Weather Update Pune : कमाल तापमानात वाढ झाल्याने विदर्भ अक्षरशः भाजून निघत आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा मेघगर्जनेसह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४३ अंशाच्या वर सरकला आहे. विदर्भासह राज्यातही उष्ण व दमट हवामान असह्य ठरत आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, गडचिरोली, बुलडाणा, ब्रह्मपुरी येथे तापमान ४३ अंशावर होते. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३५ ते ४२ अंशांच्या दरम्यान होते.
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून, आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम
अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात असलेले 'बिपॉरजॉय' अतितीव्र चक्री वादळ उत्तरेकडे सरकत आहे. या वादळाची तीव्रता कायम आहे. गुरुवारी (ता.८) ही प्रणाली गोव्यापासून ८५० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, मुंबईपासून ९०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ९३० किलोमीटर दक्षिणेकडे होती.
ही प्रणाली उत्तर आणि वायव्य दिशेकडे सरकण्याचे संकेत आहेत. वादळामुळे समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची, तसेच किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३७.४ (२३.६), जळगाव ४१.५ (२१.०), धुळे ३९.० (-), कोल्हापूर ३५.६ (२७.५), महाबळेश्वर २९.९ (१८.५), नाशिक ३६.१ (२३.२),
निफाड ३८.१ (२४.८), सांगली ३६.६ (२४.२), सातारा ३७.८ (२३.७), सोलापूर ४०.६ (२५.६), सांताक्रूझ ३४.६ (२८.६), डहाणू ३५.४ (२८.०), रत्नागिरी ३४.५ (२७.०),
छत्रपती संभाजीनगर ३९.८ (२३.८), नांदेड ४०.८ (२९.२), परभणी ४१.३ (२८.७), अकोला ४२.३ (२९.९), अमरावती ४१.०(२४.३), बुलडाणा ४३.२ (२६.४), ब्रह्मपुरी ४३.२ (२६.४),
चंद्रपूर ४३.८(२८.२), गडचिरोली ४३.४ (२७.२), गोंदिया ४३.८ (२५.४), नागपूर ४१.० (२५.५), वर्धा ४३.५(२८.०), वाशीम ४१.६(२६.८) यवतमाळ ४१.५ (२५.५).
आज पावसाचा अंदाज असा...
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : बीड, धाराशिव, लातूर.
विदर्भ : अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.