Agriculture Technology : तंत्रज्ञान वापरातून टिकवली प्रयोगशीलता

Agriculture Development : खरांगणा (ता. आर्वी) येथील प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी निलीमा संजयराव अकलवार तीन वर्षांपासून या तंत्राचा वापर करीत असून त्याद्वारे सोयाबीन व हरभरा पिकात उत्पादनवाढ मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : वर्धा जिल्ह्यातील सेलसूरा कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान रुजवण्यात येत आहे. खरांगणा (ता. आर्वी) येथील प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी निलीमा संजयराव अकलवार तीन वर्षांपासून या तंत्राचा वापर करीत असून त्याद्वारे सोयाबीन व हरभरा पिकात उत्पादनवाढ मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ट्रायकोडर्मा निर्मितीची घरगुती प्रयोगशाळा उभारून व विविध सेंद्रिय घटक शेतातच तयार करण्याचे तंत्र आत्मसात करून त्यांनी जैविक शेतीला चालना दिली आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांत खरीप व रब्बी पिकांमध्ये बीबीएफ अर्थात रुंद सरी वरंबा पध्दतीचे तंत्रज्ञान वापरण्याची चळवळ रुजली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अवजारे विभागाने ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्र विकसित करून त्याच्या प्रसाराला चालना दिली आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या काळात पावसाचे मूलस्थानी जलसंधारण त्या माध्यमातून होतेच. शिवाय अतिवृष्टी व संततधार पावसाच्या काळात सरीतील अतिरिक्‍त पाणी शेताबाहेर निघण्यासही हे तंत्रज्ञान सहाय्यभूत ठरत आहे.

Agriculture Technology
Agriculture Technology : शेतकऱ्यांना परवडणारे तंत्रज्ञान द्यावे

जिल्ह्यातील सेलसूरा येथे कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) माध्यमातून या तंत्राचा प्रसार करण्यात येत आहे. केव्हीकेच्या माध्यमातून सुमारे १० हजार एकरांवर सोयाबीनची पेरणी बीबीएफ यंत्राचा वापर करून करण्यात आली. त्यानंतर मागील तीन वर्षांपासून रब्बीत हंगामात हरभरा लागवडीसाठीही या तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आले. परिणामी सुमारे ९५० एकरांवर हे क्षेत्र पोचले आहे. या तंत्रज्ञानात दोन सरीमध्ये पुरेशी मोकळी जागा राहात असल्याने शेताचे निरीक्षण करणे व फवारणी करणे सोयीचे होते.

पारंपारिक पीक पद्धतीत एकरी ३० किलो बियाण्याची गरज असताना बीबीएफ पद्धतीत २० ते २२ किलो एवढ्याच बियाण्यांची गरज भासते. तर उत्पादनात २० ते ३० टक्‍के सरासरी उत्पादन वाढ होते असे निरीक्षण असल्याचे केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेगाव मंडळात पाच हजार हेक्‍टरवर हरभरा लागवड होते. त्यात अधिक क्षेत्रावर पट्टा पध्दतीचा वापर होतो. त्यासह व्यवस्थापन उत्तम ठेऊन एकरी १२ ते १५ क्‍विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी या भागात असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी दिली.

Agriculture Technology
Agriculture Technology : बटर ब्लॉक कापण्यासाठी विकसित केले यंत्र

नीलिमा यांची प्रयोगशील शेती

खरांगणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील निलीमा अकलवार या प्रयोगशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची २२ एकर शेती आहे. पती संजयराव कृषी विषयातील पदव्युत्तर पदवीधारक आहेत. त्यांच्या मदतीने त्या खरिपात सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी तर रब्बी हंगामात हरभरा, गहू आणि तीळ आदींची शेती करतात. सेलसूरा केव्हीकेच्या त्या संपर्क शेतकरी आहेत. साहजिकच मागील तीन वर्षांपासून त्या सोयाबीन व हरभरा पिकात बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यात पाणी फाउंडेशन व कृषी विभाग- आत्मा यांची साथही त्यांना लाभली आहे. त्या सुरवातीला लगतच्या एक किलोमीटर अंतरावरील धनोली गावातून ‘बीबीएफ यंत्र’ भाडेतत्वावर आणून त्याचा वापर त्या करायच्या. आता त्यांच्या पुढाकाराने गावात श्री. संत काळेमहाराज (ग्रामदैवत) गटाची स्थापना झाली आहे. गटातील एका शेतकऱ्याकडे आत हे यंत्र आले आहे. त्याचा फायदा अन्य शेतकऱ्यांना होतो.

