Awareness of Processing Industry : शेतशिवारात प्रक्रिया उद्योगाची ‘जागृती’

Food Processing Industry : खरसुंडी (ता.आटपाडी,जि.सांगली) या दुष्काळी गावातील प्रयोगशील महिला एकत्र आल्या. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागृती महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापन केला. या गटाच्या माध्यमातून आवळा प्रक्रिया उद्योग उभारला.
Food Processing Industry
Food Processing IndustryAgrowon
Published on
Updated on

Food Processing Industry Success Story : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आले असले तरी आजही दुष्काळी तालुका अशीच ओळख आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवडीचे क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षात गावशिवारात टेंभूचे पाणी फिरल्याने भाजीपाला, ऊस लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. याच तालुक्यातील खरसुंडी गावाला बरीच वर्षे दुष्काळ सोसावा लागला. या ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी ‘उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ सुरु होते. या अभियानाची माहिती गावातील महिलांना मिळाल्यावर आपणही एकत्र येऊन आर्थिकदृष्टया समृद्ध होऊ शकतो, याची त्यांना जाणीव झाली.

यातूनच २०१७ मध्ये जागृती महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना करण्यात झाली. या गटात दीपाली पुजारी (अध्यक्षा), मनीषा पाटील (उपाध्यक्षा) आणि शीतल पाटील, विजया पाटील, ज्योती पाटील, उषा पाटील, माया पाटील, स्वाती पुजारी, आसमा शिकलगार, हीना शिकलगार, लंका जाधव आणि नीता पाटील या सदस्या कार्यरत आहेत. पहिल्या टप्यात महिलांनी एकत्र येऊन आर्थिक बचत करण्यास सुरवात केली. पहिल्यांदा प्रति महिना १०० रुपये अशी बचत केली जायची. त्यानंतर २०० रुपये आणि सध्या ३०० रुपये अशी प्रति महिना बचत केली जाते. आर्थिक बचतीबरोबर बॅंकेच्या व्यवहारात गटातील महिला सक्षम झाल्या आहे.

प्रक्रिया उद्योगाच्या दिशेने...

गटातील महिलांनी बचतीच्या रूपाने पैसे साठवले होते. यातून काहीतरी व्यवसाय सुरु केला तर, महिलांना रोजगार मिळेल, आर्थिक उत्पन्नाचा मार्ग मिळेल, असा विचार पुढे आला. गटाच्या सदस्या दीपाली पुजारी यांना वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड होती. त्यातूनच फळ प्रक्रिया व्यवसाय सुरु करण्याचे नियोजन झाले. या परिसरात आवळा लागवड असल्याने पहिल्या टप्यांत आवळ्यापासून पावडर, ज्यूस, कॅण्डी, सुपारी, च्यवनप्राश, मोरावळा अशा पदार्थांची निर्मिती करण्याचा निर्धार गटाने केला.

प्रक्रिया उद्योगाबाबत दीपाली पुजारी म्हणाल्या की, आवळ्यावर प्रक्रिया उद्योगाबाबत आम्हाला आटपाडी येथील आत्मा विभागाकडून माहिती आणि प्रशिक्षण मिळाले. तसेच माझ्या मुलाने यासंदर्भात यूट्यूबवरून आवळा पावडर, ज्यूस, कॅण्डी, सुपारी, च्यवनप्राश कशा पद्धतीने तयार करतात याबाबत माहिती दिली. आम्ही २०२१ मध्ये पहिल्या टप्यांत ५० किलो आवळ्यावर प्रक्रिया केली. ही उत्पादने जागृती उद्योग समूह या ब्रॅंडद्वारे बाजारात आणली. २०२२ मध्ये १०० किलो आणि २०२३ मध्ये ५०० किलो आवळ्यापासून पदार्थ तयार करून विक्री केली. यातून गतवर्षी सुमारे दीड लाख रुपयांची उलाढाल झाली.

Food Processing Industry
Agriculture Success Story : तूर- सोयाबीन पद्धतीचा भलमे यांचा आदर्श

विक्री व्यवस्थेचे नियोजन

उत्पादनांच्या विक्रीबाबत दीपाली पुजारी म्हणाल्या की, प्रक्रिया उत्पादन तयार करणे सोपे असते, पण त्याची विक्री करणे तसे अवघड. पहिल्यांदा सांगली येथील कृषीधान्य महोत्सवात उत्पादने विक्रीला ठेवली. यावेळी तीन दिवसात १० ते १५ हजार रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे आपल्या उत्पादनांची चांगल्या प्रकारे विक्री होऊ शकते याचा आत्मविश्वास आला. या प्रयत्नातून अनेक बाजारपेठ शोधल्या. किराणा दुकानदार, बझार, मॉल अशा ठिकाणी प्रक्रिया उत्पादने दाखवली. टप्याटप्याने परिसरातील दुकाने, यासह विविध प्रदर्शने, महोत्सवामध्ये उत्पादनांची विक्री सुरु झाली. याचबरोबरीने परिसरातील बचत गटाशी संपर्क केला. त्याठिकाणी देखील उत्पादनांच्या विक्रीला चालना मिळाली.

