Epistemology of Agriculture : शेतीचे ज्ञानशास्त्र : अन्नाचे ज्ञान म्हणजे काय?

Article by Srinivas Hemade : अन्नाचे ज्ञानशास्त्र ही ज्ञानशाखा अन्नाचे ज्ञान म्हणजे काय? त्याची साधने कोणती? ते ज्ञान का मिळवावयाचे? इत्यादी प्रश्‍नांची चिकित्सा करते.
Epistemology of Agriculture
Epistemology of AgricultureAgrowon

श्रीनिवास हेमाडे

Indian Agriculture : शेती आणि अन्नधान्य निर्मिती प्रक्रियेसंबंधीच्या प्रश्‍नांची योग्य व उत्तम माहिती शेतकऱ्याला आणि शेती तज्ज्ञाला असते, यात शंका नाही. मात्र अन्न खाणे-जेवणे ही कृती बिनशेतकरी माणसाशीही संबंधित असते. रोजच्या जेवणात कच्चे अन्नधान्य समोर नसते, तर तयार अन्न असते.

त्या तयार अन्नाच्या गुणवत्तेविषयी आपण फारसा विचार न करता खातो. अन्नाचे ज्ञान आपल्या व्यक्तिगत आरोग्याच्या आणि सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या रक्षणाशी जोडले गेल्यामुळे अन्नाच्या ज्ञानासंबंधीच्या प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे. अन्नाचे ज्ञानशास्त्र ही ज्ञानशाखा अन्नाचे ज्ञान म्हणजे काय? त्याची साधने कोणती? ते ज्ञान का मिळवावयाचे? इत्यादी प्रश्‍नांची चिकित्सा करते.

Epistemology of Agriculture
Indian Agriculture : स्वदेशी तंत्र हाच विकासाचा मंत्र

जोखीम

बाजारातील तयार अन्न खाण्यातील मोठी जोखीम म्हणजे त्या अन्नाचा आरोग्यविषयक दर्जा. अर्थात अन्न उत्पादन प्रक्रियेतील आणि वितरणातील जोखीम. अन्न कुठून आले, ते आरोग्यदायी स्थितीत तयार केले गेले आहे का, अन्नाचे वहन आरोग्यदायी आहे का? अन्नाचे वितरण आरोग्यदायी आहे का? या विषयीच्या ज्ञानाचा अभाव घातक, जीवघेणा ठरू शकतो.

अन्नाची निर्मिती, कच्च्या व तयार अन्नाचे परीक्षण, वितरण इत्यादींचे व्यवस्थापन आणि त्याबद्दलचा संवाद इत्यादी प्रत्येक प्रक्रियेची संपूर्ण चिकित्सा ‘अन्नाची जोखीम’ या मुद्यात होतो. दुसरे म्हणजे, खातानाच नेमकी ‘नको असलेली घटना घडणार तर नाही ना,’ अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उद्भवणे. खाताना नेमके काय संकट उद्‍भवेल या विषयी पुरेशी माहिती नसणे, ही मोठी जोखीम असते. अनेकदा पहिला घास घेतानाच अघटित घडून तो घास तसाच राहतो.

विश्‍वासाची चिकित्सा

आपले अन्न संबंधित स्वयंपाकी माणसाने अतिशय काळजी घेऊन खाण्यास योग्य आणि सुरक्षित केलेले आहे, असा आपला विश्‍वास असतो. पण हा विश्‍वास खराच आहे की तो नाइलाजाने स्वीकारावा लागतो? हा प्रश्‍न विचारणे आवश्यक आहे. कारण ‘विश्‍वास ठेवणे, ही देखील जोखीमच असते.’

