
Pune News : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. मात्र, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील पिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाचे दोन महिने उलटले असले तरी खानदेशातील नाशिक, धुळे, जवळगाव, नंदुरबार, मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्वच जिल्ह्यांत अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या भागातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पश्चिम विदर्भातही तुरळक सरी पडल्याने पिकांना दिलासा मिळाला.
परंतु काही ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही. पूर्व विदर्भात पाऊस होत असल्याने या भागातील धरणांतील पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक भागात मध्यम पाऊस पडला. तर नागपूर, अमरावती भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. गडचिरोलीतील मुरूमगाव येथे ४९ मिलिमीटर पाऊस झाला.
मराठवाड्यातील सर्वच भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर अधूनमधून ऊन पडत असल्याने खुरपणी, कीटकनाशकांच्या फवारणीच्या कामांना वेग आला आहे. पाऊस पडलेल्या ठिकाणी उघडीप दिल्याने पिकांची वाढ काही ठिकाणी चांगली आहे. काही ठिकाणी ही वाढ खुंटली आहे.
कोकणात ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर चांगलाच कमी झाला आहे. कोयना - नवजा घाटमाथ्यावर १३० मिलिमीटर पाऊस पडला. तर शिरगाव घाटमाथ्यावर ७५, दावडी ७३, खांड ६९, धारावी येथे ६७ मिलिमीटर पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पिके सुकू लागली
मध्य महाराष्ट्रातही पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस पडत आहे. कोल्हापुरातील साळवण मंडळात ६८.३ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ५६.५ मिलिमीटर पाऊस पडला. नगर, सोलापूर, सातारा व पुणे, सांगलीच्या पूर्व भागात पावसाअभावी पिके सुकत आहेत.
राज्यात शुक्रवारी (ता.४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (३० मि.मीपुढे) (मिलिमीटर)
कोकण : निजामपूर ३०.५, वहाळ ३०.५, आबलोली ३४, कडवई ३४, मुरडव ३०.५, आंगवली ३१.३, पाचल ३९.५.
मध्य महाराष्ट्र : भोलावडे ३७, लोणावळा ३२.५, मोरगिरी ५३.५, महाबळेश्वर ५३.८, बाजार ३०.३, कसबा ३०, कडेगाव ५०.५, कराडवाडी ३०, गवसे ३४.८.
विदर्भ : कळमेश्वर, मोहपा, धापेवडा, तेलकामठी ३७.५, कर्डी ३३, केंद्री ३२.५, आंधळगाव ३०.५, नाकडोंगरी ३९.३, तुमसर ३०.३, शिवरा ४४.३, मिटेवणी ३२.३, गाऱ्हा ३२.३, अड्याळ ३०.३, गंगाझारी ४३.३, रत्नारा ३८, दासगाव ३८, रावणवाडी ४१.८, कामठा ३६, काट्टीपूर ३८, आमगाव ३०.५, तिगाव ३५.८, ठाणा ३२, परसवाडा ३९.३, वाडेगाव, ठाणेगाव ३१, कवरबांध ३०.५, पोरळा ३५.३, कुरखेडा ३९, पुराडा ३४, पेंढरी ३१, कोर्ची ३०.३, बेडगाव ४१.५, कोटगुळ ४०.८,
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.