Retired Soldier's Success Story : नाशिक जिल्ह्यातील धोंडगव्हाण (ता. चांदवड) येथील भारतीय वायुसेनेतील सेवानिवृत्त जवान पंडितराव बळवंतराव चौरे यांचे पहिली ते सातवीपर्यंचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत गेले. त्यांचे वडील बळवंतराव यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. अशावेळी शिक्षणासाठी थोडीफार पुंजी उपलब्ध होण्यासाठी पंडितरावांनी बालपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लासलगाव परिसरात कांद्याच्या खळ्यावरही काम केले. पुढे गावात माध्यमिक शिक्षण सुविधा नसल्याने बहिणीच्या गावी वरखेडे (ता. दिंडोरी) येथे त्यांचे शिक्षण झाले. त्या काळच्या ‘एसएस्सी’ परीक्षेत अग्रक्रमांकाने ते उत्तीर्ण झाले.
भारतीय वायुसेनेची प्रेरणा
नववीतच पाठ्यपुस्तकात असलेल्या Why people join the Indian Air Force - For bright future and exciting career. या वाक्याने ते प्रेरित झाले होते. पुढे भारतीय वायुसेनेत भरती होण्याचा ध्यासच त्यांनी घेतला. भरतीपूर्व तयारीची सुरुवात केली. सर्व कसोट्यांवर उतरून मे १९७९ मध्ये मुंबईत भारतीय वायुसेनेच्या तांत्रिक विभागात ते भरती झाले. ‘एअरमन’ म्हणून त्यांनी सेवा सुरू केली. तर सार्जंट या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. देशाच्या सीमावर्ती व अति संवेदनशील भागात सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. देशाच्या विविध भौगोलिक भागांचा प्रत्यक्ष जवळून संबंध आला. शेती-मातीची आवड कायम जपली होती. त्यामुळे वायुसेनेत असतानाच निवृत्तीनंतर शेतीच करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. सन १९९४ मध्ये सेवापूर्तीनंतर एचएएल, नाशिक येथे एक वर्ष त्यांनी सेवा दिली. त्यानंतर राजीनामा देत शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष देण्यास सुरुवात केली.
कृषी ज्ञानाची भागवली भूक
वडिलोपार्जित अडीच एकर शेती होती. सुरुवातीपासूनच फलोत्पादन शेतीचा व सुधारित पद्धतीचा अवलंब केला. त्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, तज्ज्ञांच्या संपर्कात राहून ज्ञानवृद्धी केली. मशागत, लागवडीपासून ते काढणीपश्चात तंत्रज्ञान, प्रतवारीसहसर्व गोष्टी शिकून घेतल्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून फळबागा, भाजीपाला विकास, फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका पूर्ण केल्या. आज द्राक्ष हे त्यांचे मुख्य पीक आहे. त्यात थॉम्पसनसह निवड पद्धतीने विकसित केलेल्या नव्या वाणाची लागवड आहे. बाकी हंगामी पिके आहेतच.
मातीचे आरोग्य जपण्याचा ध्यास
तज्ज्ञांच्या संगतीत राहून सेंद्रिय शेती, मातीचे आरोग्य जपणे या संकल्पना समजून घेतल्या. शेतात गांडूळ खत प्रकल्पाचा आदर्श नमुना तयार केला. साखर कारखान्याकडील प्रेसमड, शेतातील काडी कचरा, धसकटे, पालापाचोळा, तण यांच्या आधारे बायोडायनॅमिक पद्धतीने सेंद्रिय खत त्यांनी केले आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी ताग, धैचा अशा हिरवळीच्या खतांचा ते वर्षाआड प्रयोग करतात. मातीचे आरोग्य जपल्याने त्या मातीचा आता वेगळा सुगंध येऊ लागला आहे. मातीत गांडुळांची संख्याही वाढली आहे. शेणखत व जिवामृत निर्मितीसाठी गीर गायीचे संगोपन केले आहे.शिवाय दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांचाही वापर पीक संरक्षणात करतात.
