Modern Farming Equipment: प्रगत शेतीसाठी आधुनिक यंत्रे, तंत्रज्ञानाचा वापर

Agriculture Technology: या मालिकेमध्ये आपण भारतीय शेतीसाठी उपलब्ध असणाऱ्या यंत्र आणि तंत्रज्ञानाची माहिती घेत आलो. या पुढे विकसित देशांमध्ये कृषी क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊ.
Agriculture Equipment
Agriculture EquipmentAgrowon
Published on
Updated on

Advanced Farming Techniques: सध्या कृषी क्षेत्रापुढे सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येच्या अन्नांची तजवीज करणे, हेच सर्वात महत्त्वाचे आव्हान असणार आहे. गेल्या ३५ वर्षांत लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा दुप्पट वेगाने अन्नाची मागणी वाढली आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार, जागतिक लोकसंख्येच्या सुमारे १०% किंवा ८१५ दशलक्ष लोक हे कुपोषित आहेत. त्यांना सक्रिय आणि निरोगी जीवन जगण्यासाठी पुरेसे अन्न उपलब्ध होत नाही.

सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही अन्न पुरवठ्याच्या विविध योजना राबवून कुपोषणाचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी शासन धडपडत असते. त्यासाठी अन्नाची उपलब्धता करण्याचे काम करणारा बहुतांश शेतकरीवर्ग स्वतःही अल्पभूधारक गटामध्ये आला आहे. देशाला स्वयंपूर्ण करेल इतके अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचे स्वतःचे उत्पन्न कमी असून, राहणीमान अजूनही हलाखीचे आहे. त्यामुळे त्याची पुढील पिढी शेतात यावी, यासाठी कोणतेही प्रोत्साहन नाही. अशा स्थितीत त्याची मुले कशीबशी पदवी पूर्ण करून शहरामध्ये छोट्यामोठ्या खासगी नोकऱ्यांमध्ये जम बसविण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा सरकारी नोकऱ्यांच्या अपेक्षेने स्पर्धा परीक्षेच्या चक्राला जुंपली जात आहेत.

ही बाज कृषी पदवीधरांचीही होत आहे. हे प्रशिक्षित मनुष्यबळ खरेतर शेतीमध्ये येण्याची आवश्यकता आहे. त्यांना प्रोत्साहन किंवा आश्वासक वाटेल अशी स्थिती भारतीय शेतीमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यांना आकर्षित करेल, असे कष्ट करणारे आणि त्यावेळी उत्पादकता वाढवणारे तंत्रज्ञान संशोधनातून शेतीत सातत्याने येत राहिले पाहिजे. त्याचा पिकाला चांगला दर मिळाला तर तरुणवर्ग शेती किंवा शेतीपूरक व्यवसायाची वाट धरेल. अशा स्थितीमध्ये परदेशामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध तंत्रज्ञानाची आपण माहिती करून घेऊ.

Agriculture Equipment
Agriculture Technology: धान्य वाळविण्यामागील तंत्रज्ञान

आधुनिक शेती म्हणजे काय?

आधुनिक शेती ही कृषी नवकल्पना आणि शेती पद्धतींकडे सतत विकसित होणारी एक पद्धत आहे. त्यामध्ये अत्यावश्यक असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यावर आणि त्यातूनच अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उदा. शेतीवर परिणाम करणाऱ्या विविध हवामान घटकांची माहिती व त्याचे संभाव्य अंदाज वेळेवर किंवा वेळेआधीच उपलब्ध केले जात आहेत. (स्वयंचलित हवामाने केंद्रांची उपलब्धता वाढत आहे.)

जमिनीमध्ये पीक वाढीसाठी आवश्यक पोषकद्रव्ये व पाणी यांची उपलब्धता अचूकपणे उपलब्ध केली जाते. पिकाची स्थिती, सध्याची अवस्था यानुसार अन्नद्रव्याची नेमकी गरज जाणून खत व्यवस्थापन आणि जलसिंचन करणे. (विविध वायरलेस संवेदके - सेन्सर्स आणि उपग्रहाद्वारे मिळणारा माहितीसाठा आणि सिंचनाच्या आधुनिक प्रणालींमुळे तुलनेने कमी पाण्यात पिके घेणे शक्य होऊ लागले आहे.)

विविध जैविक घटकांपासून पिकाच्या संरक्षण करण्यासाठी नुकसान होण्यापूर्वीच उपाययोजना सुचवणे व अंमलात आणणे. (आधुनिक तंत्रज्ञानामुळे कीटक आणि रोगांना प्रतिरोधक असलेल्या उच्च-उत्पादनक्षम वाण विकसित केले जात आहेत.)

पिकाची परिपक्वता जाणून घेऊन वेळेवर कापणी आणि काढणीपश्चात कामांची नियोजन करणे.

अशा विविध क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. शेतकऱ्यांचे कष्ट व शेतीतील मनुष्यबळाची आवश्यकता कमी होत आहे. नियोजनामध्ये अचूकता साधणे शक्य झाल्याने खर्चात बचत होत आहे. पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढली आहे.

आजपर्यंत उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी झालेल्या हरितक्रांती, धवलक्रांती, पीतक्रांती आणि नीलक्रांती याला आता ‘तंत्रज्ञान क्रांती’ची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सध्या निर्माण झालेली डिजिटल साक्षरता, तुलनेने स्वस्त इंटरनेट नक्कीच फायद्याचे असणार आहे.

