
Agriculture Success Story : मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी वारंवार उदभवणारी शेतीची कोडवाहू स्थिती पाहून विविध पूरक व्यवसायांची जोड दिली आहे. काहींनी रेशीम शेतीत प्रयोगशीलता सिध्द केली आहे. काहींनी उस्मानाबादी शेळी तसेच लाल कंधारी देशी गोवंशाचे संवर्धन केले आहे. यात युवकही मागे नाहीत.
शेतीपेक्षाही पूरक व्यवसायांमधून पुढे आलेल्या अशा अनेक कुटुंबची उदाहरणे सांगता येतात. त्यापैकीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातील एकतुनी येथील अंबादास कोरडे यांचे सांगता येते. त्यांची पाच एकर शेती आहे. वडिलांकडून त्यांना शेतीचे धडे मिळाले.
अंबादास यांना तीन मुले. पैकी सर्वात मोठे गणेश पोलिस दलात कार्यरत आहेत. तर हरिभाऊ व राम ही मुले व पत्नी अनुक्रमे रेणुका व सविता हे कुटुंबातील सदल्य शेती आणि पूरक उद्योगांची जबाबदारी सांभाळतात. त्यांना अंबादास यांचे मार्गदर्शन असते. पूर्वी पारंपरिक पिके घेऊन अंबादास कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. मात्र त्यातून अर्थकारण सक्षम होत नव्हते. त्यामुळे शेतीला पूरक उद्योग नेमका कोणता करावा याची पाच वर्षांपूर्वी मित्रमंडळी व नातेवाईंकांकडे चाचपणी सुरू केली. त्यातून शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय हे दोन पर्याय समोर आले.
सुरू केले शेळीपालन
शेळीपालन बंदिस्त पध्दतीने करायचा असा निर्णय झाला. त्यानंतर अंबादास व मुलगा राम यांनी पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथील एका शेळीपालन फार्मला भेट दिली. त्यातून व्यवसायाची पूर्ण माहिती घेतली. त्यानंतर प्रत्येकी पाच राजस्थानी व उस्मानाबादी शेळ्या व एक बोकड घेतला. त्यासाठी सुमारे दीड लाख रूपयांची गुंतवणूक केली.
त्यातून सुरू झालेल्या शेळीपालनातून बोकडांची विक्री करायची व पाटी घरी ठेवायची अशी पध्दत अवलंबली. कामांमध्ये सुसुत्रता ठेऊन टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या सुमारे ७० ते ८० पर्यंत पोचली. आताच्या घडीला सुमारे ६० ते ७० शेळ्या आहेत. मध्यांतरीच्या काळात संकरीकरणसाठी आफ्रिकन बोअर जातीचा बोकड आणला.
कमी खर्चात शेडची उभारणी
बंदिस्त पध्दतीच्या शेडची उभारणी करताना जास्तीत जास्त साहित्य घरचेच कसे वापरता येईल याकडे लक्ष दिले. शेड उभाण्यापूर्वी अनेक शेळीपालकांच्या शेडला भेट दिल्याचे फायदे दिसून आले. आपल्या गरजेनुसार वेगळे काय करू शकतो किंवा पाहिलेल्या शेडसमध्ये कोणत्या चुका राहून गेल्या होत्या याचा अंदाज आला. त्यातून शेडची उभारणी करताना कटघरे शेडच्या बाहेर घेत शेड त्याच्या काही फूट आत घेतले. त्यामुळे दिवसभरात सोयीनुसार ऊन व सावलीत बसण्याची सोय शेळ्यांना झाली. विशिष्ट रचनेच्या गव्हाणी तयार केल्याने चाऱ्याची नासाडी टाळता आली.
चाऱ्यासाठीची सोय
पाच एकर शेतीपैकी दीड एकरांत नेपियर गवत, लसूण घास आदींची लागवड केली आहे. याशिवाय शेतात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन, तूर आदींचे भूस शेळ्यांसाठी राखून ठेवण्यात येते. इतर शेतकऱ्यांकडूनही सोयाबीनचे भूस गरजेनुसार विकत घेण्यात येते. सकस आहारासाठी मका उत्पादनही घेण्यात येते.
मुरघास तयार केल्यानंतर तो साठवून ठेवण्यासाठी सुमारे पाच सिमेंट हौद बांधले आहेत. सकाळी दीड ते दोन तासांत स्वच्छता आणि वैराणीची सोय केली जाते. त्यानंतर सायंकाळीही दीड ते दोन तास शेळीपालनासाठी दिले जातात. किरकोळ आजारांवर उपचार व लसीकरणाची जबाबदारी राम सांभाळतात.
किफायतशीर उत्पन्न
मागील सहा वर्षांच्या काळात सुमारे ६० ते ७० पर्यंत शेळ्यांची विक्री केली आहे. प्रति २० किलो वजनाच्या बोकडाला आठ ते १० हजार रूपये दर मिळतो. वर्षाला ३० ते ४० बोकडांची विक्री होते. मागील आठ दिवसांत ११ बोकडांची विक्री केली.
तीन वर्षापासून दुग्ध व्यवसाय
शेळीपालनाला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. सध्या सात संकरित गाई आहेत. मध्यांतरीच्या काळात दररोज ८० ते ९० लिटर दूध संकलन व्हायचे. सध्या ते ५० ते ६० लिटरच्या दरम्यान आहे. डेअरीला पुरवठा होणाऱ्या दुधाला प्रति लिटर ३० रूपये दर मिळत आहे. शेळीपालन व दुग्धव्यवसाय या दोन्ही घटकांमुळे यामुळे हाती ताजा पैसा खेळता राहत असल्याचा अनुभव आहे. शेतीतून वर्षाला जे काही लाख रूपयांचे उत्पन्न मिळते त्यापेक्षा अधिक उत्पन्न या पूरक व्यवसायांमधून मिळत आहे.
शेळीपालनातील उत्पन्नातूनच पाईपलाईन करता आली. शेड उभारणीसाठी तीन लाखांची गुंतवणूक करता आली. कोरडे यांच्याकडे असलेल्या काही पंचवीस वर्षाच्या झाडांसह दोन हेक्टर मोसंबी बाग आहे. निसर्गाची लहर पाहून मृग किंवा आंबिया बहराचे नियोजन करण्यात येते. अलीकडील काळात झाडावर बहर टिकत नसल्याची स्थिती आहे. आता बागेत आंतरमशागत बंद केली आहे.
ती फायद्याची ठरत असल्याचे व बागेवर होणारा एकरी खर्चही निम्म्याने कमी झाल्याचे कोरडे सांगतात. सिंचनासाठी एक विहीर व बोअर आहे. अनेक वर्षांपासून कोरडे कुटुंब ग्रामपंचायीमध्ये सदस्य किंवा सरपंच पदावर राहिले आहे. सन २०१६ ते २०२१ दरम्यान अंबादास यांच्या पत्नी सुलोचना या सरपंच होत्या.
आज त्या विद्यमान सदस्य आहेत. दोन वेळा अंबादास कोरडे व त्याआधी दोन वेळा त्यांचे वडील ग्रामपंचायतीचे सदस्य होते. धार्मिक कार्यातही कोरडे कुटुंबाचे विशेष योगदान राहिले आहे. दरवर्षी स्थानिक काकासाहेब महाराज संस्थानामध्ये कार्तिकी द्वादशीला, महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तसेच गावातून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीला एक वेळा पंगत देण्याचा त्यांचा रिवाज आहे.
अंबादास कोरडे ९३७१८७९९९९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.