Agriculture Technology: धान्य वाळविण्यामागील तंत्रज्ञान

Grain Drying Process: साठवणीसाठी धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण योग्य पातळीवर असणे गरजेचे असते. ते योग्य पातळीवर आणण्यासाठी ज्या वाळविण्याच्या पद्धती वापरल्या जातात, त्यामागील तंत्रज्ञानाची माहिती या लेखात घेऊ.
Drying Equipment
Drying EquipmentAgrowon
Published on
Updated on

डॉ. सचिन नलावडे

Agricultural Drying Method: काढणीनंतर धान्यामध्ये आर्द्रता किंवा ओलाव्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. अन्यथा, साठवणुकीदरम्यान ते खराब होऊ शकते. त्यासाठी मळणीनंतर धान्य वाळविण्याची प्रक्रिया केली जाते.

या टप्प्यांमध्ये धान्यातील पाण्याचा अंश कमी करण्यासाठी नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा प्रामुख्याने वापर केला जातो. मात्र या नैसर्गिक संसाधनाच्या उपलब्धतेविषयी फारशी खात्री नसते. अशा वेळी इंधन किंवा विजेवर चालणाऱ्या प्रक्रियांचा ओलावा कमी करण्यासाठी वापर केला जातो.

दरवर्षी लाखो टन गहू, बार्ली, मका, सोयाबीन, तांदूळ आणि ज्वारी, सूर्यफूल बियाणे इ. धान्ये उन्हात वाळवली जातात. अलीकडे त्यासाठी धान्य वाळवण यंत्राचा वापर केला जाऊ लागला आहे. वाळवण्यामध्ये सुमारे १७ ते ३० टक्के w/w (पाण्याचे वजन) पासून ८ ते १५ टक्के w/w पर्यंत (धान्यावर अवलंबून) ओलावा कमी केला जातो.

धान्यातील तेलाचे प्रमाण जितके जास्त, तितका त्या धान्यातील साठवणुकीचा ओलावा कमी असला पाहिजे. म्हणजेच सुकविण्यापूर्वीची सुरुवातीची ओलदेखील कमी असेल. उदा. तृणधान्ये बहुतेकदा १४ टक्के w/w पर्यंत वाळवली जातात, तर तेलबिया १२.५ टक्के (सोयाबीन), ८ टक्के (सूर्यफूल) आणि ९ टक्के (शेंगदाणे) पर्यंत वाळवली जातात.

Drying Equipment
Agriculture Technology : तंत्रज्ञानातूनच कृषी क्षेत्राचा विकास शक्‍य

सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक म्हणून धान्य वाळवले जाते. तथापि, साठवणुकीत कमी तापमानाची शिफारस केली जाते. विघटनकारी प्रतिक्रिया आणि विशेषतः कीटक आणि माइट्सची वाढ टाळता येईल. साठवणुकीसाठी चांगले कमाल तापमान सुमारे १८ अंश सेल्सिअस असते.

धान्य सुकवण्याच्या मूलभूत गोष्टी

धान्याच्या आतून-बाहेर पसरणाऱ्या ओलाव्यावर आधारित वाळविण्याची प्रक्रिया असते. धान्याला स्पर्श करत जाणारी गरम आणि कोरडी हवा धान्यातील आर्द्रतेचे बाष्पात रूपांतर करते. अशी बाष्पसंतृप्त हवा वाऱ्याबरोबर बाहेर काढली जाते.

ही प्रक्रिया साधारण तीन टप्प्यात घडवली जाते. पहिल्या टप्प्यात, दाण्यात खोलवर असलेले पाणी बाहेरील कवचाकडे ढकलले जाते. दुसऱ्या टप्प्यात दाण्यांभोवती फिरवलेल्या गरम हवेद्वारे पाण्याचे बाष्पीभवन होते. तिसऱ्या टप्प्यात आर्द्रतेने समृद्ध हवा बाहेर काढली जाते.

वाळवण यंत्रात (ड्रायरमध्ये) धान्य घातले जाते, तेव्हा त्यात एकसमान आर्द्रता असते. वाळवण यंत्रामध्ये पंख्याद्वारे फिरवलेल्या गरम वाऱ्यामुळे बाह्य भागावरील आर्द्रतेचे बाष्पीभवन होते. सोबतच त्या रिक्त झालेल्या जागेमध्ये आतील आर्द्रता खेचला जातो. एकंदरीत सच्छिद्रतेमुळे पुन्हा संतुलन प्राप्त होते. ही प्रक्रिया अपेक्षित आर्द्रतेच्या पातळीपर्यंत आर्द्रता कमी होईपर्यंत केली जाते.