बाजारपेठेचा अभ्यास
सन १९९५ मध्ये शेतीत सुरुवात केलेल्या पंडितरांवांनी द्राक्षासोबत भाजीपाला उत्पादनही घेण्यास सुरुवात केली होती. सन १९९६ ते २००२ या काळात त्यांनी निर्यातक्षम दर्जाची कारली, दुधी भोपळा, भेंडी व वांगी यांचे उत्पादन केले. त्याचे तपशील आजही जपून ठेवले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन नवी दिल्ली येथील आझादपूर बाजारपेठेला भेट दिली. व्यापाऱ्यांची चौकशी करून यादी तयार करून बाजारपेठेत पाठविलेल्या सर्व मालाचे व्यवस्थितरीत्या ‘रेकॉर्ड’ तयार केले. त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांची विक्रीत होणारी फसवणूक रोखण्यासाठी पंडितराव कायम जागरूक राहिले आहेत.
कृषी विस्तार कार्यातही पुढे
कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांत प्रसार करण्यासाठीही पंडितराव आग्रही असतात. सन १९९४ मध्ये गावात त्यांनी अवंतिका कृषी वाचनालयाची स्थापना केली. आज शेकडो पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत. शेतकरी मासिक, ‘ॲग्रोवन’ यांचे विशेषांक व महत्त्वाची कात्रणे जपून ठेवली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षण विभागाचे उच्च पदाधिकारी डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली धोंडगव्हाण ज्ञानगंगा कृषी प्रयोग परिवाराची स्थापना केली. परिवाराचे ते मुख्य समन्वयक आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, तज्ज्ञांशी संवाद, चर्चासत्रे, शेतकरी सहली यांचे ते आयोजन करतात. पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व कांदा संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ- शेतकरी मंच स्थापन. झाल्यानंतर त्यांनी स्वयंसेवकाची भूमिका पार पाडली. कृषी तंत्रज्ञान ग्रामस्तरावर उपलब्ध व्हावे यासाठी धोंडगव्हाण पुष्करराज बाजार (कृषी तंत्रज्ञान) माहिती केंद्राची स्थापना २००६ मध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानासह बाजारभाव, हवामानाची माहितीही उपलब्ध झाली.
पंडितरावांच्या शेतीतील ठळक बाबी
आंबा, पेरू, रामफळ, सीताफळ, पपई, चिकू, संत्रा, सफरचंद, मोसंबी अशी विविधता.
तणनाशकाचा गरजेनुसार मर्यादित वापर. यंत्राद्वारे तणकापणी कंपोस्टिंगद्वारे खतनिर्मितीवर भर.
पाण्याची टंचाई असल्याने उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचनासोबत सेंद्रिय आच्छादन.
माती- पाणी परीक्षण करूनच शिफारशीनुसार अन्नद्रव्य तसेच एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन. कोलकता, दिल्ली, चंडीगड, लखनौ येथील बाजारपेठांमध्ये विक्री.
शेतीमातीत रमला आनंदी परिवार
वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर पंडितराव सुमारे तीस वर्षांपासून शेतीत आहेत. त्यांचे बंधू माजी सैनिक परसराम हे विभक्त असले तरी कुटुंबातील सर्व सदस्य एकदिलाने राहतात. पंडितराव यांच्या पत्नीप्रतिभा जिल्हा बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेत आता शेतीत रमल्या आहेत. मुलगा आदित्य व सून गौरी‘केमिकल इंजिनिअर आहेत. दोन्ही मुली विवाहित आहेत. थोरली शीतल संगणक शाखेत पदव्युत्तर तर धाकटी पूजा कला शाखेत पदव्युत्तर असून, शिक्षणशास्त्र पदवी पूर्ण केली आहे. देशसेवेचे व्रत जपल्यानंतर शेतीत राबणारा हा प्रयोगशील आणि आनंदी परिवार आहे.
९४२२२४८८९८, ९०७५४७४५४१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.