Ginger Farming : गादीवाफा पद्धतीने आले लागवडीवर भर

Ginger Cultivation : पाल (जि. सातारा) येथील जयवंत पाटील या तरुण शेतकऱ्याने सुधारित तंत्र अवलंबून आले लागवडीत उत्पादनात एकरी दुपटीने वाढ मिळविली आहे.
Ginger Farming
Ginger FarmingAgrowon

शेतकरी नियोजन

पीक : आले

शेतकरी : जयवंत बाळासाहेब पाटील

गाव : पाल, ता. कऱ्हाड, जि. सातारा.

एकूण क्षेत्र : २४ एकर

आले लागवड : साडेचार एकर

पाल (जि. सातारा) येथील जयवंत पाटील या तरुण शेतकऱ्याने सुधारित तंत्र अवलंबून आले लागवडीत उत्पादनात एकरी दुपटीने वाढ मिळविली आहे.

जयवंत पाटील यांची स्वतःची सुमारे २४ एकर शेतजमीन आहे. त्याशिवाय जयवंतराव भाडेतत्त्वार १२ एकर शेती घेऊन कसतात. त्या माध्यमातून शेती उत्पन्नामध्ये आर्थिक वाढ करणे शक्य झाल्ये असल्याचे जयवंत पाटील सांगतात.

पूर्वी पाटील कुटुंबाची २४ एकर जमीन होती. यातील पाच एकर बागायती क्षेत्र तर उर्वरित सर्व जिरायती क्षेत्र होते. वडील बाळासाहेब आणि चुलते दिलीपराव, लालासाहेब समवेत जयवंत यांनी पारंपरिक शेती करण्यास सुरवात केली. २००८ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची मुख्य जबाबदारी जयवंत यांच्यावर आली. २००९ मध्ये तारळी नदीवरून आठ हजार फूट लांबीची पाइपलाइन करून सिंचनासाठी पाणी आणले. आणि त्यानंतर संपूर्ण क्षेत्र बागायती झाले.

दरवर्षी साधारण पाच ते सहा एकर क्षेत्रामध्ये आले लागवड केली जाते. एकदा आले लागवड केलेल्या क्षेत्रात किमान चार ते पाच वर्षे पुन्हा आले लागवड केली जात नाही. आले पिकामध्ये पपई, झेंडू ही आंतरपिके घेतली जातात. त्यामुळे आले पिकाच्या दरांतील तफावतीमुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करणे शक्य होते. कुटुंबातील सदस्यांची शेतीकामांमध्ये मोलाची मदत होत असल्याचे जयवंत पाटील सांगतात.

Ginger Farming
Ginger Cultivation : आल्याच्या लागवडीस गती

लागवड तंत्रात केला बदल

पूर्वी आले पिकाची वाफा पद्धतीने लागवड केली जायची. त्यास पाटपाणी पद्धतीने सिंचन केले जात असे. त्यामुळे तुलनेने कमी म्हणजे एकरी २० ते २२ गाड्या (प्रतिगाडी ५०० किलो) आले उत्पादन मिळत होते.

जयवंत यांनी शेतीची जबाबदारी सांभाळल्यानंतर पूर्वीच्या पद्धतीत बदल करून गादीवाफा पद्धतीने लागवडीस सुरवात केली. सुरवातीला तीन-चार एकर क्षेत्रात मायक्रो स्प्रिंकलर बसवले. हळूहळू ठिबक सिंचनाचाही वापर वाढविला. सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रही वाढवत नेले. लागवड पद्धतीतील नियोजनात बदल करत पाटील यांनी आले पिकाचे एकरी उत्पादन दुप्पट केले आहे.

लागवड नियोजन

दरवर्षी साधारण १५ मे ते १० जून या कालावधीत आले लागवडीचे नियोजन केले जाते.

आले लागवडीमध्ये जमिनीची निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या शेतजमिनीची आवश्‍यकता असते. कारण शेतात पाणी साचून राहिल्यास उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेले कंद खराब होण्याची शक्यता असते. हीच बाब ध्यानात घेऊन आले लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली जाते. जेणेकरून पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल आणि पुढील संभाव्य नुकसान होण्यापासून रोखले जाईल.