काही यंत्रांमध्ये वाळविण्याची प्रक्रिया डब्याच्या तळाशी सुरू होते. तिथे हवेचा पहिला संपर्क येतो. पंख्याद्वारे ओल्या धान्याच्या थरातून कोरडी हवा वर सोडली जाते. वाळविण्याची प्रक्रिया १ ते २ फूट जाडीच्या थरात होते. त्याला वाळवणाचे क्षेत्र म्हणतात. वाळवणाचे क्षेत्र डब्याच्या तळापासून वरच्या दिशेने सरकत जाते. ते जेव्हा सर्वांत वरच्या थरांत पोहोचते, तेव्हा धान्य कोरडे झालेले असते. वाळविण्याच्या क्षेत्राखालील धान्य-आर्द्रता ही त्यामध्ये सोडलेल्या हवेशी समतोल साधत असते. या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारी बाष्पयुक्त हवा चिमणीद्वारे वाळवण डब्यातून बाहेर काढली जाते.

साठवण वेळ

किती आर्द्रतेचे प्रमाण असताना धान्य किती काळ टिकते, याचे काही अभ्यास झालेले आहेत. साठवणीसाठी ठेवत असलेल्या धान्यामध्ये किती आर्द्रता आहे आणि ती किती पातळीपर्यंत कमी करायची आहे, यानुसार वाळवणाचा वेळ किती लागेल, याचा अंदाज येतो. धान्यातील आर्द्रतेमुळेच विविध बुरशी व कीटक त्याकडे आकर्षित होतात. विशेषतः बुरशी ही प्राथमिक चिंता असते. कीटक, उंदीर आणि जिवाणूंसारखे

अन्य काही घटकही साठवणुकीवर परिणाम करतात. साठवणुकीदरम्यान धान्याचे तापमान जितके कमी असेल, तितका साठवणुकीचा काळ जास्त असेल.

समतोल ओलावा

धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण हे सभोवतालच्या हवेच्या सापेक्ष आर्द्रता आणि तापमानाशी संबंधित आहे. समतोल आर्द्रता बिंदू म्हणजे जेव्हा धान्य वाळलेल्या हवेशी संपर्क साधताना पाणी गमावत नाही किंवा मिळवत नाही, अशी स्थिती.

वाळलेल्या धान्याची अंतिम आर्द्रता ही हवेतील सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात असते. कमी सापेक्ष आर्द्रता असलेली म्हणजेच कोरड्या हवेमध्ये पाणी शोषण्याची मोठी क्षमता असते. सर्वसाधारणपणे हवेच्या तापमानात २० अंश फॅरनहाइटने (°F) वाढ केल्यास त्याची सापेक्ष आर्द्रता अर्धी होते.

सुरक्षित साठवणुकीसाठी योग्य आर्द्रता

जर धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि त्याचा कीटक, उंदीर आणि पक्ष्यांपासून योग्य बचाव केला गेला, तर धान्याची दीर्घकाळ सुरक्षित साठवणूक शक्य आहे. सुरक्षित साठवणुकीसाठी शिफारस केलेले आर्द्रतेचे प्रमाण खालील तक्त्यामध्ये दिले आहे.

Drying Equipment
Agriculture Technology : नवी पीकपद्धती, तंत्रज्ञान वापरातून ‘देगाव’ची वाटचाल

तापमान

धान्य सुकविण्याच्या प्रक्रियेत गरम हवा वापरली जाते. ती केवळ धान्याच्या आतील ओलाव्याचे स्थलांतर वाढवत नाही, तर पृष्ठभागावरील ओलाव्याचे बाष्पीभवन देखील करते. वाळविण्याच्या प्रक्रियेसाठी गरम हवेची प्रमुख समस्या म्हणजे ती धान्याचे तापमानही वाढवते. ते उच्चतम पातळीवर पोहोचल्यास धान्याचे दाणे खराब होऊ शकतात.

सामान्यतः धान्याचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा कमी असते. कशासाठी वापरणार यानुसार धान्याचे तापमान वेगवेगळे ठेवले जाते. उदा. बियाणे धान्यासाठी कमाल तापमान ११० °F आहे; पशुखाद्यासाठी वापरणार असल्यास कमाल तापमान १८० °F आहे.