शेती व्यवस्थापनातील बाबी

निलीमा यांच्या शेती व्यवस्थापनाबाबत बोलायचे तर बीबीएप पद्धतीत त्या एक ते सव्वा मीटर रुंदीचा बेड (गादीवाफा) तयार करतात. त्यावर प्रति तीस सेंटीमीटरचे पाच तास (ओळी) तयार होतात. दोन बेडसमध्ये ४५ सेंटिमीटरची सरी तयार होते. दोन सरीमध्ये तीन फूट तर दोन बियाण्यांमध्ये चार इंच याप्रमाणे अंतर ठेऊन सरीवर दोन्ही बाजूंनी त्यांनी लागवड करण्याची पध्दत वापरली आहे. पेरणी झाल्यानंतर पिकाला आवश्‍यक तेवढे पाणी मिळते. बेडवरील अतिरिक्त पाणी सरीमध्ये उतरते. त्यामुळे ओलावा कायम राहतो. ज्यावेळी पिकाची वाढ होते, त्यावेळी सरीमधील अंतरामुळे पिकाला खेळती हवा मिळते. यंदा चार एकरांत त्यांनी हरभरा लागवड बीबीएफ पद्धतीने केली आहे. यंदा त्यांनी सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड केली. चारकोल रॉट रोगासारख्या समस्यांची तीव्रता दूर करण्याचा त्यामागील उद्देश आहे.

टोकण यंत्राचा वापर

यंदाच्या वर्षापासून निलीमा यांनी सोयाबीन व हरभरा पिकात टोकण यंत्राचा वापर केला आहे. सोयाबीनचे सुधारित व बीबीएफ पद्धतीने एकरी १२ क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळाल्याचे नीलिमा यांनी सांगितले. हरभरा पिकाची एकरी उत्पादकता देखील दोन क्विंटलने वाढून ती सहा क्‍विंटलवर पोचली आहे. एका योजनेंतर्गत गावातील २० शेतकऱ्यांना दहा टोकण यंत्राचा निःशुल्क पुरवठा केव्हीकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने निधीची उपलब्धता करण्यात आली आहे. मजूरीच्या समस्येवरही हा पर्याय प्रभावी ठरला आहे. यंदा गव्हासाठीही टोकण यंत्राचा वापर करणार असल्याचे नीलिमा यांनी सांगितले. दरवर्षी कापूस हे पीकही त्यांच्याकडे असते. त्याचे एकरी आठ क्विंटलपर्यंत त्या उत्पादन घेतात. यंदा त्यांनी सघन पद्धतीने कापूस घेतला आहे. शिवाय पाच बाय एक फूटवरील तुलनात्मक लागवडही केली आहे.

सेंद्रिय घटकांची निर्मिती व प्रयोगशाळा

सर्व क्षेत्रावरील पिकांचे व्यवस्थापन अधिकाधिक सेंद्रिय पद्धतीने करण्यावर नीलिमा यांचा भर आहे. त्यांच्याकडे दोन देशी गायी, चार वासरे, व तीन बैल आहे. त्यांच्या शेण-मूत्राचा वापर करून जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांची निर्मिती कली जाते. बांधावरील प्रयोगशाळा अंतर्गत त्यांनी ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीची निर्मिती करण्यासाठी प्रयोगशाळा देखील उभारली आहे. शेतकऱ्यांना त्याची विक्रीही त्यांनी केली आहे. केव्हीकेच्या माध्यमातून आता ट्रायकोग्रामा या मित्रकीटकाचे उत्पादन देखील त्या सुरू करणार आहेत. निलीमा यांचा मुलगा एमएस्सी झाला असून ठाणे येथे नोकरी करतो आहे. तर मुलगी संगणकीय अभियंता आहे. आज वयाच्या ५५ व्या वर्षीही नीलिमा शेतीत अखंड प्रयोगशील राहून अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरत आहेत.

निलीमा अकलवार ७५८८७८०८३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com