लागवडीसाठी दरवर्षी नवीन बेणे वापरण्यावर अधिक भर दिला जातो. बेणे निवड करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध अनुभवी आले उत्पादक शेतकऱ्यांचे आले लागवडीचे प्लॉट पाहिले जातात. त्यातून लागवडीसाठी योग्य गुणधर्म असलेले निरोगी कंद लागवडीसाठी निवडले जातात.

एकदा आले लागवड केलेल्या क्षेत्रात किमान चार ते पाच वर्षे पुन्हा आले लागवड केली जात नाही. लागवडीसाठी पुन्हा नवीन क्षेत्राची निवड केली जाते. त्यानुसार लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्राला साधारण ६ महिने विश्रांती दिली जाते.

लागवडीपूर्वी किमान तीन महिने अगोदर शेतामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा लेंडीखत यापैकी जे उपलब्ध असेल त्याची मात्रा शेतामध्ये दिली जाते. साधारणपणे एकरी एकरी आठ ट्रॉली प्रमाणे शेणखताची मात्रा देण्यावर भर दिला जातो. शेणखताची मात्रा दिल्यानंतर शेतामध्ये रोटर फिरवला जातो. त्यामुळे दिलेली शेणखताची मात्रा शेतामध्ये पूर्णपणे मिसळण्यास मदत होते.

लागवड गादीवाफ्यावर करण्याचे नियोजित असते. त्यानुसार लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने गादीवाफे तयार केले जातात.साधारण साडेचार फुटांचे गादीवाफे तयार केले जातात. गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूस एक फूट अंतर राखून मधल्या जागेतील दोन ओळींमध्ये कंद लागवड केली जाते.

Ginger Farming
Ginger Farming : विक्रमी आले उत्पादनातील अमोल

लागवडीसाठी योग्य गुणधर्म असलेले, निरोगी आणि दर्जेदार उत्पादन असलेल्या आणि ३० ते ४० ग्रॅम वजनाच्या कंदाची निवड केली जाते.लागवडीपूर्वी कंदाना शिफारशीप्रमाणे रासायनिक आणि जैविक प्रक्रिया केली जाते.

यावर्षी साधारण ३ ते ५ जून या दरम्यान साधारण साडेचार एकरांमध्ये आले लागवडीचे काम पूर्ण केले आहे.

आले लागवडीवेळी रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जातात.

आल्याच्या दोन कंदात ९ ते १२ इंचांपर्यंत, तर दोन सऱ्यांमध्ये एक फूट अंतर राखले जाते.

पूर्वी चार फुटी बेडवर तीन ओळी आले

लागवड केली जायची. त्यामुळे एकरी कंद जास्त लागायचे. आता लागवड तंत्रात बदल केल्याने लागवडीसाठी लागणाऱ्या एकरी

कंदात बचत झाली आहे, असे जयवंतराव सांगतात.

आगामी नियोजन

सध्या आले लागवड होऊन साधारण १२ ते १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. लागवडीनंतर ८ दिवसांनी पहिली भर दिलेली आहे.

लागवडीनंतर साधारण दोन वेळा भर दिली जाते. दोन वेळा भर दिल्यामुळे पाट खोल होतात. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात शेतातील अतिरिक्त पाणी पाऊस पडल्यानंतर लगेच बाहेर काढणे शक्य होते. पाणी साचून न राहिल्यामुळे कंदकुजीचा धोका कमी होतो. तसेच भर दिल्यामुळे कंद उघडे पडत नाहीत. त्यामुळे पुढील संभाव्य धोका कमी होतो.

लागवडीनंतर साधारण १ महिन्यानंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने रासायनिक घटकांची आळवणी आणि फवारणी केली जाते. प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे कीड-रोगांचा नियंत्रण करणे शक्य होते.

ठिबकद्वारे नियमित वेळापत्रकानुसार खत व्यवस्थापन केले जाते.

आले पीक इतर पिकांच्या तुलनेत नाजूक असल्याने पिकाचे सातत्याने निरिक्षण करणे आवश्यक असते. त्यानुसार पीक व्यवस्थापन करणे सोयीचे होते.

आले पिकाची लागवडीपासून पहिले सहा महिने विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीला सुरवात झाल्यानंतर पिकावरील धोके कमी होतात.

जयवंत पाटील, ९०११८६५०६५.

(शब्दांकन : विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com