Food Processing : वयाच्या सत्तरीत अन्नप्रक्रिया उद्योगात पदार्पण ; आटा ब्रँडला मिळवली बाजारपेठ

Processing Industry : सांगली जिल्ह्यात रेणावी (ता. खानापूर) येथील बाळकृष्ण यादव यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी अन्नप्रक्रिया उद्योगात पदार्पण केले. दोन्ही मुलांच्या मदतीने त्यांनी ‘माउली फूड्स’ या ब्रॅण्डद्वारे चक्की फ्रेश आटा उत्पादनांचा स्टार्ट अप उभारला आहे.
Processing Industry
Food Processing Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर हे कायम दुष्काळी असलेले तालुके म्हणूनच ओळखले जातात. तालुक्याच्या पूर्वेला द्राक्षे तर पश्चिमेला ऊस आहे. सह्याद्री पर्वतावर पूर्वेला महादेव डोंगररांगा आहेत. त्यातील दोन डोंगररांगा खानापूर तालुक्यात आहेत.

त्यापैकी ‘रेवागिरी’ नावाची डोंगररांग विटा शहरापासून पूर्वेस सुरू होते. त्याची उंची सुमारे पंधराशे ते दोन हजार फुटांपर्यंत आहे. या डोंगररांगेवर विटा शहराच्या पूर्वेस नऊ किलोमीटरवर कऱ्हाड- विजापूर रस्त्यावर दक्षिणेस रेणावी गाव आहे. इथेच श्री रेवणसिद्ध हे पवित्र व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

गावातील बाळकृष्णपांडुरंग यादव हे ७० वर्षे वयाचे शेतकरी आहेत. त्यांची सुमारे १० एकर शेती आहे. वडिलांच्या मुंबईत कोळसा वखारी होत्या. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती चांगली होती. बाळकृष्ण यांनी दहा वर्षे मुंबईतच वास्तव्य केले. वडिलांना व्यवसायात मदत केली.

शेतीतील प्रगती

सन १९८३- ८४ च्या काळात रेणावी गावात शेतीसाठी वीज नव्हती. त्यामुळे शेती बागायती करण्यात मर्यादा होत्या. मात्र त्या वेळी तरुण काळात असलेल्या बाळकृष्ण यांचा अभ्यास, जिद्द अफाट होती. त्यातूनच एक एकरात द्राक्ष बाग लावली. पाण्यासाठी कूपनलिका घेतली. त्यावर इंजिन बसवले.

व्यवस्थापन नेटकेपणाने केले. दर्जेदार उत्पादन हाती आले. पुढे प्रगतिशील द्राक्ष बागायतदारअशी त्यांची ओळख निर्माण झाली. द्राक्ष शेतीत बाळकृष्ण यशस्वी झाले खरे. पण पुढे दुष्काळामुळे संकटांची मालिका सुरू झाली. अखेर द्राक्ष बाग काढण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.

पुढे केळीलागवडीचाही प्रयोग केला. दावणीला दुधाळ जनावरांचा गोठा तयार केला. काही काळ बाळकृष्ण राजकारणातही रमले. त्यातून तालुकाभर ओळख झाली. परंतु त्या नादात शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. कौटुंबिक अर्थकारणाचा डोलारा ढासळला. अखेर आपण कुठे चुकतो आहोत याचे आत्मपरिक्षण केले. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त झाले आणि शेतीलाच प्राधान्य दिले.

Processing Industry
Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

संकटाने मार्ग दाखविला

बाळकृष्ण यांची मुले प्रशांत आणि प्रसाद यांनाही संघर्षाला तोंड द्यावं लागलं. सूतगिरणी उभारली. पण त्यातही अपयश आले. कर्ज झाले. त्यातून मार्ग काढण्यासाठी धावपळ सुरू झाली. कोरोना आला.त्यात सूतगिरणी पूर्णपणेच बंद केली. आता कुटुंबाने उदरनिर्वाहाचा ठोस पर्याय शोधण्यास सुरुवात केली.

कोरोना काळात एक गोष्ट समजली ती म्हणजे बाकी सर्व व्यवसाय, गोष्टी या काळात ठप्प होतात. पण शेती, अन्नपदार्थ निर्मिती व त्यांची मागणी थांबू शकत नाही. त्या विचारातूनचअन्न प्रक्रिया व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. विविध माहिती स्रोत, यू-ट्यूब आदींच्या माध्यमातून व्यवसायाचा शोध सुरू केला. अनेक पर्यायांपैकी तुलनेने कमी खर्चात करण्याजोगा असा गव्हापासून आटा (पीठ) निर्मितीचा प्रकल्प रास्त वाटला.

