

डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे
फळे व भाजीपाला उत्पादनात भारत जगामध्ये आघाडीवर आहे. देशातील साधारणपणे ५५ टक्के लोकसंख्या ही कृषी व कृषी संलग्न व्यवसायासोबत जोडलेली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राकडे मानवी जीवनाचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून पाहिले जाते. त्यात प्रामुख्याने फळे आणि भाजीपाला उत्पादनाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण ती पोषणमूल्ये, रोजगार आणि आर्थिक समृद्धी देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
या उत्पादनांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनवण्यासाठी काढणी (हार्वेस्टिंग) प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्याने मेहनतीने पिकविलेल्या उत्पादनाची काढणी योग्य पद्धतीने न झाल्यास उत्पादनाच्या गुणवत्तेचा दर्जा घसरतो, उत्पादनाची साठवण क्षमता कमी होते. त्याचा एकूण परिणाम आर्थिक उत्पन्नावर बसतो.
काढणीसाठी योग्य पद्धत आणि उपकरणांचा अवलंब केल्यास उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे संभाव्य नुकसान टळते. शिवाय शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. ही काढणीची प्रक्रिया शास्त्रीय दृष्टिकोनातून हाताळल्यास, शेतीमालाची गुणवत्ता जास्त काळ टिकवता येते. त्यामुळे ग्राहकांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मदत होते.
काढणी ही केवळ प्रक्रिया नसून ती उत्पादनाची गुणवत्ता, त्याचा साठवणूक कालावधी तसेच बाजारपेठेतील मागणीवरही परिणाम करते. म्हणूनच पारंपरिक व आधुनिक साधनांचा योग्य समतोल साधत काढणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीने काढणी करण्यासाठी जास्त मनुष्यबळ व वेळ लागतो, तर आधुनिक उपकरणे व यंत्रांचा वापर केल्यास ही प्रक्रिया जलद व अधिक कार्यक्षम होते.
फळे आणि भाजीपाला काढणीसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. पारंपरिक साधनांपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत प्रगतीमुळे शेतकऱ्यांसाठी कार्यक्षमता, वेळ व श्रमाची बचत, आणि गुणवत्ता वाढविणे शक्य झाले आहे. आजच्या लेखात फळे व भाजीपाला काढणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक व आधुनिक उपकरणांवर सविस्तर माहिती घेऊ.
फळे आणि भाजीपाला काढणीचे महत्त्व
गुणवत्ता टिकवणे ः शेतीमाल काढणीसाठी योग्य तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादनांचे पोषणमूल्ये, रंग, स्वाद, आणि ताजेपणा टिकतो. यामुळे उत्पादने ग्राहकांपर्यंत उत्तम स्थितीत पोहोचतात.
नुकसान कमी करणे ः काढणीच्या वेळी आणि नंतर उत्पादनाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपकरणे वापरणे आवश्यक आहे.
बाजारपेठेतील मागणी पूर्ण करणे ः वेळेवर आणि दर्जेदार उत्पादन बाजारपेठेत गेल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. उदा. हंगामी फळांची विक्री ही फळे ताजी असल्यावरच होते.
साठवणूक आणि निर्यात ः काढणीसाठी आधुनिक उपकरणांचा उपयोग केल्यास साठवणुकीचा कालावधी वाढतो. या माध्यमातून निर्यातक्षम उत्पादनाची निर्मिती करता येते.
श्रम व वेळेची बचत ः शेतीमाल काढणीसाठी योग्य आधुनिक साधनांचा वापर केल्यास श्रम व वेळेमध्ये मोठी बचत होण्यास मदत होते.
अचूकता आणि कार्यक्षमता वाढवणे ः सेन्सर आधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीमालाची परिपक्वता अचूक ओळखून योग्य वेळी काढणीची कामे करणे शक्य होते. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता मूल्यसाखळीमध्ये टिकवता येते.
