
सध्या ‘भवताल’च्या मॉन्सून इकोटूरच्या अनुषंगाने केरळमधील अनेक ठिकाणांना भेटी देत फिरत आहोत. तिथला मॉन्सूनचा प्रभाव जाणून घेत आहोत. केरळच्या राजधानीचे शहर म्हणजे त्रिवेंद्रम अर्थात तिरुअनंतपूरम. या ठिकाणी प्रसिद्ध आणि सर्वांत श्रीमंत म्हणून बहुचर्चित असलेले पद्मनाभस्वामी मंदिर आहे. भव्य आकाराचे हे मंदिर. ते कितीतरी आकर्षक शिल्पांनी, मूर्तींनी सजले आहे. या मंदिराच्या शिखरावर, गोपुरावर सर्वांत उंच भागी जहाज दर्शवलेले आहे.
हे मंदिर आतून पाहत असताना गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला एका खांबावर छोटेसेच, पण लक्ष वेधून घेणारे कोरलेले शिल्प पाहायला मिळाले. ते पाहिल्यावर हरखून जायला होते. या शिल्पात, एका नावेत माणसांच्या दोन आकृत्या आहेत. त्यांनी हात जोडलेले आहेत आणि ते उंचावलेले आहेत. या शिल्पातील दोन्ही माणसांचे डोळे, दाढी-मिशा चिनी व्यक्तींसारख्या वाटतात. हे शिल्प पाहिल्यानंतर आणखी शोध घेतला, तेव्हा इतरही खांबांवर अशा अनेक मूर्ती आढळल्या.
अगदी गेल्याच वर्षी त्याच मंदिरात गाभाऱ्याजवळ चिनी माणसांची चित्रे पाहिल्याचेही आठवले. आता मात्र ही चित्रे दिसली नाहीत.याच मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर पद्मनाभपूरम पॅलेस आहे. त्रावणकोर राजवटीतील राजांचा हा राजवाडा. तो अजूनही चांगल्या स्थितीत आहे. सरकारने तो व्यवस्थितरित्या सांभाळलाही आहे. त्या ठिकाणी चिनी बनावटीच्या काही वस्तू आहेत. त्यापैकी एक म्हणजे- तिथे असलेले लोणची साठवण्याचे भले मोठे चिनी रांजण.
हे राजे त्यांच्या दान-धर्मासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या राजवाड्यात लांबलचक असे दोन-मजली भोजन कक्ष आहेत. त्या ठिकाणी दररोज दोन हजार लोकांना अन्नदान केले जात असे. जेवणाच्या पंगती दोन मजल्यांवर असलेल्या याच कक्षांमध्ये झडत. त्यांच्यासाठी लागणारी लोणची या चिनी रांजणांमध्ये साठवली जात. हे रांजण आजही पाहायला मिळतात.याच राजवाड्यात चिनी बनावटीच्या सहा खुर्च्या आहेत. त्या त्रावणकोरच्या राजांना चिनी व्यापाऱ्यांकडून भेट मिळाल्या असल्याची माहिती दिली जाते.
त्या खुर्च्या राजवाड्यात, राजाच्या शयनकक्षात व इतर महत्त्वाच्या ठिकाणी पाहायला मिळतात. इतकेच नव्हे, तर या राजवाड्यातील शयनकक्षाची रचना चिनी पॅगोडाच्या रचनेशी मिळतीजुळती आहे... या सर्व गोष्टींना निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही, तर हा आपल्यावरील चिनी प्रभाव आहे. किंवा चीनशी झालेल्या देवाण-घेवाणीचीच ही उदाहरणे आहेत. चीनशी देवाणघेवाण ही प्रातिनिधिक आहे.
चीनप्रमाणेच इतरही अनेक देशांचा-प्रदेशांचा आपल्यावरील प्रभाव शेकडो वर्षांपासून पाहायला मिळत आहे. या प्रभावामागचा मुख्य घटक म्हणजे आपल्याकडे येणारे मोसमी वारे अर्थात मॉन्सून! या वाऱ्यांनी भारताला इतके प्रभावित केले आहे की त्यांच्यावाचून आपला भूगोल, इतिहास, व्यापार, सांस्कृतिक अवकाश पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच त्याचे संपूर्ण आकलन होण्यासाठी मॉन्सूनचा पावसापलीकडचा प्रभाव समजून घेणे गरजेचे ठरते.
