Bio-Plastic : प्लॅस्टिकला पर्याय बायोप्लॅस्टिकचा

Sustainable Plastic : बायोप्लॅस्टिकसाठी लागणारा कच्चा माल, अर्थात शेतीमाल भारतामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याशिवाय इथले हवामान आणि भौगोलिक परिस्थितीही बायोप्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी पूरक आहे.
Bio-Plastic
Bio-PlasticAgrowon
Published on
Updated on

Bio-Plastic Policy : ग्रॅज्युएट चित्रपटाच्या सुरुवातीला बेंजामिनच्या ग्रॅज्युएशन पार्टीमध्ये त्याच्या वडिलांचे एक मित्र बेंजामिनला सल्ला देतात... ‘प्लॅस्टिक्स... देअर इज अ ग्रेट फ्यूचर इन प्लॅस्टिक्स’. १९६७मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट. तेव्हा प्लॅस्टिकचा वापर आतासारखा अतिरेकी नाही, पण सुरू झाला होता, आणि प्लॅस्टिकमध्ये ‘उज्ज्वल भविष्य’ दडलेले आहे, याची जाणीव जगाला होऊ लागली होती. ग्रॅज्युएट चित्रपटातले हे दृश्य याचे उत्तम उदाहरण आहे.

प्लॅस्टिकमुळे अनेक उद्योगांमध्ये क्रांती झाली. आपले दैनंदिन जीवनमानही सुधारले. ग्रॅज्युएट चित्रपट आला तेव्हा प्लॅस्टिकचा वापर साधारण २.३ दशलक्ष टनांच्या आसपास होता. आता दरवर्षी ४०० दशलक्ष टनांहून अधिक प्लॅस्टिक वापरले जाते. प्लॅस्टिक आता आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे.

मात्र अतिशय उपयुक्त ठरणारे असे हे बहुगुणी प्लॅस्टिक आता अनेक समस्या घेऊन उभे आहे. कारण प्लॅस्टिकची योग्य आणि सुरक्षित विल्हेवाट लावणे, हा मोठा यक्षप्रश्‍न होऊन बसला आहे. एकूण उत्पादित प्लॅस्टिकपैकी अंदाजे ३५ टक्के प्लॅस्टिक ‘सिंगल यूज’ असते. त्यातले दरवर्षी सुमारे १२ दशलक्ष टन प्लॅस्टिक समुद्रात जाते.

नष्ट न होणाऱ्या या प्लॅस्टिकचे आणखी बारीक तुकडे होऊन त्याचे मायक्रोप्लॅस्टिकमध्ये रूपांतर होते, जे पाणी व हवा प्रदूषित करते, अन्नात मिसळते. आतापर्यंत तयार झालेल्या प्लॅस्टिक कचऱ्यापैकी फक्त १० टक्के कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया झाली आहे, १२ टक्के जाळण्यात आला आहे, उरलेले सर्व कचरा पृथ्वीच्या कुठल्याना कुठल्या कोपऱ्यात तसाच पडून आहे.

Bio-Plastic
Bio-Plastic Policy : जैवप्लॅस्टिक धोरण आणणार

प्लॅस्टिकच्या या समस्यांवर उपाय शोधताना बायोप्लॅस्टिकचा पर्याय पुढे येतो. म्हणूनच आम्ही प्राज इंडस्ट्रीमध्ये जैवऊर्जा क्षेत्राच्या पलीकडे जात अक्षय्य (रिन्युवेबल) रसायने आणि साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवताना बायोप्लॅस्टिकवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. २०२०मध्ये आम्ही बायोप्लॅस्टिकवर काम सुरू केले.

प्राजने विकसित केलेल्या प्लॅस्टिकला ‘कम्पोस्टेबल प्लॅस्टिक’ म्हणणे जास्त योग्य ठरेल. हे प्लॅस्टिक सर्क्युलर इकॉनॉमीचा भाग ठरावे, अशी अपेक्षा आहे.

जीवाश्म-आधारित म्हणजे आत्ता वापरात असलेल्या नेहमीच्या प्लॅस्टिकचे तोटे आता सर्वज्ञात आहेत. त्यातही सिंगल यूज - एकदाच वापरण्यायोग्य प्लॅस्टिक घातक ठरत आहे. अशा प्लॅस्टिकला बायोप्लॅस्टिक उत्तम पर्याय ठरू शकेल.

प्राज इंडस्ट्रीज थीसेनकृप उदे कंपनीशी भागीदारी करून पीएलए (Polylactic Acid) आणि पीएचए (Polyhydroxyalkanoates ) या दोन प्रकारच्या प्लॅस्टिकवर काम करत आहे. त्यासाठी जेजुरीमध्ये भारतामधील पहिला बायोपॉलिमर्स डेमो प्लांटही उभारण्यात आला आहे. या प्लांटच्या माध्यमातून एंड-टू-एंड सोल्यूशन्स देण्याचा प्रयत्न राहील, म्हणजेच या तंत्रज्ञान वापरण्यासाठी परवाना देणे, सर्वसमावेश अभियांत्रिकी सेवा देणे, मॉड्युल्स आणि उपकरणे पुरवणे आणि प्लांट उभारणीसाठी मदत करणे.

