Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

Monsoon Rain Update : मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने जवळपास सर्वच भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडला. तर विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने जवळपास सर्वच भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडला. तर विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत होते. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे वातावरण निवळल्याने कोकण, घाटमाथ्यांवर पावसाचा जोर कमी झाला आहे.

मध्य महाराष्ट्राच्या नगर, सोलापूर, खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. दरम्यान मंगळवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना (नवजा) या घाटमाथ्यांवर सर्वाधिक २७४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

मराठवाड्याला दिलासा

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी आंतरमशागतीचे कामे सुरू झाली होती. मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केल्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत जवळपास सर्वदूर मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

नांदेडमधील जलधारा मंडलात सर्वाधिक १६० मिलिमीटर पाऊस पडला. तर फुलवळ मंडलात १३७.३ मिलिमीटर, तर उमरी ११८.५, अदमपूर १०३.३, रामतीर्थ १०० मिलिमीटर पाऊस झाला. संभाजीनगरमधील सोयगाव मंडलात ११४.८ मिलिमीटर पाऊस झाला. तर लातूर, जालना जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

Rain
Rain Update : राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी

मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पाऊस

मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांत मागील काही दिवस जोरदार पाऊस बरसला. घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे पश्चिमेकडील धरणांतील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान पूर्व भागातील नगर, सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते. तर अधूनमधून तुरळक सरी बरसत होत्या. परंतु पुन्हा या भागात पावसाचा जोर धरला आहे. नगर जिल्ह्यातील दोन मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला असून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. पुणे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव कमी झाली असून काही अंशी ढगाळ वातावरण कायम आहे. मागील काही दिवस नीरा आणि भीमा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे उजनीत काहीशी आवक सुरू झाली असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. परंतु या धरणांतील पाणी पातळी अजूनही उणेच्या खालीच आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. भुसावळ मंडलात सर्वाधिक ६६.५ मिलिमीटर पाऊस झाला असून उर्वरित भागातही हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे पिके चांगलीच तरारली आहेत.

विदर्भात जोर वाढला

विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचा जोर कायम आहे. प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस झाला. तर अकोला, वाशीम, अमरावती, बुलडाणा या भागांत पावसाचा जोर कमी होता.

तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर वर्धा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यवतमाळमधील फुलसावंगी मंडलात सर्वाधिक १०२.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर मुसळधार झालेल्या पावसामुळे पोंडुळ गावात पाणी शिरले होते. तर शेतशिवार जलमय झाली होती. या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.

Rain
Monsoon Rain : पुढील ५ दिवस पाऊस कसा राहणार? उद्यापासून मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

कोकणात जोर ओसरला

चार ते पाच दिवस कोकणात धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर आता ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बागायतीमधील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. मालवण शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले असून किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. उर्वरित जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे.

दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत असून काही गाड्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात सोमवारी (ता. १५) पहाटेपासून सर्वच भागांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. किनारपट्टी भागात पावसाची झोड सुरूच होती. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे भात लागवडी वेगात सुरू आहेत. कोयना घाटमाथा वगळता सर्वच घाटमाथ्यावर पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत.

मंगळवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटर : (स्रोत : कृषी विभाग) :

कोकण : रत्नागिरी : रत्नागिरी ९३.८, खेडशी ९३.८, पावस ४५.५, फसोप ९३.८, कोतवडे ५५.३, मालगुंड ५५.३, तरवल ८४.५, पाली ९३.८, फुंणगुस ४७.३, देवळे ६९.८, देवरुख ४८.८, तुळसानी ४४, माभळ ४७.३, राजापूर ४८.८, कोंडये ४२.८, कुंभवडे ४६, नाटे ४५.५, साटवली ४५.५, पडेल ६६.८, शिरगाव ९७, पाटगाव ४१.५, बापर्डे ९७, पेंडूर ८८, मसूरे ७९.३, श्रावण ७१, आबेरी ९१.५, पोइप ५४.५, सावंतवाडी ७२.८, बांदा ९३, आजगाव ७३.३, आबोली ४३.३, मडूरा ८५.५, वेंगुर्ला ९२, शिरोडा ८०, कणकवली ५८, फोंडा ५३, नांदगाव ५६, तळेरे ४२.८, वागदे ४९, कुडाळ ९९, कडावल ५२.५, कसाल ६१.३, माणगाव ४८.५, पिंगुळी ९५, तळवट ७४.८, भेडशी ७७.५.