अडीच कोटी वर्षांचा इतिहास
भारतात मॉन्सून, अर्थात मोसमी वारे काही कोटी वर्षांपासून येत आहेत. अलीकडे झालेल्या संशोधनानुसार, भारतात येणाऱ्या या वाऱ्यांचा काळ सुमारे अडीच कोटी वर्षे इतका मागे जातो. तेव्हापासून हे वारे आपल्या भूभागावर येत आहेत, सोबत पाऊसही आणत आहेत. माणसाच्या संदर्भात सांगायचे तर या वाऱ्यांनी अनेक गोष्टींवर प्रभाव टाकला आहे. पावसाच्या निमित्ताने त्यांचा शेतीवरील प्रभाव ज्ञातच आहे.
पण त्याच्या पलीकडे इतर देशांसोबतची सांस्कृतिक देवाण-घेवाण किंवा व्यापारासाठी त्यांनी खूपच हातभार लावला. त्यामुळे भारताची सांस्कृतिक ठेवण विकसित होण्यास मोठी मदत झाली.ऐतिहासिक काळातील विचार केल्यास, विशेषत: इंजिने विकसित होण्यापूर्वी आणि जीवाश्म इंधन वापरात येण्यापूर्वी, समुद्री वाहतूक आणि व्यापार हा शिडांच्या जहाजांद्वारे चालत असे. त्यांच्यासाठी वारा हेच प्रमुख इंधन होते. शिडांमध्ये वारा भरून घ्यायचा आणि जहाजे पुढे न्यायची, अशी त्याची पद्धत.
त्यामुळे वारा महत्त्वाचा ठरत असे. मॉन्सूनच्या वाऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते काही महिने एका दिशेने वाहतात. भारताच्या संदर्भात बोलायचे तर ते आपल्याकडील उन्हाळा आणि पावसाळ्यात नैर्ऋत्य दिशेने येतात. त्यानंतर ते विरुद्ध दिशेने (ईशान्य ते नैर्ऋत्य) माघारी परततात. त्यामुळे आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरून भारतात येण्यासाठी मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी सोयीचा ठरत असे. त्या वेळी जहाजे भारताकडे नेली, तर प्रवास कमी वेळात पूर्ण होत असे. याचा शोध सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकात लागल्याचे सांगितले जाते.
त्याचे श्रेय हिप्पालस नावाच्या ग्रीक दर्यावर्दीला दिले जाते. त्यानंतर या समुद्री प्रवासाला आणि व्यापाराला मोठी चालना मिळाली. ही बाब अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील व्यापारासाठी लागू होते. पण त्याच्या आधी सुद्धा भारताचा बंगालच्या उपसागरातून सागरी प्रवास आणि व्यापार सुरूच होता. विशेषत: ओडिशातील राजघराणी व व्यापाऱ्यांचे आग्नेय (दक्षिण-पूर्व) आशियायी देशांशी असे संबंध होते. त्यांचा प्रवाससुद्धा मॉन्सून वाऱ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळापत्रकाशी सुसंगत होता. त्यामुळे हिप्पालसच्या आधीसुद्धा भारतीयांनी या वाऱ्यांचा व्यापारासाठी उपयोग करून घेतला होता, हे निश्चित.
देवाणघेवाण आणि समृद्ध संचित
या वाऱ्यांनी भारताला काय-काय दिले याची गणनाच करता येणार नाही. व्यापाराच्या निमित्ताने भरभराट आणि समृद्धी दिलीच. त्याच्यासोबतच, या निमित्ताने विविध संस्कृतीतील लोक आले. त्यांच्यासोबत विविध विचार, धारणा, संकल्पना, धर्म, चालीरिती या गोष्टी आल्याच. त्याचबरोबर विज्ञान-तंत्रज्ञान, भौतिक गोष्टी, वास्तूरचना, कला, फॅशन अशा कितीतरी गोष्टी आपल्याकडे आल्या. हे केवळ एकतर्फी नव्हते, तर आपल्याकडूनही अनेक संकल्पना, विचार, धर्म्, भौतिक गोष्टी भारताबाहेर गेल्या.
