
Ratnagiri News : जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. सर्वाधिक फटका संगमेश्वर आणि राजापूर या दोन तालुक्यांना बसला आहे. संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे रामपेठ बाजारपेठ जलमय झाली. संगमेश्वर-नायरी मार्गावर कसबा येथे पुराचे पाणी आले.
तर धामणी गोळवली येथे भुस्खलन झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीत माती पसरली. राजापूर तालुक्यात अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जवाहर चौकात पुराचे पाणी आले होते. पावसामुळे शेतीचे ६ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
गेले चार दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसा थोडा जोर ओसरलेला होता. परंतु रात्री पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. वेगवान वाऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ११३.५४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गुहागर १३६.८०, संगमेश्वर १२९.५०, लांजा १३९.६०, चिपळूण १२८.३३ मिमी नोंद झाली. शास्त्री नदीला आलेल्या पुरामुळे रामपेठ येथील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ पाण्याखाली गेले.
दुकाने आणि घरे पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान झालेले आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली आमकर वाडी येथे भूस्खलन झाले असून आहे. अमोल लोध यांच्या ७० पोफळीच्या बागेत पाच फूट माती साचली आहे.
धामणी परिसरात पुराचे पाणी आल्यामुळे श्रद्धा हॉटेलचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे खोदलेली माती नद्यांमध्ये गेल्यामुळे हा पूर आल्याचे सांगितले जात आहे. न्यू इंग्लिश स्कूल कसबा या शाळेच्या तळघरातील वर्गात पुराचे पाणी शिरल्याने आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा व्यवस्थापनाची अक्षरशः दाणादाण उडाली.
संगमेश्वर-डिंगणी मार्गावरही शास्त्री नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती.
तसेच राजापूर तालुक्यालाही पावसाने चांगलेच झोडपले. शहरातील चिंचबाध, गुजराळी, आंबेवाडी, धोपेश्वर या भागाकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जवाहर चौकातील टिळेकर यांच्या राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सपर्यंत पुराचे पाणी शिरल्यामुळे व्यापारीवर्गाने दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवला. सकाळपासून एसटी वाहतूकही बंद होती. राजापूर शहरात सकाळीच पुराचे पाणी शिरल्याने शहरातील शाळा प्रवेशोत्सव साजरा करून सोडून देण्यात आल्या आहेत.
१३९ घरांचे नुकसान, ६ हेक्टर भातशेतीला फटका
पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार १३९ घरांचे दीड कोटीचे नुकसान नोंदले झाले आहे. तसेच सुमारे ६ हेक्टर भातशेतीला फटका बसला आहे. तालुक्यातील ४ गावातील ३० शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यात २७ शेतकऱ्यांचे ०.४६ हेक्टरचे नुकसान झालेले आहे. तर ३ शेतकऱ्यांच्या शेतामधील बांध वाहून गेला आहे. ०.२८ हेक्टरवरील भात नर्सरी वाहून गेली असून ०.१४ हेक्टरवरील हळद लागवडीत गाळ भरलेला आहे. ०.०४ हेक्टरवरील सुपारीची २५ रोपे वाहून गेली आहेत.
राजापूर तालुक्यात २१ जणांच्या घरात पाणी
गुहागर तालुक्यात १.९३ हेक्टर भात क्षेत्राचे तर नाचणीचे ०.३० हेक्टरचे तसेच मंडणगड तालुक्यातील १.५४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यात पावसामुळे २१ जणांच्या घरात पुराचे पाणी शिरले. तर विविध ५९ मालमत्तांचे नुकसान झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.