Banana Business : थेट निर्यातीतून केळीचा ब्रॅण्ड केला लोकप्रिय

Banana Business Management : अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील अल्पभूधारक लुकमान इस्माईल शेख यांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सुरवातीच्या काळात मोठा संघर्ष करावा लागला. मात्र अत्यंत मेहनतीतून त्यांनी केळी व्यापार व त्यापुढे जाऊन केळी निर्यात सुविधा केंद्राची उभारणी केली. आज आखाती देशात थेट निर्यात यशस्वी करून आपला केळी ब्रॅण्ड लोकप्रिय केला आहे.
Luqman Ismail Shaikh
Luqman Ismail ShaikhAgrowon

चंद्रकांत जाधव

Success Story of Farmer : जळगाव जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादनासह काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, निर्यात प्रक्रियेतही आघाडीवर आहे. अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हे तापी नदीकाठी व मध्य प्रदेशच्या सीमेवरील गाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. काळी कसदार, उत्पादनक्षम जमीन परिसराला लाभली आहे. हतनूर धरणातील ‘बॅकवॉटर’चा देखील लाभ होतो. जलसाठे मुबलक असल्याने शिवार हिरवेगार आहे.

लुकमान यांचा संघर्षकाळ

गावातील लुकमान शेख यांनी आज यशस्वी केळी निर्यातदार अशी ओळख तयार केली. मात्र त्यासाठी त्यांना आयुष्यात सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला आहे. वडील इस्माईल लाकूड फोडण्याचा व्यवसाय करायचे. लुकमान यांनी बंधू इरफानसह पडेल ते काम केले. वयाच्या पंधराव्या वर्षापासून मिस्त्रीच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून ते राबू लागले.

अल्पशा मजुरी मिळे. पाच वर्षे अनुभव घेतला. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अडचणी वाढल्या. संघर्षाची स्थिती असल्याने शिक्षण फक्त चौथीपर्यंत घेणे शक्य झाले. शेती अल्प होती. त्यावर कुटुंबाची गुजराण अशक्य होती. पुढे धाडस करून लुकमान यांनी बांधकाम व्यवसायातील ठेकेदारीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून दोन पैसे हाती राहू लागले. परिसरात सर्वत्र केळीच्या बागा असल्याने शेतकरी, व्यापारी, बाजारपेठ यांची माहिती होत या क्षेत्राशी संबंध येत गेला.

Luqman Ismail Shaikh
Banana Farming : समस्याग्रस्त ऊसशेतीवर केळी ठरली पर्याय

केळी पिकवणी केंद्रास सुरुवात

सन २०१५ मध्ये मध्य प्रदेशात केळी पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. तेथील खरेदीदार, मागणी यांचा त्या निमित्ताने अभ्यास केला. कुणाशीही जुळवून घेण्याचा स्वभाव, प्रयत्नवाद, अभ्यासूपणा व धाडस यामुळे यश मिळत गेले. अनेकदा तोटाही सहन करावा लागला. पण लुकमान खचून गेले नाहीत. दरम्यान अंतुर्ली फाट्यानजिक स्वतःचे केळी पिकवणी केंद्र (रायपनिंग चेंबर) उभे करण्यापर्यंत टप्पा गाठला.

परिसरातील शेतकऱ्यांशी चांगली ओळख होती. त्यातून दर्जेदार केळी उपलब्ध होत गेली. पुढे व्यवसाय भरभराटीस आला. आज केळीची थेट खरेदी करून आपल्या केंद्रात प्रक्रिया होऊन मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, खंडवा, उज्जैन, सारंगपूर, तराना, मक्शी आदी भागांत ती दररोज १४ टनांपर्यंत पाठवली जातात. तेथे व्यापारी, खरेदीदारांचे मोठे जाळे तयार केले आहे.

‘ब्रॅण्ड’ तयार करून निर्यातीचे धाडस

केळीची पाठवणूक व त्यातील यशातून हुरूप वाढला. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने पुढील प्रयत्न सुरू केले. या क्षेत्रातील आपले मित्र, बाजारपेठेतील कल ओळखून आखाती देशांत थेट केळी निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी प्री कुलिंग व ‘कोल्ड स्टोअरेज (शीतगृह) अशा निर्यात प्रक्रिया सुविधा केंद्राची गरज होती.

त्यादृष्टीने २०० टन क्षमतेचे प्रक्रिया सुविधा केंद्र उभारले.त्यासाठी तीन कोटींची गुंतवणूक केली आहे. यात ३३ लाख रुपये अनुदान कृषी विभागाकडून मिळाले.केळीचा ब्रॅण्ड तयार केला आहे. तेरा किलो क्षमतेच्या बॉक्समध्ये पॅकिंग होते. मुंबईहून आखातात म्हणजे दुबई, इराण, इराक, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया येथे केळी रवाना होतात. दर महिन्याला ५० कंटेनरपर्यंत केळीची निर्यात होते.

Luqman Ismail Shaikh
Banana Farming : तरुण शेतकऱ्यांच्या एकोप्यातून केळी निर्यात

काढणीपश्‍चात यंत्रणेतील बाबी

मनमिळाऊ स्वभावामुळे केळीच्या खरेदीला अडचणी येत नाहीत. बाजारातील प्रचलित दरांप्रमाणे शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. मजूर थेट शेतात जाऊन घडांची काढणी करतात. ते शेताबाहेर व्यवस्थित हाताळून आणले जातात. फण्या स्वच्छ धुऊन सुकविल्या जातात. त्यानंतर ही केळी प्रीकूलिंग चेंबरमध्ये ठेवली जाते.

लुकमान सांगतात, की केळीच्या निर्यातीत जोखीमही अधिक आहे. अनेकदा मालवाहू जहाज वेळेवर न मिळणे व अन्य समस्यांमुळे ‘लोडिंग’ बंद असते. काही वेळा पेमेंट अडकते. काही वेळेत मोठा तोटाही होतो. दर महिन्याला सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते. या व्यवसायातून पाचशे मजुरांना रोजगार मिळाला आहे. लुकमान सांगतात की मजूर म्हणून मी देखील एकेकाळी राबलो आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी माहीत असल्याने त्यांचे निवारण करणे मला शक्य होते.

भविष्यात प्रक्रियेचा प्रयत्न

मुक्ताईनगरचा तापीकाठ व नजीकच्या रावेरसह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागात केळीसह हळदीचेही उत्पादन घेतले जाते. ही संधी पाहता भविष्यात केळी व हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याद्वारे केळीचे दर्जेदार चिप्स व हळद पावडर निर्मिती करून आखातात पाठवण्याचा मानस आहे. दीड एकरांत त्यांनी केळीची लागवडही केली आहे.

मार्गदर्शन : लुकमान हे तज्ज्ञ, अभ्यासू, प्रगतिशील शेतकरी, व्यापारी आदींच्या सतत संपर्कात असतात. त्यातूनच केळी वाण, केळी लागवडीच्या पद्धती, बाजारपेठांमधील मागणी या बाबी माहीत होऊन सुधारणा करता येतात. ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, विषय विशेषज्ञ किरण जाधव, सल्लागार प्रशांत पाटील आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

लुकमान शेख ९८५०८३००७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com