Agriculture Implements : शेतकऱ्यांच्या निकडीनुसार बनविली विविध अवजारे
जळगाव जिल्ह्यात हिवरखेडा (ता. जामनेर) गावाला कांग नदीचा लाभ होतो. नदीत वाघूर धरणाचे ‘बॅकवॉटर’ येते. त्यामुळे परिसरात कापूस (Cotton), केळी, संत्री, मोसंबीचे जोमदार उत्पादन (Sweet Orange Production) होते. हिवरखेडा जामनेर, पळासखेडा, केकतनिंभोरा आदी गावे या गावाच्या शेजारी आहेत. गावातील सुदर्शन महाजन यांची दोन एकर शेती आहे. केळी, कपाशी, तूर आदी पिके ते घेतात. वडील शिवदास शेती व्यवस्थापन (Agriculture Management) सांभाळतात. सुदर्शन कृषी पदवीधर आहेत. दोन ट्रॅक्टर्स असून, ते भाडेतत्त्वावर गावपरिसरात देण्यात येतात.
ट्रॉली दुरुस्ती कामातून ऊर्जा
सन २०१९ च्या दरम्यान घरच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत समस्या तयार झाल्या. तो कोव्हिड- लॉकडाउनचा काळ होता. अशात दुरुस्ती करणे अडचणीचे ठरत होते. कार्यशाळा बंद होत्या. हीच समस्या सुदर्शन यांच्यासाठी संधी ठरली. सुदर्शन वेल्डिंग यंत्र व अन्य सामग्री घरी घेऊन आले. स्वतःच ट्रॉली दुरुस्ती करण्याचे ठरवले. अनेक अडचणी आल्या. मात्र गणिती ज्ञान, शेतीतील अनुभव, कुशलवृत्ती, जिद्द, ‘ट्रायल ॲण्ड एरर’ आदीं प्रयत्नांनंतर काही दिवसांतच ट्रॉली दुरुस्त करण्यात यश आले. त्यातूनच अवजारे निर्मिती सुरू करावी असा विचार मनात आला.
प्रशिक्षणातून ज्ञानवृद्धी
अवजारे निर्मितीसाठी सोईस्कर जागा नव्हती. मावसभाऊ मदतीला धावून आला. त्याने आपल्या शेतानजिक झोपडीवजा पत्र्यांचे शेड असलेली ३० फूट बाय २५ फूट जागा ‘वर्कशॉप’ साठी दिली. मग आवश्यक सामग्री, यंत्रणा खरेदी केली. सुरुवातीला सुदर्शन एकटेच काम करायचे. पण शेतकऱ्यांकडून मागणी वाढू लागली तसे दोघेजण मदतीला घेतले.
खानदेशात रावेर तालुक्यात नवी, सुधारित अवजारे तयार केली जातात. या भागातील कार्यशाळांना भेट दिली. निंभोरा (ता. रावेर) येथे तब्बल १५ दिवस मुक्काम करून तेथील कार्यशाळांमधून नवे तंत्र, बारकावे, सुधारणा आदींबाबत प्रशिक्षण- ज्ञान घेतले. पुणे भागातही हा अनुभव घेतला. आजही कृषी प्रदर्शने, अवजारे तयार करणाऱ्या संस्था, कार्यशाळांच्या संपर्कात सुदर्शन असतात. ‘यू ट्यूब’ व अन्य ‘सोशल मीडिया’आधारे अवजारे निर्मितीचा प्रयत्न असतो.
शेतकऱ्यांची गरज लक्षात घेतली
सुदर्शन प्रगतिशील शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. घरची शेती व ट्रॅक्टर व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणीही त्यांना लवकर समजतात. गावातील उमेश महाजन, प्रशांत चौधरी आदी शेतकरी मित्रांकडूनही ते मार्गदर्शन घेतात. हिवरखेडा व लगतच्या भागात असलेली मोसंबी, संत्री, कलिंगड, केळी आदींच्या शेतीतील यंत्रांची निकड लक्षात घेतली. प्रचलित यंत्रात सुधारणा करून ती वजनाने हलके व दर्जेदार होतील याकडे लक्ष दिले. ट्रॅक्टर व बैलजोडीचलित प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अंथरण्याचे यंत्र तयार केले. आपल्या शेतात किंवा शेतकऱ्यांकडे अवजारांच्या चाचण्या ते घेतात. त्यानंतरच ती विक्रीसाठी उपलब्ध करतात.
यंत्रांची विविधता
-मोसंबी व अन्य फळबागांत ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्राचा उपयोग होतो. ही गरज लक्षात घेऊन वजनाने हलके, मजबूत असे दुचाकीवरील फवारणीचे यंत्र तयार केले. दुचाकीला मागे लहान चाके असलेली ट्रॉली, पाण्याचा ड्रम व अन्य यंत्रणा बसविली आहे. वाफसा स्थितीत किंवा हलक्या जमिनीत हे यंत्र वेगात काम करते.
-ट्रॅक्टरचलित गादीवाफे निर्मिती, खते देणारे, ठिबकचे ‘लॅटरल’ अंथरणारे व त्यावर प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अंथरणारे असे बहुउद्देशीय यंत्र काही सुधारणा करून विकसित केले.
-हलकी व मजबूत बैलगाडी तयार केली आहे.
-कांदा व लसूण साठविण्याचा ट्रे, शेंगा फोडण्याचे यंत्र, ट्रॅक्टरची ट्रॉली, बैलजोडीचलित अन्य प्रचलित अवजारे अशी विविधता पाहण्यास मिळते.
-येत्या काळात महिला शेतकऱ्यांना उपयोगात येणारी तणनियंत्रण, शेंगा फोडणी आदी वजनाने हलकी अवजारे तयार करण्यावर भर असेल.
वेळ, पैशांची होते बचत
मल्चिंग पेपरच्या बहुउद्देशीय यंत्राद्वारे वेळेची ७० टक्के बचत होते. ट्रॅक्टरचलित यंत्र तासाभरात सात तासात सुमारे पाच एकर क्षेत्रात गादीवाफे तयार करणे, खते सोडणे, नळी अंथरणे व पेपर अंथरण्याचे काम करते. ट्रॅक्टरद्वारे पावसाळ्यात कापूस, खते व अन्य बाबींची वाहतूक करणे धोक्याचे असते. या समस्येवर उपाय म्हणून ट्रॉलीवर ताडपत्री टाकण्यासाठी सुविधाही तयार आहे. त्यास परिसरातून मागणी आहे.
यंत्रांना मागणी
खानदेशासह अन्य जिल्हे व परराज्यांतून यंत्रांना मागणी आहे. सुदर्शन शेतकऱ्यांसाठी कायम उपलब्ध असतात. प्रसंगी शेतात जाऊन यंत्राची दुरुस्ती करतात. दरांबाबत सांगायचे तर बैलगाडी २८ हजारांपासून पुढे, ट्रॅक्टर ट्रॉली दोन लाख ३० हजार, मल्चिंग पेपर अंथरण्याचे यंत्र (ट्रॅक्टरचलित) ३५ हजार तर बैलजोडीचलित १८ हजार, शेंगा फोडणी यंत्र दोन हजार कांदा, लसूण ट्रे साडेतीन हजार व ट्रॅक्टरचलित गादीवाफे निर्मिती यंत्र ३० हजारांपासून पुढे अशा किमती आहेत.
सुदर्शन महाजन, ९८२३४६३७५१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.