हे समजून घेतल्यावर केरळमधील मंदिरांमध्ये, राजवाड्यामध्ये दिसणाऱ्या चिनी मूर्ती-वस्तू यांचा नेमका अर्थ लागतो. व्यापाराच्या निमित्ताने इथे येणाऱ्या लोकांना स्थानिकांशी संबंध निर्माण करावे लागतात. त्यासाठी विविध प्रकारच्या देणग्या, भेटवस्तू देण्याचा मार्ग स्वीकारला जातो. या भेटवस्तू किंवा देणग्या मंदिरांना, राजसत्तेतील प्रमुखांना दिल्या जातात. म्हणूनच या व्यापाऱ्यांची किंवा तत्सम लोकांची चित्रे-शिल्पे मंदिरांवर येतात.महाराष्ट्राच्या संदर्भात (आणि अगदी भारताच्या संदर्भात सुद्धा) विचार केला तर सातवाहन राजवटीच्या आसपास म्हणजेच २२०० वर्षांपासून आपला इतर संस्कृतींशी सागरी व्यापाराच्या निमित्ताने संबंध आला आहे.
त्याला बळकटी देण्याचे काम अर्थातच मॉन्सून वाऱ्यांचे चांगले आकलन झाल्यामुळे आणि त्यांचा उपयोग करता आल्यामुळे झाले. त्यानंतरच्या काळात विविध प्रकारचे तंत्रज्ञान आणि अनेक भौतिक गोष्टींनी आपले सांस्कृतिक विश्व व्यापले. ग्रीक, रोमन, अरब-पर्शियन, त्यानंतर युरोपीय अशा विविध भूभागातील वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आले. अगदी नहरींसारख्या पाण्याच्या व्यवस्था, पाणी वापरण्याचे नियम इथपासून ते वास्तूरचनेतील घुमट-कमानी, युद्धतंत्रातील बंदुका-तोफा असे बरेच काही येत गेले. त्यांचा मॉन्सूनशी घट्ट संबंध आहे.त्याचबरोबर आग्नेय आशियायी देशांमध्ये बौद्ध धर्म, त्यानंतर भारतीय राजवटी पोहोचण्यासाठी, जगभरातील बाजारपेठेत मसाल्याचे पदार्थ पोहोचवण्यात सुद्धा याच वाऱ्यांचा हातभार लागला.
अन्यथा, त्याकाळी तिथपर्यंत हे सारे कसे पोहोचले असते? या गोष्टींच्या देवाण-घेवाणीचे प्रमुख केंद्र केरळ ठरले आहे. त्यामुळेच येथे विविध विचार-धर्म-धारणा एकमेकांमध्ये सामावून गेल्या असल्याचे ठळकपणे पाहायला मिळते. त्रिशूर जिल्ह्यातील कोडंगल्लूर हे ठिकाण तर त्यासाठी प्रसिद्धच. इथे सातव्या शतकात पेरुमल चेरामन नावाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याने इस्लाम समजून घेण्यासाठी मक्केला भेट दिली. त्यामुळे तो प्रभावित झाला आणि इसवी सन ६२९ (किंवा इसवी सन ६४३) कोडंगल्लूर येथे भारतातील पहिली मशीद उभारली.
त्याच्याही आधी, इसवी सनाच्या पहिल्या शतकात तिथे सेंट थॉमस चर्च उभे राहिले. आणि अर्थातच, प्राचीन असे भगवती मंदिरही त्याच ठिकाणी आहे. असा हा विविध धारणांचा संगम. त्यांच्यात आजही शांततापूर्ण सहजीवन आणि सुसंवाद पाहायला मिळतो. त्यांचा संबंध वाऱ्यांच्या निमित्ताने झालेल्या देवाण-घेवाणीशी जोडावा लागतो.प्राचीन काळातील मुझारिस नावाचे बंदर. त्याचा उल्लेख पहिल्या शतकातील प्रसिद्ध अशा ‘पेरिप्लस ऑफ इरेथ्रियन सी’ या प्रवासाच्या नोंदींमध्येही आलेला आहे.
हे प्रवासवर्णन आफ्रिका खंडाचा उत्तरेकडील किनारी प्रदेश, अरब प्रदेश ते भारतीय उपखंड या दरम्यानच्या सागरी व्यापारावर बेतलेले आहे. स्वाभाविकपणे, या सागरी व्यापाराचा संबंध मॉन्सूनच्या वाऱ्यांशी लावावाच लागतो... ही यादी खूप मोठी आहे. आणि त्याची अशी कितीतरी उदाहरणे देता येतात. हे समजून घेतल्यावर मॉन्सूनचा आपल्यावरील प्रभाव किती व्यापक आणि खोलवरचा आहे, याची प्रचिती येते. या दृष्टीने शोध घेतल्यास आपल्या अवतीभवतीसुद्धा मॉन्सूनच्या प्रभावाची अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. त्याचा शोध घेणे ही बाब रंजक आणि रोमांचक असेल, याच शंकाच नाही!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.