Pune News : मॉन्सून देशातून परतल्यानंतर राज्यात वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे. अरबी आणि बंगालच्या समुद्रांत तयार होणाऱ्या कमी दाब प्रणालींमुळे पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील अनेक भागांत जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस पडला. या पिकाने काढणीस आलेली खरीप पिके, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान केले आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत आहे.
परतीच्या पावसाने डोळ्यात पाणी आणल्यानंतर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) झालेल्या जोरदार पावसामुळे कसमादे भागात मोठा फटका बसला आहे. तर सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणा महसूल मंडलात ६९ मिमी इतकी नोंद झाली आहे. अनेक भागांत मका, सोयाबीन,कांदा व कांदा रोपवाटिकांना, तसेच डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला, मका पिकांना तडाखा बसल्याने नुकसान वाढले आहे.
मालेगाव, सटाणा, कळवण, नांदगाव, सुरगाणा, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, येवला तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.खानदेशात पावसाचा फटका बसत आहे. शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी व रात्री विविध भागांत पाऊस, वादळी झाले. यात पिकांसह घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा भागांत अर्धा तास वादळी पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यांतील पाचोरा, भडगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, धरणगाव, चोपडा, अमळनेर आदी भागांतही पाऊस झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वत्र मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू असून, देवरुख कांजिवरा येथे एका घरावर वीज कोसळून मोठे नुकसान झाले तर राजापूरमध्ये पाच जण वीज पडून जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता.१८) अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने सर्वांची त्रेधातिरपीट उडाली होती. रात्रभर पाऊस सुरू होता.
बुलडाणा जिल्ह्यातील जोरदार पावसाने बुलडाणा, खामगाव, शेगाव, मोताळा, जळगाव जामोद आदी तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. शेगाव तालुक्यातील माटरगाव मंडलात सुमारे ७०.३ मिलिमीटर म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली.
शनिवारी सकाळी पर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :
कोकण : मंडणगड, खेड, पोलादपूर, मोखेडा, वाकवली प्रत्येकी ३०, जव्हार, महाड, कुलाबा, राजापूर, वाडा, मुरबाड, शहापूर प्रत्येकी २०.
मध्य महाराष्ट्र : भडगाव ११०, पाचोरा, सटाणा प्रत्येकी ७०, सुरगाणा ६०, त्र्यंबकेश्वर, गिरणा धरण, गारगोटी, चाळीसगाव प्रत्येकी ५० जामनेर, दहिगाव, अक्कलकुवा, दहिगाव प्रत्येकी ४०, अक्कलकुवा, धुळे, ओझरखेडा, शाहूवाडी, पारोळा, कळवण, कोल्हापूर प्रत्येकी ३०.
मराठवाडा : सोयगाव ७०, सिल्लोड, भोकरदन प्रत्येकी २०.
विदर्भ : बुलडाणा ४०, चिखली, शेगाव, मातेळा, जळगाव जामोद, यवतमाळ प्रत्येकी ३०.
बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा धूळधाण
नाशिक जिल्ह्याला झोडपले; कसमादे पट्ट्यात नुकसान
सोयाबीन पिकाचे नुकसान वाढले
धुळे, जळगावात खरीप वाया गेला
मका, कांदा व कांदा रोपवाटिकांचे नुकसान
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.