सुदर्शन सुतार ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : सोलापूर ः दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी, फताटेवाडी, होटगी यासह अक्कलकोटच्या आंदेवाडी, केगाव, नागणसूर या ऊस पट्ट्यात अलीकडे निर्माण झालेली पाण्याची समस्या, उसाची घटणारी उत्पादकता, उसाला मिळणारा दर आणि त्याचाही असलेला बेभरवसा याचा विचार करून पारंपरिक पद्धतीने ऊस पिकविणाऱ्या या भागातून सुमारे ४०० शेतकऱ्यांनी एकत्रित येत गेल्या तीन-चार वर्षांपासून केळीचा पर्याय निवडला आहे. आज या भागात तब्बल २२५ एकरपर्यंत केळीचे क्षेत्र विस्तारले आहे, शिवाय गुणवत्तापूर्ण, दर्जेदार उत्पादनामुळे निर्यातीतही शेतकऱ्यांनी आघाडी घेतली आहे.
दक्षिण सोलापुरातच कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले श्रीधर गावंडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित करत ही कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार केळी उत्पादन शेतकरी घेत आहेत. केळीची स्थानिक बाजारात विक्री करण्यासह थेट इराण, इराक, दुबई या देशांना केळीची निर्यातही करत आहेत. विशेषतः केळीच्या व्यवस्थापनात पारंपरिक पद्धतीला छेद देत शेतकरी केळीतील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत.
श्री. गावंडे यांनी आंदेवाडीतील त्यांच्या स्वतःच्या शेतात केळी लागवड करतानाच अन्य शेतकऱ्यांनाही केळीसाठी प्रोत्साहन दिले. त्यातूनच या दोन्ही तालुक्यांतून ४०० शेतकरी तयार झाले. गावंडे यांनी कृषी अधिकारी म्हणून या भागात काम केल्याने त्यांना शेतकऱ्यांची मानसिकता, इथल्या प्रश्नांची चांगली माहिती होती. त्यातही वर्षानुवर्षे ऊस होणाऱ्या या पट्ट्यात केळी रुजविणे अवघड होते, पण केळीच का ? याचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. तीन वर्षापूर्वी लागवडीआधी केळीतील तज्ज्ञ, अभ्यासक सागर कोपर्डेकर (कोल्हापूर) यांचे खास चर्चासत्र ठेवले. त्यातून शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान झाले आणि पुढे टप्प्या-टप्प्याने शेतकरी एकत्र आले. आज केळी उत्पादक म्हणून सुमारे ४०० शेतकऱ्यांचा ग्रुप तयार झाला आहे. त्यांचा व्हॅाटसअॅप ग्रुपही तयार केला आहे. त्यात केळीतील अडचणी, शंका-समाधान यावर चर्चा होते. त्यातूनच बहुतेक सर्व शेतकरी उत्तम केळी उत्पादक म्हणून नावारूपास येत आहेत. यापैकी बहुतेक शेतकरी एकरी किमान २५ ते ३० टनापर्यंतचे उत्पादन घेत आहेत. केवळ उत्पादनच नव्हे, तर निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत.
यंदा ४ हजार टनाची निर्यात
लागवडीच्या दुसऱ्याच वर्षी २०२२ मध्ये तीन शेतकऱ्यांनी पहिल्यांदा निर्यात करण्यास सुरवात केली. त्यावर्षी १०० टन केळीची निर्यात झाली. २०२३ मध्ये ही संख्या सातने वाढली. तर केळीची निर्यात १५० टन झाली, तर यंदा तब्बल ३६ शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादन घेत निर्यात केली. त्यातून तब्बल ४ हजार टन केळी यशस्वीपणे निर्यात झाली आहे. यंदा निर्यातीसाठी प्रतिकिलो सरासरी १४ ते १७ रुपये आणि सर्वाधिक २७ रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. अद्यापही काही शेतकऱ्यांचे प्लॅाट सुरूच आहेत. पूर्वी या भागात साधे व्यापारी किंवा निर्यातदार फिरकत नव्हते, पण आज केवळ केळीच्या गुणवत्तेमुळे निर्यातदार थेट बांधावर पोचत आहेत.
शेतकऱ्यांचा प्रतिसाद वरचेवर वाढतो आहे. एकत्रित येत केळी उत्पादन घेतले जात असल्याने सर्वांचाच फायदा होतो आहे. यंदाच्या वर्षीही एप्रिल अखेरपर्यंत जवळजवळ ७० हजार रोपांची नव्याने लागण होणार आहे.
- श्रीधर गावंडे, निवृत्त कृषी अधिकारी, सोलापूर.
उसातून आम्हाला काहीच मिळत नव्हते, पण आता केळीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. केळीने आमच्या शेतीचाच नव्हे, तर आमच्या आयुष्यातच बदल झाला आहे.
- सुभाष हिप्परगे, केळी उत्पादक, आहेरवाडी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.