Floriculture
Floriculture : फूलशेतीत सामूहिक शेतीचा पॅटर्न राबविण्याची गरज

पुरस्काराने सन्मान : गणेश ‘फ्लोअर ग्रोअर्स कौन्सिल ऑफ इंडिया’चे आजीवन सदस्य आहेत. कृषी विभाग- आत्मा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे. ‘आत्मा’ नाशिक यांच्या वतीने ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ने त्यांना सन्मान झाला आहे. शेतकरी सातत्याने त्यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन घेत असतात.

जागतिक पातळीवर अभ्यास

शेतीसह बाजारपेठेचा सूक्ष्म अभ्यास, विविध संकटांवर मात करून न थांबता पुढे जाण्याची वृत्ती यातून गणेश यांनी फुलशेतीत मास्टरी मिळवली आहे. केनिया व थायलंड देशांना भेटी देऊन तेथीलविविध फुलांचे ‘रॉयल्टी पेड’ वाण, रोपवाटिका, पैदासकारांशी संवाद याद्वारे आधुनिक फुलशेतीचे तंत्र अभ्यासले आहे.

बँकॉक येथे ऑर्किड फूलशेतीचा अभ्यास केला आहे. बंगळूर, कोलकता, पुणे येथीलफूलशेती अभ्यासली आहे. पुष्पविज्ञान संशोधन संचालनालय, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, विविध परिसंवादांमध्ये सहभाग घेऊन गणेश ज्ञानसमृद्ध झाले आहेत.

गणेश वाघ ९७६६१७८८२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com