Water Conservation : जलसंधारणातून वेणी खुर्द लागवसला विकासाचा नवा मंत्र

Agriculture Development : यवतमाळ जिल्ह्यात वेणी खुर्द (ता. पुसद) गावात लोकसहभाग व शासनाचा संयुक्त पुढाकारातून जलसंधारण क्रांती घडली आहे. त्यातून भूगर्भातील पाणीपातळी वाढून उन्हाळ्यात देखीलपिके घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. जलसंधारणातून शेती विकासाचा नवा मंत्र वेणी खुर्दला गवसला आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

दिनकर गुल्हाने

Success Story of Agriculture : यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सात किलोमीटरवर खळाळत्या नाल्याच्या काठावर वसलेले वेणी खुर्द हे छोटेसे गाव आहे. सुमारे तीन हजार लोकवस्ती असून चारशे भागधारक शेतकरी आहेत. गावातील शेती संस्कृती विकसित आहे. शेतमजुरांची साथही चांगली आहे. भाजीपाल्याचे नगदी पीक हे वेणी खुर्दचे वैशिष्ट्य आहे.

शेतीत राबणारा प्रत्येक शेतकरी प्रयोगशील आहे. मुख्य अडचण हीच होती की उन्हाळ्यात खळाळत्या नाल्याचा प्रवाह कमी झाला की विहिरीतील पाणीपातळी खोल जायची. तोंडाशी आलेली पिके सुकून जात. त्यामुळे शेतकरी उन्हाळी पीक घेण्यास धजावत नसत.

जलसंधारणाच्या कार्यास चालना

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांचा पुसद हा विधानसभा मतदार संघ. त्यांनी मुख्यमंत्री काळात भविष्याचा वेध घेत जलसंधारणाच्या कार्याला चालना दिली. वाहत्या नाल्यावर बंधारे घालून चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवले. हे पाणी जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाणीपातळी वाढली. याच कार्याची प्रेरणा यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी घेतली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून वेणी खुर्द येथे जलसंधारणाचे कार्य सहा वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. जलसंधारणाबद्दल कळकळ असलेले गावातील शेतकरी कार्यकर्ते रवींद्र पुंड यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने वाहत्या नाल्यावर वनराई बंधारे बांधण्याचे कार्य हाती घेतले.

Water Conservation
Water Conservation : विहीर, आडांच्या पुनरुज्जीवनासाठी सरसावले दहा गावांचे विद्यार्थी

गावाचे पालटू लागले रूप

गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिल्याने या कामास मोठा प्रतिसाद मिळाला. पाहता पाहता सहा बंधाऱ्यातून पाणी अडविले गेले. त्याचा परिणाम दृष्टीस येऊ लागला. नाल्यालगतच्या जमिनीतील विहिरींची पातळी चांगलीच वाढली. उन्हाळ्यातील पिके हिरवीगार झाली. पीक उत्पादनवाढीस चालना मिळाली. जलसंधारणातून शेती विकासाचा नवा मंत्र वेणी खुर्दला गवसला.

जानेवारी- फेब्रुवारीत वाहत्या नाल्यावरील तुडुंब भरणारे बंधारे पाहून मन हरखून जाई. परंतु हे वनराई बंधारे पावसाळ्यात नाल्याला मोठा पूर आला की वाहून जात. त्यामुळे दरवर्षी लोकसहभागातून पुनश्‍च बंधारे बांधण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. साहजिकच कामाला थोडीफार खीळ बसत होती. त्यावर अभ्यास झाला. सिमेंट बंधारा उभारल्यास कायमस्वरूपी पाण्याची साठवण होऊ शकते ही बाब लक्षात आली.

बंधाऱ्याने केले शिवार हिरवेगार

कायमस्वरूपी साठवण बंधाऱ्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करण्यातच आला. त्यातून या विभागाने उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा धबाले-तायडे यांच्या मार्गदर्शनातून २०२३ मध्ये साठवण बंधारा उभारला. एक नोव्हेंबरला बंधाऱ्यावर गेटद्वारे पाणी अडविण्यात आले. हा तुंबा एक किलोमीटरपर्यंत थांबला आहे.

त्यातून नाल्यालगतच्या शिवारातील विहिरींची पाणीपातळी वाढली. चक्क उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सुमारे सातशे एकर शेती ओलिताखाली आली. पैकी दोनशे एकरांत भुईमूग, तीस एकर ज्वारी, पंधरा एकरांत तीळ अशी पिके वाढीस लागली. गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिके हिरव्या रानातून वाऱ्यासवे डोलू लागली.

उन्हाळ्यात फळबागा वाचविणे शक्य झाले. हिरवीगार राने समृद्धीची गाणे गाऊ लागली. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. मच्छीमारांना उपजीविका मिळाली. भाजीपाला शेतीत तरुणांना रोजगार मिळाला. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर झाली.