वायुविजन

वायुविजन म्हणजे धान्यातून हवा प्रवाहित करण्याची प्रक्रिया. वायुप्रवाह म्हणजे घनफूट प्रति मिनिट वाऱ्याचा वेग. धान्य सुकविण्याच्या प्रक्रियेत वाळविण्याचा वेळ हा मुख्यत्वे वायुप्रवाह दरांवर अवलंबून असतो. धान्यातून वारा प्रवाहित करण्यासाठी पंखे वापरले जातात.

ड्रायरचे प्रकार

शेतातून काढणी झाल्यानंतर दूरवर असलेल्या ड्रायरपर्यंत धान्य वाहतूक करून न्यावे लागते. त्याऐवजी अलीकडे वाहतूक पट्ट्यांचा वापर केला जातो. हे पट्टे सतत चालणारे असतात. यातही काही प्रकार आहे. उदा. युरोपमध्ये मिश्र-प्रवाह ड्रायर पसंत केले जातात, तर अमेरिकेमध्ये आडवा-प्रवाह ड्रायर वापरतात. सतत प्रवाह ड्रायर प्रति तास १०० मेट्रिक टन धान्य वाळवू शकतात. मिश्र-प्रवाह ड्रायरमध्ये सुमारे ०.१५ मीटर ते क्रॉस-फ्लोमध्ये सुमारे ०.३० मीटरपर्यंत असते. बॅच ड्रायर प्रामुख्याने शेतातच वापरले जातात.

त्यामध्ये सामान्यतः एक कोठीमध्ये अंतर्गत सिलिंडरमधून आतील छिद्राद्वारे धातूच्या पत्र्यामधून आडवी गरम हवा वाहते, नंतर कंकणाकृती धान्याच्या सुमारे ०.५० मीटर जाड पेवेमधून आरिय दिशेने बाहेर जाते. शेवटी बाह्य धातूच्या शीटमधील छिद्रातून वातावरणात सोडली जाते. वाळविण्याचा वेळ १ ते ४ तासांपर्यंत असतो. तो धान्याचा प्रकार, त्यातून किती पाणी काढून टाकावे लागेल, हवेचे तापमान आणि धान्याची खोली यावर अवलंबून असतो.

अमेरिकेत शेतात सतत चालणारे आणि हवेचा विरुद्ध - प्रवाह असणारे ड्रायर आढळतात. त्यात वरच्या बाजूला भरले जाणारे ओले धान्य हळूहळू वाळवले जाते. खालील बाजूने स्क्रू ऑगरने कोरडे धान्य बाहेर काढले जाते.

वाळविण्याचा खर्च

वाळविण्याचा खर्च दोन भागांत विभागलेला असतोभांडवली खर्च आणि वापरण्याचा खर्च. भांडवली खर्च हा मुख्यत्वे धान्य वाळविण्याची आवश्यकता आणि उपकरणांच्या खर्चावर अवलंबून असतो. वापरण्याचा खर्च हा इंधन, वीज आणि मजूर शक्तीचा खर्च दर्शवितो.

एक क्विंटल धान्य वाळविण्यासाठी लागणारी ऊर्जा सर्व वाळविण्याच्या पद्धतींसाठी सारखीच असते. काही पद्धती मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हवेवर अवलंबून असतात, तिथे खर्चात बचत होते. काही पद्धतीमध्ये इंधनाद्वारे किंवा नैसर्गिक वायूद्वारे तयार केलेली ऊर्जा वापरली जाते. परिणामी खर्च वाढू शकतो. त्यामुळे वाळविण्याचा खर्च हा वातावरणाचे आणि धान्याचे इच्छित तापमान यांच्यातील फरक मिळविण्यासाठी आवश्यक उष्णता वापरावर आधारित असतो.

साठवण कालावधी सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक असलेला ओलावा संभाव्य समस्या

आठवडे ते काही महिने साठवणूक १४ टक्के किंवा त्याहून कमी बुरशी, रंग बदलणे, श्‍वसनक्रिया बंद होणे, कीटकांचे नुकसान, ओलावा शोषण

८ ते १२ महिने साठवणूक क्षमता १३ टक्के किंवा त्याहून कमी कीटकांचे नुकसान

शेतकऱ्यांच्या बियाण्यांची साठवणूक १२ टक्के किंवा त्याहून कमी उगवण कमी होणे

१ वर्षापेक्षा जास्त काळ साठवणूक क्षमता ९ टक्के किंवा त्यापेक्षा कमी उगवण कमी होणे

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com