मध्य महाराष्ट्र : खिरोदा ४२.८, सावदा ४२.८, खिर्डी ४२.८, जामनेर ५०.८, पहूर ४४.३, कापूरवाडी ४३.५, भिंगार ४०.५, चिंचोडी पाटील ५८.३, चास ५२, कोळेगाव ५९.३, भांबोरा ४६.३, खर्डा ४९.३, वांबोरी ६७, साकूर ४५, आगळगाव ६७, वैराग ६५.३, करजगी ५०, मारापूर ४९.८.

मराठवाडा : शेंदूरवाडा ४९.५, सिद्धनाथ ४४, आंभाई ४४.३, जरांदी ४६.३, आष्टी ५९.८, कडा ८९, टाकळसिंग ४८, ढवळवडगाव ५८.३, धामनगाव ७१.५, धानोरा ४५.८, पिंपळा ४१.३, तोदर ४४.३, सावरगाव ५९.८, परांडा ४६.३, माणकेश्‍वर ४०.३, तेरखेड ४९.५, विष्णुपुरी ४१.३, तरोडा ४३, बिलोली ७९.८, सगरोळी ६७.८, कुंडलवाडी ५२.३, लोहगाव ६०.३, पेठवडज ७१.३, बारूळ ७१.३, माळाकोळी ८६.५, शेवडी ५४.५, किनवट ५३.८, इस्लापूर ५२.८, शिवणी ४०.३, सिंदगी ६७.८, मुदखेड ४२.३, मुगट ६२.८, माहूर ५०.८, धर्माबाद ६८.५, करखेली ५८.८, जळकोट ७८.५, धानोरा ७६.३, नरसी ६०.३, नायगाव ४२.३, माजंरम ५६.३, माखणी ५०.५, बोरी ४२, आदगाव ४१.८, ताडकळस ४६.८, रावराजूर ४३.३, नरसी ४५.५, कळमनुरी ७९.३, आंबा ८५.३, कुरुंदा ४९.५, औंढा नागनाथ ४८.५, साळणा ५८.३.

विदर्भ : बार्शीटाकळी ९५.३, राजंदा ६५, गिरोली ७३.८, धारणी ५२, चुर्णी ६९, जाडमोहा ४२, गौळ ४७.५, बोरी खु ४२.३, बितरगाव ४५, निगनूर ५०.५, महागाव ५८.५, मोरथ ५८.५, गुंज ६०.५, कळी ४३.८, हिवरा ६८, कासोळा ४२.३, झाडगाव, धानोरा, वाढोणा ४०.५, खारंगणा ४८.८, विरूळ ४५.८, रोहणा ६६.८, सिरसगाव ७२.५, केळवड ५६.८, कळमेश्‍वर ५८, धापेवडा ४१, तेलकामठी ५६.८, चिंचगड ५०.५, बेंबळ ६३, भिसी ४२.८, मासाळ ५५.८, मेंढा ५०, तालोधी ६४.५, मिढाळा ४८.८, नावरगाव ७७, शिंदेवाही ४०.५, मोहाली ६८, गडचिरोली ७१.३, येवळी ४९.०, चामोर्शी ४४, आष्टी ४२.५, भेंडाळा ६३.

१०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली मंडले :

देवगड १३३.८, मीठबाव १०७.५, मालवण १२९, म्हापण १२६.३, वेतोरे १०८.८, वालावल १२९.३, केडगाव १०१.५, कर्जत १००.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com