विश्‍वासाने खाणे, हा सवयीचा भाग होतो, ज्ञानाचा भाग होत नाही. विश्‍वास हा ज्ञानाचा भाग व्हावा या हेतूने ‘विश्‍वासाचीही चिकित्सा’ केली पाहिजे. त्यासाठी विश्‍वासाचा अनुभव आला पाहिजे. ‘अनुभवाधारित समर्थनीय विश्‍वास’ म्हणजे ज्ञान. थोडक्यात, अन्नाविषयी ‘अनुभवाधारित समर्थनीय विश्‍वास’ हा अन्नाच्या ज्ञानाचा भाग बनला पाहिजे.

Epistemology of Agriculture
Indian Agriculture : शेती क्षेत्राची आर्थिक घसरगुंडी

व्यावहारिक बुद्धीचा निर्णय

ज्ञान आणि त्यानुसार केलेली कृती म्हणजे ‘व्यावहारिक बुद्धी.’ ती चिकित्सा करण्यास उपयोगी पडते. शेती आणि अन्न याबाबत ‘व्यावहारिक बुद्धी’ वापरणे म्हणजे काय, तर अन्नाची जोखीम आणि विश्‍वास यांच्यासंबंधी प्रश्‍न उपस्थित झालाच तर विश्‍वासावर विसंबून न राहता व्यावहारिक बुद्धीच्या साह्याने निश्‍चित करणे.

विशेषतः बाजारातील सार्वजनिक अन्नाच्या बाबतीत जोखीम मोठी आणि विश्‍वास कमी असतो. म्हणून अन्नाशी संबंधित कोणती गोष्ट कधी प्रश्‍न करण्याजोगी आहे, हे व्यावहारिक बुद्धीच्या आधारेच पारखून घेणे हाच शहाणपणा असतो.

अनैच्छिक आणि अबोध

काहीतरी खाण्याची लालसा का उद्‍भवते किंवा अन्न का नकोसे वाटते, याचे सकृतदर्शनी काहीच कारण देता येत नाही. आपण निव्वळ ते करतो, खातो किंवा दूर सारतो. असे काही अनुभव अनैच्छिक शारीरिक प्रक्रियेमुळे, काही मनाच्या अबोध प्रेरणा आणि इच्छा यामुळे घडून येतात.

खाण्याचा विसकळीतपणा (भूक मंदावणे, भुकेचा डोंब उसळणे, विनाकारण खात सुटणे) हा अबोध मनाने निर्माण केलेला आजार आहे. तो आहारतज्ञ आणि मनोविश्‍लेषणात्मक मानसशास्त्रज्ञ यांची सल्ल्याने दुरुस्त होतो.

अन्न मार्ग

लोकांच्या सार्वजनिक वर्तनाला ‘लोक मार्ग’ म्हटले जाते तसे शेतीच्या आणि अन्नाच्या समग्र ज्ञानाला विद्यापीठीय अभ्यासक्रमात ‘अन्न मार्ग’ (foodways) म्हटले जाते. ‘अन्न मार्ग’ सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपाचा असतो. एखादा समाज गट काय खातो आणि अन्नाकडे कसा पाहतो, त्या पदार्थांचा अर्थ कसा लावतो, अन्नाची पाकक्रिया पद्धती यांचा आणि त्या समाज गटाच्या खानपानविषयक सवयी निश्‍चित करणाऱ्या पारंपरिक श्रद्धा, संकेत, विश्‍वास यांचा; भौगोलिकदृष्ट्या आवश्यक अन्न कोणते यांचा अभ्यास यात होतो.

धार्मिक परंपरा म्हणून भिक्षा मागणे आणि सामाजिक व्यवस्थेने ‘भीक मागणे’ सक्तीची करणे यातील फरक हा ‘अन्न मार्ग’ विषयात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. भिकारी, भटक्या जातीजमाती समाजगटाचे अन्न अनेकदा जीवघेणेही असते. त्यांचाही आरोग्यपूर्ण अन्नावर हक्क आहे, याचे ज्ञान होणे आणि तसा अन्न पुरवठा करणे ही समाजाची व सरकारची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी असते.

(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक तसेच व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com