Orchard Development : अभ्यासातून विकसित झालेली ३५ एकर फळबाग

Orchard Management : माणिकवाडा (जि. नागपूर) येथील विलास चालखोर यांनी चिकाटी, परिश्रम व मार्गदर्शनातून सुमारे ३५ एकरांतील संत्रा व मोसंबी बागेचे यशस्वी व्यवस्थापन केले आहे. त्यातून उत्पादकता व दर्जा टिकविला आहे.
Orchard Development
Orchard DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Success Story of Farmer : नागपुरी संत्रा त्याच्या खास स्वादासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील बागायतदारांनी प्रयोगशील वृत्तीने संत्र्याच्या बागा मेहनतीने जोपासून वाढवल्याही आहेत. जिल्ह्यातील माणिकवाडा(ता. नरखेड) येथील विलास मोतीराम चालखोर हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या गावापासून मध्य प्रदेशची सीमा दोन किलोमीटरवर आहे.

या भागात संत्रा उत्पादकांची संख्या सर्वाधिक आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा पावसाच्या पाण्यावरील मृग बहर घेण्याकडे कल आहे. विलास मात्र सिंचनाची सोय असल्याने अनेक वर्षांपासून आंबिया बहर घेतात.

त्यांची ८ एकर, २२ एकर व सहा एकर अशी तीन ठिकाणी शेती आहे. सुमारे २७ एकरांत संत्रा व त्याची तीन हजारांपर्यंत झाडे, तर आठ एकरांत मोसंबी व एक हजारांपर्यंत झाडे आहेत. झाडे आठ ते १५ वर्षे वयापर्यंतची आहेत. संत्राचा नागपुरी वाण आहे. तर मोसंबीचे न्यूसेलर, काटोल गोल्ड व देशी असे तीन वाण आहेत. पैकी पहिल्या दोन वाणांना चकचकीतपणा असल्याने त्यांना दर चांगला मिळतो. देशी वाण रोगप्रतिकारक आहे.

फळबाग व्यवस्थापन

पाण्यासाठी पाच विहिरी, दहा बोअरवेल यांचा स्रोत असून, ठिबकच्या आधारे संपूर्ण ३५ एकरांवर सिंचन व्यवस्थापन होते. दरवर्षी २५ डिसेंबरपर्यंत आंबिया बहर घेतलेल्या बागेत फळांची तोडणी पूर्ण होते. त्यानंतर बाग ताणविरहित करण्यावर भर असतो. रोटाव्हेटरचा वापर होतो.

प्रति झाड सरासरी ३० किलो शेणखत व सोबत डीएपी, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये आदी मिळून दीड ते दोन किलो मात्रा देण्यात येते. झाडांची वाळलेली साल व अनावश्‍यक फांद्यांची छाटणी होते. या वेळी झाडाला इजा पोहोचून बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची शक्‍यता ल क्षात घेऊन बुरशीनाशकाचा वापर होतो.

नवतीच्या (नवी पालवी) वेळी कीटकनाशकाची फवारणी होते. चिकट सापळेही लावण्यात येतात. फळ हरभऱ्याच्या दाण्याच्या आकाराचे झाल्यानंतर युरिया १०० ते २०० ग्रॅम प्रति झाड दिला जातो. फळ परिपक्‍व होण्याचा अंदाज घेत एका महिन्यापूर्वी फवारणी बंद केली जाते. फळ लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे झाले असताना फळमाशीसाठी आणि परिपक्‍व होण्याच्या वेळेला पतंग नियंत्रणासाठी सापळे बागेत लावण्यात येतात. काटोल (नागपूर) येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील तज्ज्ञ डॉ. प्रदीप दवणे यांचे मार्गदर्शन होते.

Orchard Development
Orange Orchard Management : अमरावतीतील बोदड येथील विपुल चौधरी यांचे संत्रा नियोजन

उत्पादन व विक्री पद्धत

संत्रा व मोसंबीचे प्रत्येकी १० ते १२ टन उत्पादन मिळते. विक्री पद्धती दोन प्रकारची असते. यात टनांवर आधारित पद्धतीत तोडणी शेतकऱ्याकडे असते. हुंडी पद्धतीत बागेचा अंदाज घेत व्यवहार ठरतो. यात तोडणी, मजुरी आदी खर्च व्यापारी करतात. परिणामी बहुतांश शेतकरी याच पद्धतीला पसंती देतात.

मागील वर्षी विलास यांच्या संत्रा बागेतून एकूण २०० टन, यंदा १९० टन, तर मोसंबी बागेतून मागील वर्षी ५० टन व यंदा ६० टन माल मिळाला. मागील वर्षी हुंडी पद्धतीने संत्रा ४५ लाख रुपये, मोसंबी ८ लाख व यंदा अनुक्रमे ५३ लाख व ११ लाख रुपये दराने बाग देण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील वरुड, नांदगावपेठ भागातील व्यापारी बाग खरेदीसाठी येतात.

शेतातच गाडी लोड करून बांगलादेशाला माल निर्यात होतो. विलास सांगतात, की एका प्लॉटमधील काढणी व त्याचे पैसे जमा झाल्यानंतरच पुढील प्लॉटची काढणी व्यापाऱ्याला करू दिली जाते. अशा पद्धतीत आर्थिक फसवणूक व जोखीम कमी होते.

Orchard Development
Orange Orchard Management : संत्रा बाग लागवडीचे नियोजन कसे असावे?

अतिरिक्त उत्पन्न

फळबागेला पूरक म्हणून अनेक वर्षांपासून संत्रा व मोसंबीची वर्षाला प्रत्येकी दहा हजार रोपे तयार केली जातात. शेतकऱ्यांकडून त्यास चांगली मागणी असते. रंगपूर, जंबेरी हे ‘रूटस्टॉक’ जतन केले आहेत. त्यांच्या आधारे कलमे तयार केली जातात.

शेतीतूनच प्रगती

तीनही शेतांच्या जागी ‘फार्महाउस’ उभारले आहेत. गांडूळ खत निर्मितीचे दोन युनिट्स आहेत. सुमारे ३० जनावरे आहेत. त्यांच्या मार्फत ३० ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. सुमारे ४० ट्रॉली शेणखत बाहेरून खरेदी केले जाते.

त्या माध्यमातून जमिनीचा पोत राखण्यात येतो. सुमारे सहा कायमस्वरूपी मजूर असून, ते सर्व शेतांमध्ये व्यवस्थापन करतात. गरजेनुसार गावातील अन्य मजुरांची मदतही घेण्यात येते. क्षेत्र मोठे असले तरी विलास दररोज शेतावर जाऊन सर्व कामांचे नियोजन कुशलपणे सांभाळतात.

फळबाग शेतीतूनच शेती व कौटुंबिक प्रगती झाल्याचे विलास सांगतात. रोपवाटिका सुरू करता आली. नरखेड येथे दोन घरे घेतली असून, ती दोन बॅंकांना भाडेतत्त्वावर दिली आहेत. गावी घर आहे. मुले नागपूर येथे शिक्षण घेत आहेत. भावाचे ‘मेडिकल’चे दुकान आहे.

विलास चलखोर ९७६४७९३७७८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com