
Agriculture Success Story : अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा हे तालुके संत्रा, केळी, भाजीपाला, वनौषधी उत्पादनासाठी अग्रेसर मानले जातात. तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी येथे इंगळे- पाटील कुटुंबाची ४५ एकर शेती आहे. सोबतच ३५ एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली आहे. रामेश्वर, जगन्नाथ, ज्ञानदेव व सर्वात धाकटे अनिल ऊर्फ अनंता असे चार भावांचे हे संयुक्त कुटुंब असून सर्वजण मिळून शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. कुटुंबाने फळबाग केंद्रित शेतीला अधिक महत्त्व दिले आहे.
पपई पिकात मास्टरी
पपई हे कुटुंबाचे मुख्य पीक असून सुमारे ४५ एकर त्याचे आजचे क्षेत्र आहे. सन २००७ पासून या पिकाचा अनुभव असून आज या पिकात इंगळे बंधूंनी मास्टरी मिळवली आहे. पूर्वीच्या काळात तैवान ७८६ वाण ते घेत. मात्र हे वाण विषाणूजन्य रोगाला बळी पडायचे. त्यामुळे मागील चार वर्षांपासून १५ नंबर या वाणाची लागवज केली जात आहे.
या वाणाचे वैशिष्ट्य सांगताना अनंता सांगतात, की विषाणूजन्य रोगाला हे वाण कमी बळी पडते. लागवडीनंतर दोन वर्षे उत्पादन मिळते. उत्पादन सुरू झाल्यानंतर सुमारे १० ते १२ महिने व रोगाची समस्या नसल्यास १५ महिन्यांपर्यंत त्याचे ‘हार्वेस्टिंग’ सुरू राहते. ही पपई आकाराने व्यवस्थित व चवीला गोड आहे. बेडवर लागवड तसेच त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर सुरू केल्याने तण नियंत्रणाचा खर्च बराच कमी झाला आहे.
क्रॉप कव्हरचा वापर
पपईत चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या व बांबूच्या काड्यांचा वापर केलेल्या १५ बाय १५ इंच आकाराच्या क्रॉप कव्हरचा (बॅगेचा) प्रत्येक झाडाला वापर होतो. एकरी ९०० रोपे असतात. प्रति रोप बॅगेसाठी साडेतीन रुपये खर्च येतो. मात्र या बॅंगेचे अनेक फायदे होतात. सातपुडा भागात उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने रोपांना उन्हाची झळ बसत नाही.
रसशोषक किडींपासून लहान रोपांचा बचाव होतो. कव्हर काठीला चिकटून राहते. वाऱ्यामुळे कोलमडत नाही. काव्हरचा पुनर्वापर करता येतो. सातपुडा हा वन्य भाग असल्याने ससे, डुक्कर आदी प्राणीही या बॅगेमुळे रोपांचे नुकसान करीत नसल्याचे अनंत सांगतात.
बांधावरच होते विक्री
एकरी ३० टनांपर्यंत पपईचे उत्पादन मिळते. स्थानिकसह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांतील व्यापाऱ्यांकडून जागेवर खरेदी होते. किलोला १० ते १५ रुपये दर मिळतो. दोन वर्षांपूर्वी २७ रुपये दर मिळाला होता.
खरबुजाची शेती
इंगळे बंधूंचा कलिंगड शेतीतही मोठा अनुभव आहे. मात्र अलीकडे चार- पाच वर्षांत त्यांनी खरबूज लागवडीवर भर दिला आहे. यंदा २२ एकरांत लागवडीचे नियोजन असून पैकी १२ ते १६ एकरांपर्यंत लागवड झाली आहे. सहा एकर, चार एकर व पुन्हा सहा एकर असे प्लॉट तयार करूनठराविक दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. त्याचा फायदा म्हणजे एकाचवेळी माल बाजारपेठेत येत नाही. एखाद्या महिन्यात दरांत मोठी घसरण झाली तरी दरवाढीच्या काळात ही तूट भरून निघते. पपईची लागवडही अशीच टप्प्याटप्प्याने केली जाते व तसेच त्याचे फायदेही मिळतात.
खरबुजातही क्रॉप कव्हर
या पिकातही लागवडीनंतर सुमारे १२ दिवसांनी ‘क्रॉप कव्हर’चा वापर होतो. फुलोरा येण्यास सुरुवात झाल्यानंतर हे कव्हर काढून घेण्यात येते. त्याच्या वापरामुळे रसशेषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. दर चार ते सहा दिवसांनी होणाऱ्या सुमारे चार रासायनिक फवारण्या व त्यावरील खर्च वाचतो, फळाची गुणवत्ता उत्तम मिळते. एकरी १० ते १२ टन उत्पादन तर किलोला १५ ते २० रुपये दर मिळतो. स्थानिक बाजारपेठांसह मुंबई, पुणे, सुरत आदी ठिकाणचे व्यापारी जागेवरच खरेदी करतात.
इंगळे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
व्यवस्थापन काटेकोर ठेवण्याला प्राधान्य.
प्रत्येक हंगामात कोणत्या वाणाला किती मागणी व दर असतात असा बाजारपेठांचा अभ्यास करून त्यानुसार वाणांची निवड.
सातत्याने अभ्यास. विविध प्रदर्शने, फळबागांना भेटी देऊन नवे शिकण्याचा अट्टहास. पीक उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी जे जे आवश्यक त्याचा वापर. इतरांनाही आपुलकीने मार्गदर्शन करण्यासही कायम तत्पर.
संपूर्ण शेतीत ठिबक सिंचन.
जोडीला १३ एकरांपर्यंत केळी. त्याचे एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन. संत्रा सुमारे २० एकरांपर्यंत.
शेतीत मजूर समस्या मोठी आहे. तथापि सातपुडा भागातील आदिवासी व्यक्तींकडून मजुरीचे व्यवस्थापन करण्यात येते.
शेतीतून समृद्धी
फळबाग केंद्रित शेतीतून इंगळे कुटुंबाने समृद्धी, संपन्नता मिळवली आहे.पूर्वी वडिलोपार्जित ३२ एकर शेती होती. आज शेतीतील उत्पन्नातूनच ४५ एकरांपर्यंत क्षेत्र नेले आहे. अकोट या तालुका ठिकाणी प्लॉट घेऊन तेथे प्रशस्त घर बांधले आहे. कुटुंबाची अजून दोन घरे आहेत. मात्र आज चारही बंधू एकाच घरात राहतात.
कुटुंबातील सुमारे १६ सदस्य गुण्यागोविंदाने नांदतात. कुटुंबातील नवी पिढी उच्चशिक्षण घेत आहे. भावाची मुलगी डॉक्टर झाली असून एका भावाचा मुलगा ‘इंजिनिअरिंग’ करतो आहे. उच्च शिक्षणासाठी काही लाखांची तरतूद करावी लागते. त्याची सोय देखील शेतीतूनच केल्याचे अनंता यांनी सांगितले.
अनंता इंगळे ९८२२०४७५२१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.