Norway : नॉर्वे : व्यापार, उद्योगाचा केंद्रबिंदू

Article by Dr. Rajendra Sarkale : नॉर्वे हा देश व्यापार, बँकिंग, उद्योग आणि जहाज वाहतुकीचे केंद्र आहे. तसेच युरोपमधील सागरी उद्योग आणि सागरी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. जलविद्युत शक्तीचा विकास होण्यापूर्वी नॉर्वे हा मुख्यतः कृषिप्रधान देश होता. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांचे प्रमाण या देशात जास्त असून, शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो.
Norway
Norway Agrowon

डॉ. राजेंद्र सरकाळे

एकदा उगवलेला सूर्य अडीच महिने खरोखर मावळत नाही, असे ठिकाण जगात आहे. जिथे अडीच महिन्यांत केवळ चाळीस मिनिटांची रात्र असते, असे ठिकाण असलेला देश म्हणजे नॉर्वे. एकसंध समाज, लोकशाही मूल्ये आणि उच्च दरडोई उत्पन्न अशी नॉर्वे देशाची ओळख आहे. नॉर्वे हा उत्तर युरोपमधील व स्कॅन्डिनेव्हियामधील अत्यंत विकसित व समृद्ध देश आहे. हा देश मूलतः नैसर्गिक सौंदर्याने संपन्न आहे.

ओस्लो ही देशाची राजधानी असून, जगातील अत्यंत महागडे शहर आहे; तसेच नॉर्वेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. नॉर्वे हा देश व्यापार, बँकिंग, उद्योग आणि जहाज वाहतुकीचे केंद्र आहे. तसेच युरोपमधील सागरी उद्योग आणि सागरी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. ओस्लो अत्यंत सुंदर, स्वच्छ व विस्तीर्ण रस्ते असलेले शहर आहे.

नॉर्वेमधील एकूण लोकसंख्येपैकी ८६ टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात. मात्र नॉर्वेची अधिकृत भाषा नॉर्वेजियन आणि सॅमी आहे. नॉर्वेजियन क्रोन हे या देशाचे राष्ट्रीय चलन आहे. जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या नोबेल शांतता पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी ओस्लो या शहरात दिमाखदार सोहळ्यात केले जाते. नोबेल मानपत्र, पदक आणि एक कोटी क्रोनर (भारतीय चलनात ७ कोटी ७८ लाख रुपये) पुरस्कार निधी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

इतिहास :

मध्ययुगात नॉर्वेमध्ये राजेशाही अस्तित्वात होती. या देशात पहिला ओलाफ याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून त्याचा झपाट्याने प्रसार केला. त्यामुळे नॉर्वेमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना रुजली. दुसरा ओलाफ या राजाने एकछत्री अंमल प्रस्थापित केला. १७ मे १८१४ रोजी नॉर्वे हा देश स्वतंत्र संघराज्य म्हणून अस्तित्वात आला.

पहिले महायुद्ध २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ असे सुमारे सव्वाचार वर्षे सुरू होते. युरोपातील देश या युद्धात सहभागी झाले असले, तरी नॉर्वे देश युद्धात सहभागी झाला नव्हता.दुसऱ्या महायुद्धातही नॉर्वेने अलिप्ततेचे धोरण पुढे चालू ठेवले. परंतु, देशद्रोही फितुरीमुळे एप्रिल १९४० मध्ये नाझी जर्मन सैन्य नॉर्वेत घुसले.

जर्मन लोकांनी व्हिडकून क्व्हिस्लिंग यांच्यामार्फत पाच वर्षे नॉर्वे देशाचे प्रशासन चालविले. १९४५ मध्ये जर्मनीचा पराभव झाला ७ जून रोजी सातवा हॉकोन मायदेशी परतला व नॉर्वेचे पंचवार्षिक ग्रहण सुटले. १९४५ पासून नॉर्वेने जागतिक राजकारणातील अलिप्ततेचे धोरण सोडून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आघाडी आणि सहकार्याचे धोरण आरंभिले.