Agriculture Equipment
Agriculture Technology: प्रतवारी यंत्राचे विविध प्रकार

शेतीमध्ये वापरली जाणारी आधुनिक अवजारे कोणती?

पीक उत्पादन पातळीमध्ये प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील मातीची मशागत, बी-बियाणे आणि लागवड, लागवड, खतांचा वापर आणि वितरण, कीटक नियंत्रण, कापणी, सिंचन, निचरा, वाहतूक, साठवणूक आणि मागील पिकांच्या पिकांच्या अवशेषांची हाताळणी यांचा समावेश आहे. त्याच्या प्रत्येक टप्प्यावर आता विविध आधुनिक यंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परदेशामध्ये सर्रास आणि सार्वत्रिक वापरात असलेल्या या यंत्रांचा वापर आपल्याकडेही हळूहळू वाढत आहे.

पारंपरिक पद्धतीमध्ये अवजड कामांसाठी पशूंची मदत घेतली जात असे. तेच ऊर्जेचे प्राथमिक स्रोत होते. मात्र वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यानंतर उद्योगीकरणाला जशी चालना मिळाली, तशीच चालना वाफेवरील यंत्रांच्या निर्मिती व वापरालाही मिळाली. त्यानंतर खनिज तेलांवर (उदा. पेट्रोल, डिझेल) चालणारे ट्रॅक्टर, पंप आले. यंत्राच्या वापराने कामांचा वेग वाढला. विकसित देशांमध्ये औद्योगीकरणामुळे कारखान्यांमध्ये कामगार म्हणून शेतीमधील मजूर शिरले तरी यंत्राचा वापर वाढल्याने त्यांचा तुटवडा फारसा जाणवला नाही.

मात्र भारतासारख्या देशामध्ये वाढलेल्या शहरीकरणामुळे आणि शेतीतील कष्टाच्या तुलनेत अल्प मजुरी किंवा वेतनामुळे स्थलांतर वाढले. त्याचा सर्वाधिक फटका भारतीय शेतीक्षेत्राला बसत आहे. अशा स्थितीमध्ये विकसित देशांमध्ये व्यापकपणे वापरली जाणारी यंत्रे व तंत्रज्ञान आपल्याकडेही वापरली जाण्याची गरज आहे. उदा. लेसर लॅण्ड लेव्हलर, नांगर, रोटाव्हेटर किंवा रोटरी टिलर, डिस्क हॅरो, कंबाईन किंवा कम्बाइन हार्वेस्टर, रिपर मशीन आणि ट्रॅक्टर-ट्रेलर.

लेसर लॅण्ड लेव्हलर

जमीन समतल करण्यासाठी लेसर किरणांवर आधारीत अचूक लेव्हलर आता उपलब्ध होत आहे. हे ट्रॅक्टरचलित उपकरण शेत समतल करते. त्यामुळे पाण्याचे वेगवान प्रवाह आणि मातीची होणारी धूप रोखली जाते. अचूक सिंचनासाठी समतल जमीन अत्यंत महत्त्वाची ठरते. जमिनीमध्ये निर्माण झालेला ओलावा सर्वत्र समप्रमाणात राहण्यास महत होते. त्याच प्रमाणे खते, बियाणे, रसायने आणि इंधनाचा वापर कमी होतो. उर्वरीत यंत्रांची माहिती पुढील भागामध्ये घेऊ.

मोल्ड बोर्ड (एमबी) नांगर

विविध प्रकारचे नांगर (मोल्ड-बोर्ड नांगर, पलटी नांगर, डिस्क नांगर) ही ट्रॅक्टरशी जोडली जाणारी प्राथमिक नांगरणीची साधने आहेत. पेरणीपूर्व मशागतीमध्ये ट्रॅक्टर व काही नांगराचा वापर आपल्याकडेही होत असला तरी जमिनीचा प्रकार, मशागतीची आवश्यकता यानुसार त्यात योग्य त्या अवजारांचा वापर करणे आवश्यक असते. एकाच वेळी अनेक अवजारे घेणे आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी आठ ते दहाजणांच्या गटामध्ये अशी अवजारे घेतल्यास फायदा होऊ शकतो. गावपातळीवर आवश्यकतेनुसार अवजारे बॅंका तयार करण्यासाठी शासनही प्रयत्न करत आहे.

या आधुनिक अवजारांमध्ये अनेक बाबींचा समावेश होत आहे. त्यामुळे शेतकरी पूर्वीपेक्षा जास्त जमीन मशागत करू शकतात, ज्यामुळे त्यांना कमी वेळेत जास्त जमीन कसता येते. आता ट्रॅक्टरचलित नांगरामध्ये नांगरणीची खोली, रुंदी आणि ओढण्यासाठी लागणारी ताकद हे कामाची क्षमता आणि इंधन खपत यावर परिणाम करणारे घटक स्वयंचलित रित्या नियंत्रित करणाऱ्या यंत्रणा उपलब्ध आहेत. नांगराचा फाळ जेवढा धारदार असेल तितकी जास्त (२० टक्क्यांपर्यंत) इंधन बचत होते. हायड्रॉलिक यंत्रणेतील ड्राफ्ट नियंत्रण प्रणालीमुळे ट्रॅक्टरवरील ताणही कमी राहतात. इंधनामध्ये बचत होते.

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९, (प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com