Soybean Farming : सोयाबीनसाठी रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान

Soybean Cultivation : मराठवाडा विभागातील मध्यम ते भारी जमिनीचे प्रमाण अधिक आहे. अशावेळी पडणा­ऱ्या पावसाचे प्रमाण व तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेता विविध पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) केल्यास फायदेशीर ठरते.
Soybean Farming
Soybean FarmingAgrowon

डॉ. आनंद गोरे, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. पपिता गौरखेडे

Soybean Varamba Sari Technology : या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक असेल, अशी शक्यता आहे. अशावेळी पावसाचे पाणी शेतातून सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि अधिक पावसाचा पिकांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने सोयाबीन लागवड करावी.

बीबीएफ पद्धतीमुळे अधिक पावसाच्या वर्षात पीक वाचविण्यात यश आल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तसेच कमी पाऊस झाल्यास पडणाऱ्या पावसाचे पाणी सरीमध्ये मुरते, त्याचा पीक वाढीसाठी फायदा झाला आहे.

रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी स­ऱ्यांमध्ये मुरते. मूलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. विशेषत: पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो, त्याची तीव्रता कमी होते.

अधिक पाऊस झाल्यास किंवा अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूंकडील स­ऱ्यामुळे मदत होते.

चांगली मशागत होऊन वरंबे तयार होतात. हवा खेळती राहून पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. बियाण्याची उगवण चांगली होते. पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते. ही पद्धत सर्व कोरडवाहू पिकांसाठी उपयोगी आहे.

Soybean Farming
Soybean Seed Treatment : सोयाबीनवरील किड, रोग टाळण्यासाठी या बीजप्रक्रिया करा

यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदीचे वरंबे दोन्ही बाजूंनी स­ऱ्यांसह तयार करणे, पेरणी करणे, खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात. मजूर आणि ऊर्जेची बचत होते. यंत्राने सरासरी ४ ते ५ हेक्टर क्षेत्र प्रति दिन पेरणी करता येते.

सपाट वाफे पद्धतीच्या तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत अधिक जलसंधारण होते. २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ होते.

यंत्राच्या साह्याने पिकानुसार योग्य रुंदीचे वरंबे तयार करून जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी आणि कमी अंतरावरील पिकाच्या तीन ते चार ओळी रुंद वरंब्यावर येतील यानुसार पेरणी करता येते.

यंत्राचा वापर

ट्रक्टरचलित यंत्रामध्ये ३० ते ४५ सेंमीवर बदलासह चार फण आणि ३० ते ६० सेंमी रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते १८० सेंमी अंतरावर कमी जास्त करत येणारे दोन सरींचे फाळ आहेत. गरजेनुसार ६० ते १५० सेंमी रुंदीचा रुंद वरंबा तयार करून त्यावर ३० ते ४५ सेंमी अंतरावरील २ ते ४ ओळी घेता येतात.

तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकण यंत्राच्या साह्याने बियाणे आणि खत पेरणी करता येतात. यंत्रामध्ये पिकाच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारस केलेल्या अंतरानुसार कमी,जास्त करता येते. हेक्टरी आवश्यक झाडांची संख्या ठेवता येते.

एका रुंद वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या तीन ते चार ओळी घेता येतात. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी किंवा ४५ सेंमी ठेवावे किंवा गरजेनुसार कमी, जास्त करावे (उदा. ३७.५ सेंमी). यासाठी बीबीएफ यंत्राच्या फणांतील अंतर कमी, जास्त करावे. आवश्यक रुंदीचे वरंबे तयार होण्यासाठी ठरावीक अंतरावर खुणा करून (दोन फाळांत आवश्यक अंतर) त्यावर ट्रॅक्टरला जोडलेले बीबीएफ यंत्र चालवावे. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी आवश्यकतेनुसार ३० ते ४० सेंमी रुंदीच्या पडतात.

Soybean Farming
Soybean Varieties : सोयाबीन वाणांची गुणवैशिष्ट्ये

उदा . क्र. १ :

एका वरंब्यावर सोयाबीनच्या चार ओळी (३० सेंमी अंतर) घ्यावयाच्या असतील तेव्हा सरी घेण्यासाठीच्या खुणा १५० सेंमी (१.५ मीटर) अंतरावर ठेवून (दोन फळांतील अंतर १५० सेंमी) ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्र फळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे.

यामुळे १२० सेंमी अंतरावर घेता येतात. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी ३० सेंमी रुंदीच्या पडतात.

