Dragon Fruit Farming : दुष्काळी स्थितीत ड्रॅगन फ्रूट ठरतेय आश्‍वासक पर्याय

Success Story of Farmer : मजुरांची वानवा, दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील दर आदी विविध समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यावर पर्याय शोधताना पेरू पिकातील अनुभवी युवा शेतकरी आशिष शेंडे ड्रॅगन फ्रूट पिकाकडे वळले आहे.
Dragon Farming
Dragon FarmingAgrowon

संदीप नवले

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील रामकुंड - वरकुटे खुर्द येथील आशिष प्रल्हाद शेंडे हे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची ३० एकर शेती आहे. व्यावसायिक वृत्तीतून त्यांनी फळपीक आधारित पद्धतीचा स्वीकार केला आहे. अठरा एकरांत पेरू हे त्यांचे मुख्य फळपीक आहे. अलीकडे तीन एकरांत सीताफळ लागवड केली आहे.

त्यांचा सुमारे २५० संकरित गायींचा गोठादेखील असून दुग्धप्रक्रियेतही ते कार्यशील आहेत. आशिष यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असले, तरीशेतीतील त्यांचा अभ्यास अत्यंत दांडगा असून अनुभवही मोठा आहे. त्यांना आई मीनाक्षी व पत्नी जयश्री यांची मदत मिळते.

ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग

अलीकडील काळात शेतकऱ्यांना दुष्काळाचा वारंवार सामना करावा लागत आहे. त्यामुळे कमी पाणी, कमी मजूर तसेच किडी-रोगांचा प्रादुर्भावही कमी असलेल्या तसेच दुष्काळी स्थितीत अनुकूल ठरणाऱ्या फळपिकाचा आशिष यांनी अभ्यास केला.

मित्रांकडून ड्रॅगन फ्रूटची शेती व मार्केटबाबत माहिती मिळाली. हे पीक आश्‍वासक वाटले. प्रयत्नवादी आणि प्रयोगशील आशिष यांनी हे धाडस करायचे ठरविले.

Dragon Farming
Success Story of Dragon Fruit : आदिवासी बहुल कोरडवाहू भागात यशस्वी ‘ड्रॅगन फ्रूट’

आत्मविश्‍वास वाढला

सुरुवातीला चार एकरांत एक जानेवारी २०२२ मध्ये लागवड केली. कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानाची मदत व तालुका कृषी अधिकारी बी. एस. रूपनवर यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यातून ऑक्टोबर २०२२ मध्ये दोन एकर लागवड केली.

पहिल्या लागवडीचे उत्पादन एकरी दीड टनांच्या तर एकूण सहा टनांच्या आसपास मिळाले. विक्री व दर या दोन्ही गोष्टी जमल्या. आत्मविश्‍वास वाढला. आता ऑक्टोबर २०२३ मध्ये पुन्हा दोन एकर अशी आजमितीला एकूण आठ एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

आशिष यांचे अनुभव

जुलैच्या काळात ‘हार्वेस्टिंग’ सुरू होते. ऑक्टोबरमध्ये सीताफळ तर ऑगस्टच्या दरम्यान पेरू सुरू होतो. अशा रीतीने वर्षभर उत्पादन आणि पैशांचा ओघ कायम ठेवला आहे. अन्य फळांना नैसर्गिक आपत्ती आणि दरांचा मोठा फटका बसतो. मात्र फळपिकांतील सुमारे वीस वर्षांचा अनुभव पाहता ड्रॅगन फ्रूट देखभाल, खर्च, दर व मागणी याबाबत फायदेशीर वाटत असल्याचा आशिष यांचा अनुभव आहे.

आशिष सांगतात, की निचऱ्याची जमीन या पिकाला मानवते. सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त म्हणजे एकरी आठ लाखांपर्यंत येतो. सिमेंट खांब, सिमेंट प्लेट, ठिबक सिंचन, रोपे, सावलीसाठी शेडनेट, लागवड आदींचा त्यात समावेश आहे. त्यानंतर वर्षाला उत्पादन खर्च ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे.

घवघवीत कमाई

आशिष सांगतात, की ड्रॅगन फ्रूटला सर्वाधिक मागणी मुंबई, पुणे बाजारपेठेतून आहे. सोलापूरमध्येही काही विक्री केली. मदुराई, केरळ येथील व्यापाऱ्यांनी जागेवर येऊन खरेदी केली. क्रेट आणि बॉक्स अशा दोन्ही पॅकिंगमधून माल देण्यात येत आहे.

चालू वर्षी प्रति किलो ८० रुपयांपासून ते १४० ते कमाल १६० रुपयांपर्यंत दर मिळाले. या पिकातून यंदा घवघवीत कमाई करणे शक्य झाले. दुष्काळी स्थितीत हे पीक नक्कीच आशादायक ठरणारे वाटत असल्याचे आशिष सांगतात.

Dragon Farming
Dragon Fruit Farming : काबाडकष्टाच्या शेतीत ‘ड्रॅगनफ्रूट’ ने दाखवला मार्ग

शेडनेटचा प्रयोग

दरवर्षी उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढते. त्यामुळे बाप्षीभवन होऊन पानाची साल खराब होते. फळांना सनबर्निंगचा मोठा धोका निर्माण होतो. त्यावर आशिष यांनी बागेवर ५० टक्के शेडनेट अंथरण्याचा प्रयोग मागील वर्षी सुमारे चार एकरांवरील क्षेत्रात केला. त्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. फळातील दोन ओळींत सुमारे १२ फूट अंतर होते. त्यातील प्रत्येक ओळीत

साडेसहा फूट जागेत शेडनेट ठेवले. उर्वरित क्षेत्र वायुविजनसाठी मोकळे ठेवले. या प्रयोगामुळे फळाची गुणवत्ता व उत्पादन चांगले मिळाल्याचे आशिष यांनी सांगितले. फळहंगामही एक महिना लवकर सुरू झाला. परिणामी, बाजारपेठत चांगला दर मिळाला.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

१२ बाय सात फूट अंतरावर लागवड.

आतून व बाहेरून लाल, आतून गुलाबी व बाहेरून लाल व जंबो रेड असे तीन वाण.

प्रत्येकी सात फुटांवर दीड ते दोन फूट खोल खड्डे. त्यात सहा फूट उंचीचा सिमेंट खांब. जमिनीच्या तो चार ते सव्वाचार फूट उंच.

खांबाच्या चारही बाजूंना प्रत्येकी चार रोपे. एकरी ५०० खांब व दोन हजार रोपे.

खांबाला रोपे बांधून घेतली आहेत. खांबाच्या चारही बाजूंनी वर आलेल्या रोपांचा चांगला विस्तार व्हावा यासाठी वरील बाजूस गोल किंवा चौकोनी खिडकी.

दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रति खांब २० ते २५ किलो शेणखत, तर जानेवारीत पाच किलो ऊस पाचटाचा वापर.

जमिनीचा मगदूर पाहून पाणी. नव्या लागवडीवेळी फेब्रुवारी ते मेपर्यंत थोडेसे पाणी. जुनी बाग असल्यास या कालावधीत पाणी अल्प.

सन २०२३ मध्ये एकरी १४ टनांपर्यंत उत्पादन मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com