पीएचए आणि पीएलए ही भावंडे जरी असली, तरी दोन्हींचे पॉलिमर्स वेगवेगळे असतात.

पीएलए आणि पीएचए

- पीएलएचा उपयोग व्यापक स्वरूपात होऊ शकतो. पिशव्या, सेमी

सॉफ्ट कंटेनर्स, उदाहरणार्थ, टूथपेस्टची ट्यूब, डिटर्जंट बॉटल्स अशांसाठी पीएलएचा वापर करता येऊ शकतो.

- पीएचए थोड्या कडक किंवा जास्त भक्कम प्लॅस्टिक लागणाऱ्या गोष्टींसाठी वापरता येऊ शकते. म्हणजेच कडक पॅकेजिंगसाठी किंवा मुलांची खेळणी या प्लॅस्टिकपासून करता येऊ शकतील.

- ही दोन्ही प्रकारची प्लॅस्टिक्स डिग्रेडेबल आहेत.

Bio-Plastic
Praj Industry : मांदेडे गाव ‘नेट झीरो’ करण्याचा ‘प्राज’चा संकल्प

हे बायोप्लॅस्टिक असल्यामुळे याचा कच्चा माल शेतमालामधून येतो. शेतीमालासारख्या कच्चा मालात वैविध्य येणे स्वाभाविक आहे. परंतु बायोप्लॅस्टिकचे तंत्रज्ञान विकसित करताना हे वैविध्य आधीच गृहीत धरलेले आहे. त्यामुळे कच्च्या मालात कितीही फरक पडला, तरी त्याला एका पातळीवर आणून त्यावर पुढील प्रक्रिया केली जाते. शेतमालाची साखर करून त्यावर किण्वन प्रक्रिया (फर्मेंटेशन) केली जाते. ते झाले की मग त्याचे पॉलिमरायझेशन होत. आणि त्यातून शेवटी मिळते ते प्लॅस्टिक. किण्वन प्रक्रियेनंतरची प्रक्रिया नेहमीच्या प्लॅस्टिकनिर्मितीसारखीच असल्यामुळे त्यासाठी वेगळे उपकरण लागत नाही.

पर्यावरणपूरक गोष्ट महाग असते, असा एक मतप्रवाह दिसतो. कुठलीही पर्यावरणपूरक गोष्ट सुरुवातीला महाग असू शकते. बायोप्लॅस्टिक आणि नेहमीच्या प्लॅस्टिकच्या किमतीत फरक पडेलही, पण बायोप्लॅस्टिकसाठी मोजलेली किंमत ही पर्यावरणासाठी मोजलेली किंमत असेल हे लक्षात घ्यायला हवे. कारण नेहमीच्या प्लॅस्टिकचा विचार करता, आपण फक्त त्याचे निर्मिती मूल्य विचारात घेतो. पण हे प्लॅस्टिक वापरून झाल्यानंतर टाकून दिले जाते.

त्याचे वर्गीकरण करणे, सुरक्षित विल्हेवाट लावणे, शक्य असल्यास पुनर्प्रक्रिया करणे, याशिवाय पर्यावरणावर, सजीवसृष्टीवर आणि अंतिमतः आपल्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम यासाठी मोजली जाणारी किंमत पाहता, फॉसिल बेस्ड म्हणजे नेहमीचे प्लॅस्टिक जास्त खर्चिक पडते.

पुढील दिशा

प्राज इंडस्ट्रीने मुंबईमधील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे. ही एक प्रयोगशाळाच आहे. या प्रयोगशाळेत बायोपॉलिमर्सचे आकार, प्रकार या सगळ्या दृष्टीने प्रयोग करण्यात येत आहेत.

सध्या जगभरातील वार्षिक प्लॅस्टिक उत्पादनामध्ये बायोप्लॅस्टिकचे वार्षिक उत्पादन केवळ ०.५ टक्काच आहे. त्यामुळे या क्षेत्रात भरपूर संधी आहेत.

भारतात आहे बायोप्लॅस्टिकसाठी उत्तम परिसंस्था

बायोप्लॅस्टिकसाठी लागणारा कच्चा माल, अर्थात शेतीमाल भारतामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याशिवाय इथले हवामान आणि भौगोलिक परिस्थितीही बायोप्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी पूरक आहे. भारत सरकारच्या बायो-ई३ (Bio-E3) पॉलिसी आणि बायो-राइड (Bio-RIDE) यांसारख्या योजना बायोप्लॅस्टिकसारख्या जैवउत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या ठरत आहेत. याशिवाय भारतामध्ये ऊर्जेचा खर्च कमी आहे आणि कुशल मनुष्यबळाबरोच जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थाही आहेत.

बायोप्लॅस्टिकचे फायदे

- विषारी रसायनाशी होणारा संपर्क कमी होईल.

- अन्नपदार्थ साठवण्यासाठी बायोप्लॅस्टिक वापरल्यास अन्नपदार्थ अधिक सुरक्षित होतील.

- प्रदूषणावर नियंत्रण आणता येईल.

- जीवाश्म संसाधनांवरील अवलंबित्व कमी होईल.

- रोजगारनिर्मिती होईल.

(डॉ. प्रमोद चौधरी पुणेस्थित प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

शब्दांकन ः इरावती बारसोडे

(साभार ः साप्ताहिक सकाळ)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com