शेतकऱ्यांच्याकडून आवळा खरेदी

आवळा खरेदीबाबत उषा पाटील म्हणाल्या की, आटपाडी, दिघंची, भिंगेवाडी, शेटफळे या गावातील काही शेतकऱ्यांनी आवळ्याची लागवड केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांकडून प्रति किलो ३० रुपये घरपोच या दराने आवळ्याची खरेदी केली जाते. गटातर्फे संपूर्ण बागेतील आवळा खरेदी होते. ऑगस्टमध्ये आवळा उपलब्ध होण्यास सुरवात होते. गटातील महिला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्याकडून आवळ्याचे नवीन पदार्थ निर्मितीबाबत प्रशिक्षण घेणार आहोत. यंदाच्या वर्षी एक टन आवळ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.

Food Processing Industry
Agriculture Success Story : मका, काकडी पिकातून मिळवले आर्थिक स्थैर्य

सेंद्रिय शेतीला चालना

प्रक्रिया उद्योगाच्या बरोबरीने शेती विकासामध्येही गटाने पुढाकार घेतला आहे. याबाबत सविता पुजारी म्हणाल्या की, आमची प्रक्रिया व्यवसायात प्रगती होवू लागली.परंतु तेवढ्यावर आम्हाला थांबायचे नव्हते. २०२२ मध्ये ग्रामपंचायतीमध्ये कृषी विभागाने कार्यशाळा ठेवली होती. यामध्ये गटातील सदस्या सहभागी झाल्या. यामध्ये कृषी सहाय्यक विजय रणदिवे यांनी सेंद्रिय शेतीबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी मारुती कवलगे यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळाले. महिला गटाने सेंद्रिय शेतीसाठी आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशांत पाटील यांची भेट घेतली.

पाटील यांनी जागृती महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांमधून २०२२ मध्ये हरितक्रांती महिला शेतकरी समूह तयार केला. आत्मा विभागाकडून परंपरागत कृषी विकास योजनेला हा समूह जोडला आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सदस्या सेंद्रिय खत निर्मिती, जीवामृत, जैविक कीटकनाशके, दशपर्णी अर्क निर्मिती शिकलो. कृषी विज्ञान केंद्र, कांचनपूर (जि.सांगली) आणि कृषी विज्ञान केंद्र,कणेरी मठ (जि.कोल्हापूर) येथे भेट देवून सेंद्रिय शेतीबाबत तांत्रिक माहिती घेतली. गटाला आत्मा विभागाकडून मार्गदर्शन मिळाले. तीन वर्षानंतर गटाला सेंद्रिय उत्पादनाबाबत मानांकन मिळणार आहे. आम्ही माती परिक्षणाचे महत्त्वही समजून घेतले आहे. तसेच सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करतो.

शेतकरी ते ग्राहक’ विक्री

गटातील प्रत्येक सदस्यांकडे शेती आहे. गेल्यावर्षी समूहातील १५ सदस्यांनी पंधरा एकरावर खरीप हंगामात बाजरीची पेरणी केली. या पिकाला सेंद्रिय खते तसेच दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काचा वापर केला. पंधरा एकरातून सुमारे १२५ क्विंटल बाजरीचे उत्पादन मिळाले. या समुहाच्या पीक व्यवस्थापनाचे नियोजन दीपाली पुजारी,सविता पुजारी आणि रेखा घोरपडे यांच्याकडे असते. प्रक्रिया उत्पादनांमुळे वितरण साखळी तयार झाली होती.

त्यामुळे बाजरीचे एक, दोन आणि पाच किलोचे आकर्षक पॅकिंग करण्यात आले. प्रति किलो ६० रुपये दराने बाजरीची विक्री झाली. बाजरीच्या पॅकिंगवर तपासणी अहवाल पहाण्यासाठी क्यूआर कोड दिला आहे. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने बाजरी उत्पादन असल्याची खात्री पटते. यंदाच्या खरीप हंगामात समुहाने पुन्हा एकदा १५ एकरावर बाजरी तसेच टोमॅटो लागवड केली आहे. यंदाच्या वर्षी गटाने ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी विक्री व्यवस्था उभी करण्याचे नियोजन केले आहे.

दीपाली पुजारी ८६००८८६५५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com