Maize Production : एकरी ४२ क्विंटल मका उत्पादनातील आदर्श

Agriculture Success Story : नाशिक जिल्ह्यातील गंगाधरी (ता. नांदगाव) येथील सुनील जुन्नरे म्हणजे खरीप मका व रब्बी कांदा या पिकांमधील राज्यातील सर्वोत्कृष्ट मास्टर शेतकरी झाले आहेत. ठिबक, यांत्रिकीकरणातून मका शेतीत मजूरबळ व वेळ वाचवण्यातही ते यशस्वी झाले आहेत.
Maize Farming
Maize FarmingAgrowon
Published on
Updated on

Maize Farming : नाशिक जिल्ह्यात गंगाधरी (ता. नांदगाव) येथील सुनील जुन्नरे कुटुंबाची पूर्वी हालाखीची परिस्थिती होती. वडील गंगाधर जिरायती पिके घेत. त्यांच्या मुलांनी, प्रामुख्याने सुनील यांनी १९८० पासून शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पीक पद्धतीत बदल करून फ्लॉवर, कोबी अशी पिके ते घेऊ लागले.

छत्रपती संभाजीनगर येथे हा माल जायचा. मन लावून, सर्व कष्ट सोसून ही शेती यशस्वी केली. आत्मविश्‍वास वाढला. माल वाहतुकीसाठी ट्रक खरेदी केला. काळानुसार पीक पद्धतीची रचना बदलली. पण १९९२ पासून मका ते खरिपातील नगदी पीक आजही इतक्या वर्षांनंतर कायम आहे. हळद, आले, यांचे प्रयोग केले. एकरी १०५ टनांपर्यंत उसाचे उल्लेखनीय उत्पादन घेतले.

आजची पीक पद्धती

एकूण क्षेत्र- २० एकर

खरिपात मका व रब्बी, उन्हाळ्यात कांदा

मका क्षेत्र- १२ ते १५ एकर, उत्पादन खर्चात बचत व उत्पादनात वाढ असा हातखंडा निर्माण केला आहे.

Maize Farming
Maize Crop Farming : मका पिकात तयार केला हातखंडा

मका पीक व्यवस्थापन- ठळक बाबी

पूर्वी सुधारित बियाणे तेवढे उपलब्धता नव्हती. शिवाय टोकण पद्धतीने लागवडीसाठी मनुष्यबळाची गरज अधिक असते. मात्र मागील आठ वर्षांत वाण निवड, लागवड पध्दत. यांत्रिकीकरण, काढणीपश्‍चात व चारा उत्पादन या अंगाने बदल केले आहेत.

मका हे खादाड पीक असल्याने एक वर्षाआड एकरी २० क्विंटल कोंबडीखत व शेणखत यांचा मिसळून वापर. जमिनीचा पोत टिकवण्यात यश आले आहे.

जमीन काळी कसदार. त्यात फेरपालट करून मका लागवड.

खोलगट नांगरणी, त्यानंतर रोटावेटर द्वारे जमीन भुसभुशीत करतात.

चार फुटांची सरी पाडून ठिबकच्या नळ्या पसरवून त्याच्या बाजूला दुहेरी लागवड.

अधिक उत्पादनक्षम व ११० ते ११५ दिवसांत येणाऱ्या वाणांची निवड.

पूर्व-पश्‍चिम लागवड. त्यामुळे हवा खेळती राहते.

लागवडीपूर्वी १५-१५-१५, १०- २६- २६, डीएपी एकरी दीड गोणीप्रमाणे मात्रा.

दोन रोपांत सव्वा ते दीड फूट व दोन रोपांत नऊ इंच अंतर. एकरी सरासरी २६ ते २७ हजार दाणे (बियाणे) वापर.

अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गरजेनुसार प्रतिबंधात्मक रासायनिक व जैविक फवारण्या.

वाढीच्या अवस्थेत ठिबक व फवारणीद्वारे नॅनो युरिया, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यासह सूक्ष्म अन्नद्रव्ये.

दाणे भरण्याच्या अवस्थेत ०:०:५० एकरी ५ किलो आठ दिवसाने मात्रा.

पिकाची वाढ ६ ते ७ फुटांपर्यंत. प्रति बिट्टीचे (कणीस) सरासरी वजन २०० ते ३०० ग्रॅम. दाणे भरीव असल्याने उत्पादन व वजनात वाढ.

Maize Farming
Maize Fodder Cultivation : अशी करा सकस, रुचकर चाऱ्यासाठी मका लागवड ?

उत्पादन आणि अर्थकारण

एकरी ३५ ते ४२ क्विंटलपर्यंत मका उत्पादनात सातत्य ठेवले आहे. त्यासाठी २० हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. प्रति क्विंटल दोन हजार ते २३०० रुपयांपर्यंत दर मिळतो. २५ ते ३० टन चारा उपलब्ध होतो. पशुपालक एकरी १० हजार रुपयांप्रमाणे तो खरेदी करतात. त्यातूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते. चाऱ्यापासून मुरघास निर्मितीही केली जाते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न सोडवला आहे. एकूणच हे पीक जुन्नरे कुटुंबासाठी कमी जोखमेत खात्रीशीर उत्पन्नाचा ठोस पर्याय ठरले आहे.

कुटुंबाचे एकीचे बळ

जयंत, शरद, वसंत, सुनील अशी कुटुंबात चार भावंडे आहेत. घरचे कृषी सेवा केंद्र, मेडिकलचे दुकान असे व्यवसाय असून, शेतीची प्रमुख जबाबदारी सुनील पाहतात. त्यांनी पशुवैद्यकीय पदविका घेतली आहे. आज या संयुक्त परिवारात २२ ते २५ सदस्य गुण्यागोविंदाने राहतात. शेतीतील कष्टांच्या बळावर त्यांना पेट्रोल पंपदेखील मिळाला आहे.

सुनील जुन्नरे ९४२२५०९८०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com