Indian Agriculture : अभ्यास, तंत्रशुद्ध शेतीतील बालाजी

Mechanized Agriculture : पेनूर (जि. नांदेड) येथील बालाजी लोखंडे या युवकाने प्रत्येक पिकाचा अभ्यास करून तसेच तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून शेतीतील खर्च कमी करण्यासह उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नांदेडपासून सुमारे ४५ किलोमीटरवर पेनूर (ता. लोहा) गाव आहे. येथील बालाजी बाबूराव लोखंडेहा २८ वर्षे वयाचा युवक वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घरची एकूण १८ एकर शेती समर्थपणे सांभाळतो आहे. सन २०१८ मध्ये बालाजी कृषी पदवीधर झाले. वडील पूर्णवेळ शेतीच करायचे. घरची आर्थिक परिस्थिती कमजोर होती. आणि शेतीचीही मोठी आवड होती. या सर्व कारणांमुळे बालाजी यांनी शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीच करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर प्रत्येक पिकाचा सूक्ष्म अभ्यास, शास्त्रीय तंत्रज्ञान समजावून घेणे, त्यासाठी शास्त्रज्ञांच्या संगतीत राहणे यातून त्यांनी सन २०१८ नंतर शेतीचा झपाट्याने विकास करण्यास सुरुवात केली. आज मातीसोबत शेतीचीही उत्पादकता वाढवण्यात ते यशस्वी झाले आहेत. एकाच जमिनीत उसासारखे पीक सातत्याने नको व जमिनीचा पोत टिकून राहावा यासाठी बालाजी यांनी सोयाबीन, हरभरा, तूर, अशी विविधताही ठेवली. दहा एकरांत सोयाबीन, पाच एकरांत ऊस, एक एकर मूग तर एका एकरात तुती अशी आजची लागवड स्थिती आहे.

टोकण व बेड पद्धतीचा वापर

उन्हाळ्यात नांगरट केल्यानंतर छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने साडेतीन फूट व साडेचार फूट असे दोन गादीवाफे (बेड) लागवड अंतर पद्धतीचा वापर होतो. सोयाबीननंतर ऊस घ्यायचा असल्याने या साडेचार फुटी पद्धतीचा वापर होतो. यात शून्य मशागत तंत्राचा वापर तर होतोच. शिवाय ऊस घेतेवेळी मशागतीच्या सर्व कामांसाठी एकरी साडेसहा हजारांपर्यंत होणारा खर्चही वाचतो. बेड तयार करताना एकरी एक पोते १२-३२- १६ हे खत मिसळले जाते.

पावसाचे आगमन होताच टोकण पद्धतीने व रुंद सरी- वरंबा पद्धतीने सोयाबीनची लावण होते. त्यासाठी बीबीएफ यंत्र भाडेतत्त्वावर आणण्यात येते. टोकण पद्धतीत एकरी १५ किलो बियाणे लागते. साडेतीन फुटी बेडवर सोयाबीनच्या दोन ओळी व एक तुरीची असते. तर साडेचार फुटी बेडवर सोयाबीनच्या तीन ओळी घेतल्या जातात. या पद्धतीमुळे पिकांमध्ये हवा खेळती राहते. शेंगा लागण्याचे प्रमाण सलग पेरणी केलेल्या सोयाबीनपेक्षा अधिक असते असे बालाजी सांगतात. आंतरमशागतीच्या कामांसह पावसाचा ताण पडलेल्या काळात पिकाला पाणी देण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा फायदा होतो.

Indian Agriculture
Success Story : ‘परिवर्तना’तून झालो सक्षम

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

बालाजी सोयाबीनच्या बियाण्यांसाठी शक्यतो बाजारात जात नाहीत. दरवर्षी घरी उत्पादित झालेल्या सोयाबीनचाच ते पेरणीसाठी वापर करतात. त्यामुळे बियाण्यावरील खर्चही कमी होतो. कृषी विद्यापीठांकडील सुधारित वाणांचा वापर होतो. यंदा केडीएस ७२६, केडीएस ७५३ या वाणांचीलावण केली आहे. तणाचे नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर होतो. किडी-रोगांच्या नियंत्रणासाठीही गरजेनुसार तीन फवारण्या केल्या जातात.

एकरी उत्पादकता वाढ

अलीकडील वर्षांत एकरी १४ ते १५ क्विंटल व काही वेळा १७ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे बालाजी सांगतात. पेरणीपूर्व चांगली मशागत, वेळेवर पेरणी, खतांचा संतुलित वापर, किडी-रोगांचे योग्य व्यवस्थापन, सूक्ष्मसिंचनाचा वापर, रोपांची संख्या योग्य राहण्यासाठी बीबीएफ पद्धतीचा वापर आदी नियोजनातून या उत्पादनात सातत्य राखल्याचे ते म्हणतात.

सुपरकेन नर्सरी तंत्राने ऊस लागवड

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (राहुरी) निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी उसासाठी विकसित केलेल्या सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बालाजी करतात.