शेती झाली प्रयोगशील

शासनाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) गावात २०१८ पासून पाच वर्षे
नियोजन पद्धतीने राबविण्यात आला. त्या अंतर्गत शिवारात दोन सामूहिक तर तीन वैयक्तिक शेततळी लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आली. त्या आधारे वीस शेतकऱ्यांनी संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ फळबाग लागवड केली. सुमारे ४० टक्के पिके तुषार, ठिबक सिंचनावर घेण्यात येत आहेत.

शेडनेट व पॉलिहाउस उभारण्यात आली आहेत. दोन विहिरी खोदण्यात आल्या असून, ११ शेतकऱ्यांना मोटर पंप, पाइपलाइन आदी सुविधांचा लाभ झाला. गांडूळ खत, नाडेप कंपोस्ट तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना निधी मिळाला. कृषी प्रगती शेतकरी पुरुष बचत गटाला अवजारे मिळाली. त्यात ट्रॅक्टर, मळणी यंत्र, बीबीएफ पेरणी यंत्र, रोटावेटर, कल्टिवेटर, तीन फळी नांगर आदींचा २७८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. शेतकरी बचत गटांना उद्योग उभारणीसाठी अर्थसाह्य प्राप्त झाले.

Water Conservation
Soil and Water Conservation : पाणीटंचाईग्रस्त ‘लाठ खुर्द’ने घडविली किमया

मिनी डाळ मिल उभारणी

गावातील संत खप्ती महाराज शेतकरी पुरुष गटाला पोकरा अंतर्गत मिनी डाळ मिल
मिळाली आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांकडून गावातच तूर खरेदी करण्यात येते. बचत गटातर्फे त्यासाठी योग्य दर देण्यात येतो. तयार झालेल्या शुद्ध, स्वच्छ तूर डाळीवर ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडतात.

बांधावरील प्रयोगशाळा

गावातील कृषी क्रांती सेंद्रिय गटाला बांधावरील प्रयोगशाळा मंजूर झाली असून, त्याचे काम यंदाच्या १५ एप्रिलपासून सुरू झाले. सध्या येथे ट्रायकोडर्मासह जैविक कीडनाशके निर्मिती करण्यात येत आहे. गावातच योग्य किमतीत उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी खरेदीस जाण्याची गरज उरलेली नाही.

ग्राम सुधारणेला मिळाली चालना

-गावात तयार झाल्या रस्ते, नाले, वीज दिवे यासारख्या मूलभूत सोयीसुविधा.
-लोकवर्गणीतून सहा पांदण रस्ते. त्यामुळे शेतीमाल वाहतूक झाली शक्य.
-लोकसहभागातून गावातील मोक्षधाम विकसित झाला. परिसरात सुंदर फुलझाडांची लागवड.
-धार्मिक कार्यक्रमातून गावातील संस्कृती, सद्भाव जोपासला जातो. हरेश्‍वर संस्थानात
दरवर्षी श्रीमद् भागवत कथा रंगते. श्री संत खप्ती वैभव ग्रंथ पारायण सप्ताहात नवतरुण मंडळी पुढाकार घेतात. या संस्कारक्षम वातावरणामुळे गावातील तरुण पिढी व्यसनांपासून दूर आहे.
-उच्च प्राथमिक मराठी शाळा झाली ‘डिजिटल’. शाळेच्या बोलक्या भिंती चिमुकल्यांना आकर्षित करतात. शाळा सुधार समितीचे अध्यक्ष गजानन मस्के यांनी लोकवर्गणीतून ‘वॉटर फिल्टर’, ‘सीसीटीव्ही कॅमेरे’, ‘प्रोजेक्टर’, विज्ञान प्रयोगशाळा या सुविधा निर्माण करण्यात पुढाकार घेतला.
-दोन अंगणवाड्या.

गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. ग्रामपंचायतीची नवी इमारत प्रस्तावित आहे. घरोघरी नळातून पाणी मिळावे यासाठी जलवाहिनीचे काम करण्यात येत आहे. शेतीविषयक प्रशिक्षण, विविध योजना यासाठी शिबिरे वेळोवेळी आयोजित करण्यात येतात.
पंडित पुंजाराव मस्के, सरपंच, वेणी खुर्द, ९१४६७७९७०२
गावकरी, शासन यांच्या एकत्रित कामांतून गावाला समृद्धीचा मार्ग मिळाला आहे. बंधाऱ्याचा लाभ लक्षात घेता याच नाल्यावर सहा कोल्हापुरी बंधारे बांधले तर विकासाला अजून मोठी चालना मिळेल.
रवींद्र पुंड, संचालक, संत खप्ती शेतकरी उत्पादक कंपनी, वेणी खुर्द, ९७६७१७१०६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com