Maharashtra Rain: घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस

Heavy Rain: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर घाटमाथ्यावर धो-धो पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ३७० मिलिमीटर पाऊस पडला.
Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर घाटमाथ्यावर धो-धो पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ३७० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत असून, खडकवासला, वडिवळे, गंगापूर, कडवा, पालखेड, कोयना, पिंपळगाव खांड, वाकी, दारणासह अनेक तलाव भरल्याने विसर्ग सोडण्यात येत आहे. कोकणातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर नाशिकमधील गोदावरी, पुण्यातील मुळा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

कोकणात धुवाधार

गेल्या आठ दिवसांपासून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. मध्यंतरीच्या काळात दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यामुळे शेतीकामांना वेग येण्याची चिन्हे दिसत असताना पुन्हा पावसाने जोर धरला. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोकण व घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरली आहेत. तर कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, जगबुडी, वशिष्टी या नद्या चांगल्या प्रवाही झाल्याने मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा, बारवी, भातसा, धामणी या धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे.

त्यामुळे अनेक गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर खेडमधील जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत असल्याने खेड शहर अलसुरे, चिचघर, प्रभुवाडी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सरींवर सरी कोसळत असून, वाऱ्याचा वेगदेखील वाढला आहे. समुद्र खवळण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाकडून समुद्रात किंवा किनारी भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली.

Maharashtra Rain
Maharashtra Rain: विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहणार

घाटमाथ्यावर मुसळधार

घाटमाथ्यावर मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ताम्हिणीनंतर शिरगाव घाटमाथ्यावर ३६० मिलिमीटर, तर दावडी २५०, लोणावळा टाटा २०५, तर डुंगरवाडी २००, लोणावळा ग्रामीण १९३, आंबोणे १८४ मिलिमीटर पाऊस पडला. मागील आठ ते दहा दिवसांपासून या भागात पाऊस पडत आहे. पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत असले, तरी धरणांतील पाण्याच्या आवकेत वाढ होताना दिसून येत आहे.

पुणे, नाशिकमध्ये जोरदार

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. ताम्हिणीनंतर मुळशी धरणक्षेत्रात ३६० मिलिमीटर पाऊस पडला असून, इतर धरणक्षेत्रात चांगलाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांत मागील चोवीस तासांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक १२.१४ टीएमसी एवढ्या पाण्याचा येवा दाखल झाला आहे. अहिल्यानगरमधील अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत आहे. तालुक्यातील पिंपळगाव खांड आणि वाकी धरण भरले आहे. पिंपळगाव खांड धरण भरल्याने मुळा धरणाकडे पाणी येऊ लागले आहे. बारी, वारंघुशी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने

वाकी धरण प्रकल्पही भरला असल्याने कृष्णवंती नदीला पूर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अन्य भागांतही अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या गुरुवारी पावसाचा जोर पाहायला मिळाला. पश्‍चिम पट्ट्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर धरण परिचालन सूचीनुसार विसर्ग करण्यात येत आहे. गुरुवारी (ता.१९) गंगापूर, दारणा, कडवा व पालखेड या चार धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने दारणातून सर्वाधिक ४,७४२ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

Maharashtra Rain
Rainfall Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा!

पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या

विदर्भातील हिंगोली जिल्ह्यातील हत्ता मंडलात अतिवृष्टी झाली असली, तरी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम आहे. मराठवाडा व विदर्भात मॉन्सूनचे आगमन होऊन आठवडा होत असला, तरी अद्याप समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सुरुवातीच्या हलक्या सरींनंतर पावसाचा जोर वाढत नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल की काय, असे एकूणच चित्र निर्माण होत आहे. यंदा हवामान विभागाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार काही भागांत थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला.

परंतु त्यानंतर पावसाने मध्यंतरी पाठ फिरवल्याने शेतजमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. परिणामी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांची सार्वत्रिक पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. काही मर्यादित क्षेत्रावरच पेरणी झाली. यंदा मेमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यामुळे जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर काही भागांत शेतकऱ्यांनी पहिल्या सरींच्या ओलाव्यावर पेरण्या धरल्या. मात्र या पेरण्या जोखमीच्या पातळीवर पोहोचल्या. मध्यम ते हलक्‍या प्रकारच्या जमिनीत पेरणी केलेल्या क्षेत्रांवर जर लवकरच जोरदार पाऊस झाला नाही, तर उगवलेल्या पिकांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात अतिवृष्टी झालेली मंडळे :

मुरबाड ८८, देहरी ८१, सरळगाव, धसई, शिवले, किन्हवली ७१, शहापूर, खर्डी, वसिंड, आटगाव, कासारा ७८, पेण ८६, महाड, तुडील, मुरडव, माखजन ७२, बिरवडी, खारवली, मानगाव, निजामपूर ६८, कोंडवी, वाकण, पोलादपूर ६६, म्हसळा, खामगाव ६९, आंबवली, कुळवंडी, भरणे, दाभीळ १५०, मंडणगड, म्हाप्रळ, देव्हरे ११२, खोडला १७२

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी, घोटी ८०, वाडीवाऱ्हे ११९, नांदगाव ९३, पेठ ६७, त्र्यंबकेश्‍वर, वेळुंजे ९१, हरसूल १०६, ठाणापाडा, कार्ला, खडकाळा, ताकवे खु १३०, आंबवडे, निगुडघर, वडगाव मावळ, तळेगाव, आजरा, गवसे, हत्ता ७०, लोणावळा, कुसगाव १४५, ताकवे बु, वाडेश्‍वर ९९, आंबेगाव ८१, बामणोली १५०, केळघर ३२, पसरणी, पाचगणी ६७, महाबळेश्‍वर ८८, तापोळा, लामज १५०, राधानगरी ८२

ताम्हिणीत ३७० मिलिमीटर पाऊस

- कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत जोरदार पाऊस

- राज्यात एकूण ६८ मंडलांत अतिवृष्टी

- कोकणात ६८ मंडलांपैकी ३३ मंडलांत अतिवृष्टी

- इगतपुरी (नाशिक) तालुक्यातील धारगाव, खोडला मंडलांत सर्वाधिक १७२ मिमी पाऊस

- नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम पट्ट्यात जोरदार पाऊस

- विदर्भातील हिंगोलीतील हत्ता या एका मंडलात ७० मिलिमीटर पाऊस

- मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ३६० मिलिमीटर पावसाची नोंद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com