
Pune News: मे महिन्यात राज्यासह देशात कोसळलेल्या तुफान पावसाने नवा उच्चांक रचला आहे. १९०१ पासूनच्या नोंदी विचारात घेता राज्यात आतापर्यंतच्या विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यातील सरासरीचा विचार करता हा पाऊस तब्बल ११ पट आहे. मे मध्ये राज्यभरात झालेल्या पावसाने भर उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आले, धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आणि विहिरींनाही पाझर फुटले आहेत.
यंदाचा मे महिना हवामानाच्या दृष्टीने नवे आयाम रचणारा ठरला आहे. महिन्याच्या सुरुवातीला राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र पश्चिमी चक्रावातांचा मध्य भारतापर्यंत जाणवलेला प्रभाव, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर झालेला बाष्पाचा पुरवठा आणि दोन्ही समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाब प्रणालीमुळे महाराष्ट्रासह देशभरामध्ये दमदार पाऊस कोसळला. मे महिन्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले.
अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून मध्य महाराष्ट्र ते मराठवाड्यापर्यंत पोचल्याने मे महिन्याच्या अखेरच्या काळात महाराष्ट्रामध्ये धो-धो पाऊस कोसळला. कमी कालावधीत झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाने दणका दिला. शेतजमिनींनी तलावाचे, तर रस्त्यांनी नदी-नाल्याचे स्वरूप घेतल्याचे दिसून आले. दुष्काळी भागात तर वर्षाचा पाऊस पंधरा दिवसांत कोसळल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ज्येष्ठांनी त्यांच्या पूर्ण हायतीमध्ये असला पाऊस पाहिला नसल्याचे आवर्जून नमूद केले.
हवामान विभागाकडील नोंदीने याला दुजोरा मिळाला आहे. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार मे महिन्यात राज्यात सरासरी १४.४ टक्के पाऊस पडतो. यंदा मात्र तब्बल ११ पट अधिक म्हणजेच १५९.४ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. यापूर्वी १९१८ सालच्या मे महिन्यात उच्चांकी ११३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा हा उच्चांक मोडीत निघाला आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये दमदार दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
सिंधुदुर्गात सर्वाधिक पाऊस, बुलडाण्यात ३६ पट नोंद
बुलडाणा जिल्ह्यात १८७.४ मिलिमीटर म्हणजेच सर्वाधिक ३६ पट, तर मुंबई शहरात ५०३.२ मिलिमीटर म्हणजे ३५ पट पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. तर सर्वाधिक पावसाचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५६४.७ (१४ पट), तर रत्नागिरीत ५५७.६ मिलिमीटर (१९ पट) पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागनिहाय पडलेल्या पावसाचा विचार करता कोकण-गोवा विभागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे,
मॉन्सूनच्या आगमनाचा नवा विक्रम
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा विक्रमी वेगाने देशासह महाराष्ट्रात आगमन केले आहे. यंदा २४ मे रोजी मॉन्सूनने केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीपर्यंत धडक दिली. दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने १९९० नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या तळ कोकणपर्यंत मजल मारली. तर २६ मे रोजी मुंबई आणि पुण्यात मॉन्सून दाखल झाला. २८ मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मॉन्सून पसरला. त्यानंतर मात्र मॉन्सूनचा चाल थबकली आहे.
पूर्वमोसमी हंगामात १७३ मिलिमीटर पाऊस
पूर्वमोसमी पावसाच्या हंगामात (मार्च ते मे) राज्यात १७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत राज्यात २६.२ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदाच्या मे महिन्यात राज्यात तब्बल साडे सहा पट अधिक पावसाची नोंद झाल्याचे दिसून आले आहे. यातही अकोला अमरावती आणि वाशीम जिल्ह्यातील पावसाची नोंद उपलब्ध नसल्याचे हवामान विभागाने नमुद केले. संपूर्ण देशाचा विचार करता मे महिन्यात १८५.८ मिलिमीटर (४२ टक्के अधिक) पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात मे महिन्यात विभागनिहाय पडलेला पाऊस
विभाग सरासरी पाऊस पडलेला पाऊस
मिलिमीटरमध्ये पटीमध्ये
कोकण-गोवा २५.४ ४३७.८ १७ पट
मध्य महाराष्ट्र १७.१ १४१.४ ८ पट
मराठवाडा १३.४ ११९.८ ९ पट
विदर्भ ९.८ १३०.५ १३ पट
१९०१ पासूनचे देशातील मे महिन्याचे उच्चांकी सरासरी पर्जन्यमान
(२९ मे अखेरपर्यंत)
वर्ष पर्जन्यमान (मिमी)
१९९० ११०.१
२०२५ १०८.१
२०२१ १०७.५
१९१८ १०३.१
१९३३ १०३.१
१९२५ १०२.५
१९०१ पासूनचे राज्यातील मे महिन्याचे उच्चांकी सरासरी पर्जन्यमान
वर्ष पर्जन्यमान (मिमी)
२०२५ १५९.४
१९१८ ११३.६
१९९० ९९.८
१९५६ ८२.५
१९३३ ७४.२
१९०३ ७३
मे महिन्यात जिल्हानिहाय पावसाची स्थिती
जिल्हा सरासरी पाऊस पडलेला पाऊस
मिलिमीटर मध्ये पटीमध्ये
मुंबई शहर १४.३ ५०३.२ ३५ पट
मुंबई उपनगर १७.३ ३७८.४ २२ पट
पालघर ८.३ ११६.६ १४ पट
रायगड १५.३ ४५९.४ ३० पट
रत्नागिरी २९.३ ५५७.६ १९ पट
सिंधुदुर्ग ३९.२ ५६४.७ १४ पट
ठाणे ७.९ १६९.९ २२ पट
अहिल्यानगर १४.३ १४९.९ १० पट
धुळे ७.६ ८५.१ ११ पट
जळगाव ५.३ १३.१ २.५ पट
कोल्हापूर ३७.१ २१३.४ ६ पट
नंदूरबार ६.५ ५२.२ ८ पट
नाशिक ११.६ ९८.४ ८ पट
पुणे १४.४ २६१.४ १८ पट
सांगली ३७.८ १३९.९ ४ पट
सातारा २४.४ २३०.५ ९ पट
सोलापूर १९.४ ११५.९ ६ पट
बीड १३.५ ११९.० ९ पट
छ. संभाजीनगर ११.९ ६२.७ ५ पट
धाराशिव २१.४ २४४.९ ११ पट
हिंगोली ७.९ २० २.५ पट
जालना १३.५ ५९.७ ४ पट
लातूर १७.१ २८२.५ १७ पट
नांदेड १०.६ ६६.२ ६ पट
परभणी १०.२ ११४.६ ११ पट
अकोला ६.२ १५०.९ २४ पट
अमरावती ५.८ १११.६ १९ पट
भंडारा १२.२ ६०.२ ५ पट
बुलडाणा ५.२ १८७.४ ३६ पट
चंद्रपूर ८.८ ६१.९ ७ पट
गडचिरोली १४.२ १९६.५ १४ पट
गोंदिया १२.८ १३७.० ११ पट
नागपूर ९.९ १०४.२ ११ पट
वर्धा १२.७ ११५.१ ९ पट
वाशीम ५.१ ११८.४ २३ पट
यवतमाळ ८.८ ६१.९ ६ पट
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.