एका चौरस फुटांमागे एक रोप तर एकरी सात ते आठ हजारांपर्यंत ते रोपांची संख्या ठेवतात. कोणत्याही पिकात रोपांची संख्या किती ठेवायची याचे शास्त्र आहे. त्याचा अभ्यास करूनच नियोजन करीत असल्याचे बालाजी सांगतात. पूर्वहंगामी उसाचे एकरी ५० ते ७० टन उत्पादन ते घेतात. उसात हरभऱ्याचे आंतरपीकही घेतात.

प्रयोगशीलता जपली

बालाजी कायम नव्या प्रयोगांच्या शोधात असतात. प्रत्येक पिकाचा अभ्यास करणे व शास्त्रीय तंत्र समजावून घेण्याची त्यांची धडपड असते. रुंद सरी वरंबा (बीबीएफ) पद्धतीचा सर्व हंगामी पिकांमध्ये वापर करतात. हिरवळीचे खत, शून्य मशागत तंत्राकडेही ते वळले आहेत. यंदा रेशीम शेतीसाठी एक एकरांत तुती लागवड केली आहे. १८ एकरांपैकी तीन एकर शेतीचे सेंद्रिय प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदाचे दुसरे वर्ष आहे. या शेतात सोयाबीन, मूग, हरभरा, तूर यांसह भाजीपाला पिके घेतली जात आहेत. सेंद्रिय शेतीमालाला चांगला दर मिळावा असा बालाजी यांचा प्रयत्न आहे. सन २०२३ मध्ये पाच एचपी विद्युतपंप चालेल एवढ्या क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा उभारली आहे. शेतात डीपीचीही सोय आहे.

Indian Agriculture
Agriculture Success Story : शून्यातून गाठला प्रगतीचा सोपान

शेतीतील प्रगती

लोखंडे कुटुंबाने मोठ्या कष्टाने शेतीतून प्रगती केली. बालाजी यांच्या आजोबांनी सुमारे सहा एकर, तर वडिलांनी सात एकर शेती खरेदी केली. शेतीतील उत्पन्नातूनच बालाजी यांचे शिक्षण तसेच तीन बहिणींची विवाह पार पडले. लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळींना दोन हजार वृक्षांची भेट या कुटुंबाने दिली. बालाजी यांना आई सुंदरबाई यांचे मार्गदर्शन तर पत्नी पार्वती यांची साथ मिळते. श्रीमय व मनस्वी अशी दोन गोंडस मुले आहेत.

सेवाभावी वृत्तीचे बालाजी

बालाजी यांनी केवळ स्वतःच्या शेतीच्या प्रगतीकडे लक्ष दिलेले नाही. तर गरजू, तसेच निराश झालेल्या शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढावा यासाठी देखील ते प्रयत्न करतात. शेतीतील खर्च कमी करण्यासाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. शेतकरी आत्महत्या विदारक सत्य या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण लेखन त्यांचे सुरू आहे. सोयाबीन पिकातील सुधारित तंत्रज्ञानाचा गावातील शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. त्यातून सोयाबीनची रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड वाढली आहे. एका शेतकऱ्याची म्हैस मृत पावल्याने त्याला मोठी निराशा आली होती. अशावेळी पुढाकार घेऊन बालाजी यांनी त्यास सुमारे साडेसदतीस हजारांची शासकीय मदत मिळवून देत त्याला पुन्हा शेतीत उभे केले.

सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर

वडील बाबूराव यांनी १९९६ मध्ये गोदावरी नदीवरून पाइपलाइनची व्यवस्था केली. त्यानंतर २०१२ मध्ये कोणतेही अनुदान न घेता विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. यामुळे शेतीला बारमाही पाण्याची सोय झाली आहे. पाणी मुबलक असले तरी बालाजी यांनी पाटपाण्याचा वापर केला नाही.यापूर्वी मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण असंतुलित होऊन जमीन टणक झाली होती. त्यामुळे पिकांच्या आवश्यकतेनुसार पाणी देण्यासाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर सुरु केला. आज सहा एकरांसाठी ठिबक तर दोन तुषार संच आहेत. पाच एकर उसालाही सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर होतो. त्यातून उत्पादकतेत फरक दिसल्याचे ते सांगतात.

दुग्ध व्यवसायाची जोड

शेतीतील खर्च कमी करण्यासाठी बालाजी शेळी, गाय व म्हैसपालन करतात. दररोज दहा लिटर दुधाची विक्री ते ५० रुपये प्रति लिटर दराने करतात. या पूरक व्यवसायांमधून वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतउत्पन्न मिळते. घरी आंदण मिळालेली एक गाय आहे. घरचे पशुधन असल्याने त्यापासून मिळणाऱ्या शेणखताचा शेतीत वापर होतो.

बालाजी लोखंडे,

९३७३५५६२०६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com