सुरू केला स्टार्ट अप

प्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल, त्याची उपलब्धता, बाजारपेठेतील दर आदी बाबींचा अभ्यासकेला. त्यासाठी मध्य प्रदेश, पंजाब या ठिकाणी गव्हाच्या बाजारपेठांना भेटी दिल्या. विटा भागात कार्यरत कृषी विभाग- आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमरसिंह मोरे यांनी पंतप्रधान अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली. प्रकल्पाची किंमत ३० लाखांची होती.

त्यासाठी ३५ टक्के अनुदान मिळण्यासाठी व प्रशिक्षण देण्यासाठीही आत्मा विभागाने मदत केली. भांडवल उपलब्ध झाल्यानंतर आवश्‍यक यंत्रे राजकोट येथून खरेदी केली. विटा शहरापासून सुमारे पाच किलोमीटरवरील घाणवड येथील औद्योगिक वसाहतीत जागा भाडेतत्वावर घेतली. तेथे माउली फूड्स नावाने प्रक्रिया उद्योगाचा स्टार्ट अप २०२२-२३ या काळात सुरू केला.

Processing Industry
Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

...अशी होते प्रक्रिया

सुरुवातीला तयार केलेले पीठ घरी वापरून पाहिले. त्याचे नमुने सहकाऱ्यांनाही दिले. गुणवत्ता जोखली. काही चुकाही झाल्या. त्यात स्वअभ्यासातून सुधारणा केल्या. ‘भारतीय खाद्य निगम’च्या ई- लिलाव यंत्रणेतून मिरजेहून गव्हाची खरेदी होते. त्याचबरोबर मध्य प्रदेश, पंजाब व स्थानिक शेतकऱ्यांकडूनही तो घेण्यात येतो.

प्रति दिन अडीच ते तीन टन गव्हावर प्रक्रिया केला जाते. प्रति दिन अडीच ते तीन टन गव्हावर प्रक्रिया केला जाते. सुमारे १०० किलो गव्हापासून ८८ किलोपर्यंत आटा तयार होतो. उर्वरित १० टक्के घटक हे भुस्सा व फोलपटाचे असतात. परिसरातील पशुपालकांकडून किलोला २४ रुपये दराने त्याची खरेदी होते. आट्याव्यतिरिक्त हे अतिरिक्त उत्पन्न मिळून जाते.

रेणावी गावाची वेगळी ओळख

दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी गावातील रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते.त्यात लाखो रुपयांची उलाढाल होते. भक्तीचा वसा घेतलेले हे गाव संपूर्णपणे शाकाहारी आहे. राज्यातील हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. गावातील अनेक जण गलाई (सोने-चांदी व्यवसाय)व्यवसायानिमित्त देशभर विखुरले आहेत.

व्यवसायात होतेय वृद्धी

बाळकृष्ण यांचा स्वभाव बोलका असल्याने आपण उत्पादनाचे ‘मार्केटिंग’ चांगल्या प्रकारे करू शकतो असा आत्मविश्‍वास होता. ते विविध दुकानांमध्ये आपला आटा घेऊन जायचे, त्याची वैशिष्ट्ये वा गुणवत्ता विक्रेत्यांना समजावून सांगायचे. विक्रेते एक बॅग ठेवून जा असे सांगत. हळूहळू गुणवत्ता लक्षात येऊ लागल्यानंतर त्यांच्याकडून मागणी येऊ लागली. त्यानुसार ‘मार्केट’ तयार करण्यास बाळकृष्ण यांनी सुरुवात केली.

दिवसभरात कोणकोणत्या ग्राहकांकडून कशा ‘ऑर्डर्स’ आहेत त्या नोंदी पाहून उत्पादन व विक्रीचे नियोजन होते. अधिकाधिक विक्री रोखीने होते.त्यामुळे भांडवलाची कमतरता भासत नाही. कच्चा माल कायम उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने दक्ष राहावे लागते. गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता ती कायम राखल्यानेच खानापूर, आटपाडी, तासगाव आणि खटाव (सातारा) या तालुक्यात मिळून सुमारे दोनशे दुकानांत माउली ब्रॅण्डचा आटा उपलब्ध झाला आहे.

परिसरातील ग्राहक देखील जागेवर येऊन खरेदी करतात. सन २०२२-२३ मध्ये ५० टन, २०२३-२४ मध्ये ३०० टन, तर २०२४-२५ (आतापर्यंत) ४०० टन विक्री करण्यापर्यंत मजल मारली आहे. दोन्ही मुले वडिलांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात राबत असल्यानेच व्यवसाय वाढीस लागला आहे.

प्रशांत यादव ९१५६७३७०००

बाळकृष्ण यादव ९६६५७५३२५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com