अन्नसुरक्षेत योगदान ः नुकसान कमी झाल्यामुळे आणि उत्पादनाची कार्यक्षमता वाढल्यामुळे अन्नसुरक्षेत योगदान देण्यास मदत होते.
फळे व भाजीपाला काढणी प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी
योग्य वेळेची निवड
काढणीसाठी योग्य वेळ निवडणे अत्यावश्यक असते. फळे आणि भाजीपाला परिपक्व अवस्थेत असताना काढल्यास त्यांची गुणवत्ता टिकून राहते. प्रत्येक पिकाच्या काढणीची वेळ ही वेगळी असते.
काढणीपूर्व तयारी
काढणीनंतर शेतमालाचे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यात मुख्यतः कामगारांना योग्य प्रशिक्षण देणे.
फळे व भाज्यांसाठी लागणारी साधने तयार ठेवणे. साठवणुकीची व्यवस्था सुनिश्चित करणे आदी घटकांचा समावेश होतो.
काढणी पद्धती
फळे आणि भाजीपाला काढणीसाठी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतींचा उपयोग होतो. पारंपरिक पद्धतींमध्ये मानवी श्रमाचा अधिक वापर होतो. तर आधुनिक पद्धतींमध्ये यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो.
काढणीनंतर तयारी
काढणीनंतर नाजूक फळे व भाजीपाला यांची हाताळणी सावधगिरीने करावी. जेणेकरून मालाचा दर्जा खालावणार नाही. काढणी केलेला शेतमाल थंड जागेत साठवावा.
फळे व भाजीपाला काढणीवेळी घ्यावयाची काळजी
अ) काय करावे ?
फळे व भाजीपाल्यांची काढणी योग्य परिपक्वतेच्या अवस्थेत करावी.
कोरड्या व थंड हवामानात काढणीचे नियोजन करा.
काढणीसाठी सकाळची वेळ निवडावी. कारण, सकाळच्या वेळी वातावरण थंड असते. अशा वातावरणात शेतीमाल काढल्यानंतर त्याचे आयुष्यमान जास्त राहते.
काढणी करताना स्वच्छ हातमोजे आणि साधने वापरावीत.
काढणीच्या ठिकाणी व उपकरणांमध्ये स्वच्छता राखावी.
उत्पादनाच्या प्रकारानुसार काढणीसाठी वेगवेगळी साधने व पद्धती वापराव्यात.
काढणीचे योग्य नियोजन करून त्यानुसार काढणी करावी.
नाजूक फळे व भाजीपाल्याची हाताळणी सावधगिरीने करावी.
काढणी झाल्यानंतर उत्पादन थंड जागेत ठेवावे.
काढणीच्या कामांसाठी अनुभवी, कुशल मनुष्यबळ उपलब्ध करावे.
ब) काय करू नये?
परिपक्वतेच्या अगोदर शेतीमाल काढण्याचे टाळावे. कारण त्या शेतीमालाची टिकवणक्षमता व चव या गोष्टी मूल्यसाखळीमध्ये कमी होतात.
ओलसर किंवा पावसाळी हवामानात काढणीची कामे करू नयेत. कारण अशा वातावरणात उत्पादनाचा दर्जा खालावून ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.
अति गरम किंवा अति थंड हवामानात काढणी करणे टाळावे.
काढणीची काम अस्वच्छ हातांनी किंवा साधनांनी करणे टाळावे.
काढणीच्या वेळी अयोग्य पद्धतीने उत्पादनाची हाताळणे करणे टाळावे.
काढणीनंतर नाजूक फळे किंवा भाजीपाला एकावर एक रचून ठेवू नये.
काढलेला शेतीमाल थेट सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी ठेऊ नये. कारण तो लवकर खराब होतो.
योग्य प्रशिक्षणाशिवाय कामगारांना काढणीसाठी ठेवू नये. काढणी कामांसाठी कुशल मनुष्यबळ ठेवावे.
- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.