उदा . क्र. २ :

एका वरंब्यावर ४५ सेंमी अंतरावर सोयाबीनच्या तीन ओळी घ्यावयाच्या असल्यास त्यासाठी १३५ सेंमी रुंदीच्या रुंद वरंबा तयार करावा लागतो. त्यासाठी १८० सेंमी वर खुणा करून (दोन फाळांतील अंतर १८० सेंमी) बीबीएफ यंत्र फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. यावेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी ४५ सेंमी रुंदीच्या पडतात.

उदा. क्र. ३ :

जेव्हा एका वरंब्यावर ३० सेंमी अंतरावर सोयाबीनच्या तीन ओळी घ्यावयाच्या असल्यास आणि जमिनीच्या प्रकारानुसार सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी ४५ सेंमी रुंदीच्या पाहिजे असल्यास त्यासाठी १०५ सेंमी रुंदीच्या वरंबा तयार करावा लागतो. यासाठी १५० सेंमीवर खुणा करून म्हणजेच दोन फळांतील अंतर १५० सेंमी ठेवून बीबीएफ यंत्र फळाच्या मध्य खुणेवर ठेवून चालवावे. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी या ४५ सेंमी रुंदीच्या पडतात.

टीप :

तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणीपूर्व तणनाशकाचा वापर करावा किंवा सर्व क्षेत्रावर समान पद्धतीने आंतरमशागत करावी. बैलाच्या कोळप्याच्या किंवा छोट्या रिजरच्या साह्याने सऱ्या पुन्हा काढून घ्याव्यात.

सोयाबीन आणि तूर आंतरपीक घेण्यासाठी रुंद वरंबा सरी यंत्राचा वापर करता येतो.

प्रयोगाचे निष्कर्ष

प्रयोगामध्ये सोयाबीनची पारंपरिक सपाट वाफे, सरी वरंबा आणि रुंद वरंबा सरी पद्धतीने एकाच दिवशी पेरणी केली.

प्रयोगामध्ये दोन फळांतील अंतर १५० सेंमी ठेवून त्यावर ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्र चालवले. त्यामुळे १२० सेंमी अंतराचा रुंद वरंबा तयार झाला. एका वरंब्यावर सोयाबीनच्या चार ओळी ३० सेंमी अंतरावर घेण्यात आल्या. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी या ३० सेंमी रुंदीच्या पडल्या.

सपाट वाफे पद्धत आणि सरी वरंबा पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये उगवण अगोदर तसेच जोमदार झाल्याचे दिसून आले.

सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन ः सपाट वाफे पद्धतीमध्ये ९९६ किलो/हे. सरी वरंबा पद्धतीमध्ये १,१७४ किलो / हे आणि रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये १,३१२ किलो / हे. दिसून आले. रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सपाट वाफे पद्धतीपेक्षा ३१ टक्के अधिक आणि सरी वरंबा पद्धतीपेक्षा ११ टक्के अधिक उत्पादन मिळाले.

रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये घेतलेल्या सोयाबीनमध्ये सर्वाधिक पावसाच्या पाण्याची वापर कार्यक्षमता (३.१९ किलो /हे मिमी) सरी वरंबा पद्धतीमध्ये मिळाली. सर्वांत कमी (२.५० किलो / हे / मिमी) सपाट वाफे पद्धतीमध्ये आढळून आली.

रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये बियाण्यात २० टक्के बचत झाली. त्याच वेळी हेक्टरी झाडांची २० टक्क्यांनी कमी झाली. वरंब्याच्या दोन्ही बाजूंच्या ओळीतील झाडांना मिळालेला फायदा तसेच पिकाची चांगली उगवण, जोमदार वाढ, जलसंधारण, हवा खेळती राहणे, कीड व रोगांचा कमी प्रादुर्भाव, अधिक पावसाच्या दिवसांत पाण्याचा निचऱ्यामुळे उत्पादनात ३१ टक्के अधिक वाढ दिसून आली.

बीबीएफ पद्धतीमुळे २० ते २५ दिवसांपेक्षा अधिकच्या पावसाच्या दीर्घकालीन खंडातही पडलेल्या पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन शाश्वत उत्पादन मिळाले. तसेच काही वर्षांत अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होऊन पिकाचे नुकसान टाळण्यास व अधिक पीक उत्पादन मिळण्यास फायदा झाला. एका वर्षात पावसाचे प्रमाण कमी असतानाही पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली.

डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२

(कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com