Fruit Farming : नागपुरी संत्र्याची हुकूमत; मात्र राजस्थानचीही स्पर्धा

Orange Market : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थंडीच्या हंगामात संत्र्यांची आवक आणि मागणी वाढू लागली आहे. सर्व संत्र्यांमध्ये नागपुरी संत्र्यांनी आपली विशेष ओळख टिकवली आहे.
Orange Fruit
Orange FruitAgrowon

Success Story of Orange : सध्याच्या हंगामात बाजारात विविध फळांची रेलचेल पाहण्यास मिळते. यापैकी मुख्य फळ म्हणजे संत्रा. ऑक्टोबर- नोव्हेंबरपासून पुणे-गुलटेकडी बाजार समितीत दररोज दोन ते तीन ट्रक या प्रमाणात संत्र्यांची आवक सुरू होते. प्रति गाडीत ४०० पेट्या या दराने ही आवक बाराशे पेट्यांची असते. डिसेंबरअखेरपर्यंत आवकेत सातत्य राहते.

छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे सचिव आणि नागपूर संत्र्यांचे प्रमुख अडतदार करण जाधव म्हणाले, की सुरुवातीच्या आवेकत हिरव्या रंगाच्या आणि आंबट संत्र्यांची आवक असते. त्यास मागणी आणि दरही कमी असतो. त्यांचा पुरवठा पश्‍चिम बंगाल, चंडीगडसह दक्षिण भारतात होतो.

यंदाचे चित्र सांगायचे, तर ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने संत्रा बागांचे नुकसान झाले. माशीचा डंख बसल्याने पेटीतील काही संत्र्यांना पाणी सुटले. अशावेळी दर्जेदार फळांना चांगली मागणी राहून त्यांचा दर दीड हजार रुपये प्रति पेटी राहिला.

राजस्थानी संत्र्यांची स्पर्धा

तीन, चार वर्षांपासून राजस्थानातील संत्र्यांची आवक सुरू झाली आहे. साहजिकच नागपुरी संत्र्यांना त्यांची स्पर्धा निर्माण झाली आहे. सध्या राजस्थानातून दररोज ९० ते १०० क्रेट आवक आहे. रंगाने पिवळ्या आणि चवीला आंबट-गोड असलेल्या या संत्र्यांना व्यापारी आणि घरगुती ग्राहकांकडून मागणी आहे. त्यांचा दर ४० ते ५० रुपये प्रति किलो आहे. असे असले तरी नागपुरी संत्री ही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वादाने बाजारात आपले महत्त्व टिकवून आहे. त्यांचा दर प्रति किलो ५० ते ७० रुपये आहे.

Orange Fruit
Orange Growers : संत्रा उत्पादकांना पावसाची धास्ती

अन्य शहरांचे ‘मार्केट’ वाढले

कोरोना काळानंतर नागरिक आरोग्याबाबत अधिक संवेदनशील झाले. त्यामुळेच संत्र्यांसह विविध फळांना मागणी वाढली. अडतदार करण जाधव म्हणाले, की बाजार समित्यांच्या मदतीशिवाय फळांना मार्केट तयार करता येते हा आत्मविश्‍वास छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांना आला.

त्यातून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी विविध शहरांमध्ये संत्र्यांचा नागपुरातून थेट पुरवठा होऊ लागला. परिणामी, पुणे बाजार समितीत पूर्वी होणारी दररोजची १५ ते २० ट्रक संत्रा आवक आता ५ ते ७ ट्रकवर आली आहे.

नगरमधूनही आवक

नागपूर आणि राजस्थानसह नगर जिल्ह्यातूनही संत्र्यांची मोठी आवक होत असल्याचे पुणे बाजार समितीतील संत्रा मोसंबीचे प्रमुख अडतदार सोनू ढमढेरे यांनी सांगितले. बाजार समितीत नगर संत्र्यांची आवक दोन हंगामांत होते. यात आंबे बहराची संत्री ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत, तर मृग बहराची आवक फेब्रुवारी ते मे महिन्यांपर्यंत असते.

आंबे बहरातील संत्र्यांची दररोज आवक १५ ते २० टनांनी सुरू होते. हंगाम बहरात असताना ही आवक ५० टनांवर जाते. या काळात दर १५० ते ७०० रुपये प्रति १० किलो असतो. मृग बहरातील दररोजची आवक २५ ते ३० टन असून, दर प्रति १० किलोला ३०० ते एक हजार रुपये असतो.

करण जाधव (अडतदार) ९३७२१११४१८

सोनू ढमढेरे (अडतदार) ९८२२५३११५८

मोसंबीचाही गोडवा

पुणे बाजार समितीत संत्र्याप्रमाणे मोसंबीचाही गोडवा राहतो. त्याची आवक छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून प्रामुख्याने ऑगस्ट ते फेब्रुवारीदरम्यान असते. पाऊसमान कमी झाल्यास ती जानेवारीपर्यंतच राहते. मोसंबीची विक्री डझनावर होते. प्रति डझनाला २५० ते ५००, तर चार डझनाला १२० ते २२० रुपये दर मिळतो.

Orange Fruit
Orange Subsidy : संत्रा निर्यातीसाठी ५० टक्के अनुदान
माझी सुमारे ५०० झाडांची मोसंबी लागवड असून आंबे बहराची आवक नुकतीच संपली. या वर्षी एकूण २० टन उत्पादन तर दर २० रुपये प्रति किलो एवढा मिळाला. मार्चमध्ये मृग बहरातील उत्पादन सुरू होईल. या बहरात ५ ते ६ टन उत्पादन अपेक्षित असून, या काळात आंबे बहरापेक्षा जास्त म्हणजे प्रति किलो २० ते ४० रुपये दर मिळतो.
भगवान नवले, संपर्क ः ७६६६६५४६७७ अडूळ, ता. पैठण जि. छत्रपती संभाजी नगर
‘माझी संत्र्यांची एक हजार झाडे आहेत. पैकी अडीच एकरांवरील झाडांचे उत्पादन सुरू आहे. या वर्षी त्यातून साडेतीन टन उत्पादन अपेक्षित आहे. सध्या व्यापारी जागेवरच ८०० रुपये प्रति क्रेट दर देत आहेत. मात्र मला एक हजार रुपये दर अपेक्षित असून, अद्याप विक्री केलेली नाही. व्यापारी आमच्याकडून खरेदी करून, पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळूर आदी ठिकाणी हा माल पाठवतात.
गोपाळ बोरकर, वडजी, ता. रिसोड, जि. वाशीम

नागपुरी संत्रा पेटी आकार व दर

डझन पेटीचे वजन (किलो) दर (रुपये)

८ ते १० डझन २४ बाराशे ते तेराशे

११ डझन २६ एक हजार ते अकराशे

१२ डझन २५ ९०० ते एक हजार

१४ डझन २५ ते २६ ८०० ते ९००

(फळाचे वजन ५० ते १५० ग्रॅमपर्यंत असते.)

लाकडी पेट्यांसह प्लॅस्टिक क्रेटमध्येही आवक होते. मात्र क्रेटमधील संत्र्यांचा आकार खूपच लहान असतो. प्रति १७ ते १८ किलो क्रेटला ६०० ते ८०० रुपये दर असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com