Norway
Success Story : संकटे भेदली, उमेद जागविली कष्टाची गोड फळे मिळाली

संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक सदस्य म्हणून नॉर्वे देश ओळखला जातो. १९४९ मध्ये नाटो, १९५२ मध्ये नॉर्डिक कौन्सिल आणि १९५९ मध्ये युरोपीय फ्री ट्रेड असोसिएशन (एफ्टा) या संघटनेत नॉर्वे देश सामील झाला.

या देशाचे एकूण क्षेत्रफळ ३,८५,२०७ चौरस किलोमीटर आहे. या देशाची सर्वांत मोठी सीमा स्वीडनशी संलग्न आहे. फिनलँड व रशियासारखे बलाढ्य देश नॉर्वेच्या उत्तर सीमेकडे आहेत. पश्‍चिम व दक्षिणेला नॉर्वेजियन समुद्र आणि उत्तर समुद्र आहेत.

नॉर्वेची भूपृष्ठरचना अतिशय तीव्र चढउताराची बनलेली आहे. ओस्लो व त्रॉनहेमजवळ काही विस्तृत सखल मैदानी प्रदेश पाहावयास मिळतो. मध्य पर्वतीय प्रदेशातून आग्नेयेकडे वाहणारी ग्लॅमा ही ५६० किलोमीटर लांबीची सर्वांत मोठी नदी ऑस्लो फ्योर्डच्या पूर्वेस समुद्राला मिळते. देशात एकूण १३००० चौरस किलोमीटर क्षेत्राची सरोवरे आहेत. नॉर्वे हा देश राजस्थान या राज्यापेक्षा क्षेत्रफळाने किंचित मोठा आहे.

लोकसंख्या व समाजजीवन:

नॉर्वेमधील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर १५ एवढी आहे. साधारणपणे ३० ते ५० किलोमीटर अंतरामध्ये एकही गाव पहावयास मिळत नाही. या देशात भारतीयांची संख्या २५ हजारांपर्यंत आहे. या देशात साक्षरतेचे प्रमाण १०० टक्के आहे. युरोपमधील सर्वांत कमी लोकसंख्येची घनता असलेल्या देशांपैकी हा एक देश आहे. १७ मे हा नॉर्वेचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.

नॉर्डिक वंशाचे लोक हे गौरवर्णीय, उंच बांध्याचे, उभट चेहऱ्याचे असून, त्यांची संख्या येथे अधिक आहे. नॉर्वेच्या दक्षिणेकडे गेल्यास गोल चेहऱ्याच्या अल्पाइन वंशाचे मिश्रण आपल्याला पाहावयास मिळते. अति उत्तरेकडे लॅप वंशाचे लोक दिसतात. डोंगराळ भागात लोकसंख्या विरळ असून, पश्‍चिम किनाऱ्यालगत व दक्षिणेकडे दाट लोकसंख्या आहे. ओस्लो, त्रॉनहेम, बर्गेन, सँड्नेस व स्टाव्हांगर ही जास्त लोकसंख्येची शहरे आहेत.

देशात लोकशाहीची भावना लोकांमध्ये खोलवर रुजल्याचे दिसते. लोकांमध्ये उच्च-नीच, स्त्री-पुरुष असा भेदभाव आढळून येत नाही. शासनातर्फे देशात बऱ्याच कल्याणकारी योजना अमलात आणल्या जातात.

नॉर्वेतील लोकांचा आहार सकस व समतोल असल्याने सामान्य मनुष्य सुदृढ आणि दीर्घायुषी आहे. सर्वांना सरकारी वैद्यकीय मदत स्वस्त व सुलभरीत्या मिळते. १९६७ पासून सर्व वृद्धांना सेवानिवृत्तिवेतन देण्याचा कायदा अमलात आला आहे. आरोग्य सुविधांमुळे रोगराई दिसून येत नाही, मृत्युदरही कमी आहे.जन्मदर कमी असल्यामुळे देशाला लोकसंख्या वाढीचा प्रश्‍न भेडसावत नाही.

ग्रामीण भागातून लाकडी बांधणीची दुमजली घरे आढळतात, तर शहरांतून काँक्रीटच्या इमारती दिसून येतात.

Norway
Farmer Exporter : निर्यात सुविधा केंद्राद्वारे झाला शेतकरी स्वतः निर्यातदार

समशीतोष्ण हवामान :

हा देश शीतकटिबंधात असून, येथे अटलांटिकवरून येणाऱ्या विस्तीर्ण व उष्ण, गल्फ प्रवाहामुळे येथील हवामान समशीतोष्ण आहे. या देशातील हवामान नेहमीच बदलत राहते. नॉर्वे हा उत्तर ध्रुवाच्या सर्वांत जवळ असल्यामुळे हा भाग सर्वांत थंड आहे. देशातील पश्‍चिम किनाऱ्यावरील तापमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास असते. उत्तरेकडे उन्हाळ्यात काही महिने सूर्य मावळतच नाही, म्हणून नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असेही म्हणतात.

देशात हिवाळा व उन्हाळा हे दोन मुख्य ऋतू आहेत. शरद ऋतूही या ठिकाणी पाहावयास मिळतो. नॉर्वेमध्ये सौम्य हिवाळा, शीतल उन्हाळा पाहावयास मिळतो. देशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. तसेच उन्हाळ्यातसुद्धा पाऊस पडतो.

हा देश आर्क्टिक सर्कलमध्ये येत असल्यामुळे सुमारे अडीच महिन्यांत फक्त ४० मिनिटांची रात्र असते. म्हणजे सलग अडीच महिने दिवस असतो. नॉर्वेमधील स्वालबार्ड या ठिकाणी मध्यरात्रीचा सूर्य सर्वांत जास्त काळ असतो. येथे २० एप्रिल ते २२ ऑगस्ट दरम्यान सूर्यास्त होत नाही.

वनस्पती आणि प्राणी :

नार्वेच्या उंच पर्वतीय थंड प्रदेशात खुरट्या वनस्पती आहेत. पण दऱ्याखोऱ्यांत उंच स्प्रूस व पाइन या सूचिपर्णी वृक्षांची दाट झाडी आहे. बर्च, अॅश, अॅस्पेन हे पानझडी वृक्ष येथे आढळून येतात. पाइन वृक्ष अधिक संख्येने आढळतात. पठारावर खुरटे गवत वाढते. बेरीसारखी रानटी फळे आहेत. नॉर्वेला वृक्षसंपदेचे वरदान आहे.

कळप करून राहणारा काळविटासारखा रेनडियर, हरिण, मूस, लांडगा, बॅजर, मार्टन, पाणमांजर, खोकड, ग्लटन व अस्वल हे प्राणी येथे कमी-जास्त संख्येने आढळतात. घोडे, वराहांची संख्याही येथे जास्त आढळून येते. डोंगराळ भागात रेनडियरचे कळप पाळले जातात.

नद्यांमध्ये सॅमन व ओढ्यांमध्ये ट्राउट मासे विपुल प्रमाणात आहेत. समुद्रात कॉड मासे मिळतात. हेरिंग, हॅलिबट व व्हेल हे इतर मासे आहेत. वुल्व्हरीन व लेमिंग या उंदरांसारख्या प्राण्यांची संख्या बरीच असून लांडगे, कोल्हे, गरुड यांचे ते भक्ष्य आहे.

पर्यटनामध्ये आघाडी :

या देशात अनेक पर्यटनस्थळे आहेत. प्रमुख पर्यटन स्थळांपैकी अलेसुंडा हे शहर आकाराने लहान असून, खूप मनोरंजक आहे. सात बेटांवर ते वसले आहे. नॉर्वेमधील सर्वांत सुंदर शहरांपैकी ते एक असून, पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.

ड्रॅमेन ही अतिशय सुंदर किनारपट्टी आहे. येथे नागमोडी आकाराच्या बोगद्यातून आपल्याला कारने प्रवास करता येतो. ओड्डा हे शहर स्थानिक व परदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे. बिगडॉय येथे प्राचीन काळापासून आजपर्यंत वापरात असलेल्या विविध प्रकारच्या सागरी नौकांचा संग्रह आहे.

या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य असे, की नॉर्वेमधील नागरिक जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वांत जास्त पुस्तके वाचतात. वाचनसंस्कृती रुजलेला कोणताही देश सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असतोच. आपल्या सर्व बलस्थानांचा यथायोग्य उपयोग करून नॉर्वे हा सधन लोकांचा देश बनला आहे.

डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०

(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com