Butter Block Machine Developed : व्यावसायिक वापरासाठी उणे तापमानात गोठविण्यात आलेले २० ते २५ किलो वजनाचे बटर (लोणी) ब्लॉक वितळविणे हे आव्हानात्मक ठरते. ही बाब लक्षात घेऊन वरुड (ता. पुसद,जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत धोत्रे यांनी व्यावसायिक उपयोगासाठी खास यंत्र विकसित केले आहे.
दैनंदिन अनुभवानुसार बटरला आपण एक मऊ पदार्थ म्हणून ओळखतो, परंतु औद्योगिक निर्मितीमध्ये बटरचे प्रकार आणि गुणधर्म फार वेगळे असतात. याबाबत डॉ. अनंत धोत्रे म्हणाले की, डेअरी उद्योगात टेबल बटर थेट खाद्य पदार्थ म्हणून वापरले जाते. मात्र व्हाइट बटर उणे २३ अंश सेल्सिअस तापमानामध्ये गोठविलेल्या अवस्थेत २० ते २५ किलो ब्लॉकच्या स्वरूपात साठवले जाते.
अशाप्रकारे साठविल्यामुळे बटरचा नैसर्गिक ताजेपणा आणि पौष्टिकता एक वर्षापेक्षा अधिक काळ टिकवून ठेवणे शक्य होते. आवश्यकतेनुसार हे बटर ब्लॉक वितळवून तूप निर्मिती, दूध रेकॉम्बिनेशन, इत्यादी मध्ये वापर केला जातो. परंतु उणे तापमानामुळे हे बटर ब्लॉक दगडासारखे टणक झालेले असतात आणि ते अतिशय संथ गतीने वितळतात, ही दुग्ध व्यावसायिकांकरिता एक समस्या आहे.
दुग्ध व्यावसायिक हे बटर ब्लॉक वितळविण्यासाठी पारंपरिक पध्दतीचा वापर करतात. यामध्ये आधी बटरचे तापमान उणे २३ पासून ते १० अंश सेल्सिअसपर्यंत आणावे लागते. त्यानंतर बटर ब्लॉक्स एका पाइपच्या जाळीवर ठेवून पाइपमधून अतिउष्ण पाणी सोडले जाते. त्यामुळे पाइपवरील बटर वितळून इतर भाग गोळ्यांच्या स्वरूपात खाली एका टाकीत पडते आणि टाकीत पूर्ण बटर वितळते. या प्रक्रियेला देखील एक ते दीड तास लागतो. अशा प्रकारे गोठविलेले ब्लॉक ते वितळलेले बटर या पूर्ण प्रक्रियेला साधारणतः ८ ते १० तास लागतात. वेळेबरोबरच, ही प्रक्रिया जास्त श्रम आणि ऊर्जा खर्ची घालणारी आहे. तूपनिर्मितीमध्ये लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ६० टक्क्यांपेक्षा जास्त औष्णिक ऊर्जा गोठविलेले बटर ब्लॉक्स वितळविण्यात लागते. शिवाय ब्लॉक हाताळताना बटरचा दर्जाही खालावण्याची भीती असते.
...असे आहे नवीन यंत्र
बेंगळुरू येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेमध्ये डॉ. अनंत धोत्रे यांनी २०२२ मध्ये डॉ. मॅग्दालिन यांच्या सहकार्याने गोठविलेले बटर ब्लॉक कापण्यासाठी खास यंत्र निर्मितीचे संशोधन पूर्ण केले. यामुळे हे ब्लॉक्स सहज वितळविणे शक्य होते.
विविध तापमानावर बटरचे औष्णिक गुणधर्म मोजण्यात आले. आधुनिक संगणकीय प्रणाली वापरून बटर गरम होताना, कापले जाताना आणि वितळताना होणाऱ्या सूक्ष्म बाबींचा अभ्यास करण्यात आला.
बटर ब्लॉक्स कापण्याकरिता योग्य तापमान आणि वितळण्याचा कालावधी निश्चीत करण्यात आला. अभ्यासाअंती एक यंत्र विकसित झाले. त्यामध्ये एआयएसआय-३०४ ग्रेड गुणवत्तेचे स्टेनलेस स्टील वापरले आहे. यामध्ये असलेले ब्लेड विशिष्ट प्रमाणात तापतात. उच्च दाबाची हवा वापरून बटर ब्लॉक्स ब्लेडवर दाबले जातात. अशाप्रकारे कापण्याची प्रक्रिया होते.
बटरचे तापमान व टणकपणा यानुसार ब्लेडचे तापमान तसेच हवेचा दाब निश्चीत करण्याची सोय या यंत्रात आहे. विशेष म्हणजे बटर कितीही उणे तापमानात असले तरी त्याला नॉर्मल तापमानापर्यंत न आणता न करता थेट यंत्रात टाकून कापता येते. जेणेकरून त्यांची पुढील वितळण्याची प्रक्रिया जलद होते. वेळेबरच यामध्ये ऊर्जेची बचत होते, असे प्रयोगांती निदर्शनास आले आहे.
एक बटर ब्लॉक कापण्यासाठी लागणारा वेळ त्याच्या तापमानावर अवलंबून असतो. साधारणतः ५ ते १२ मिनिटात एक ब्लॉक कापला जातो.
या यंत्राची क्षमता किमान ५ बटर ब्लॉक प्रती तास किंवा २,०४० किलो बटर प्रति दिवस (२० तास) असा आहे. याचा निव्वळ व्यवस्थापन खर्च अंदाजे ५,५०९ रुपये प्रती दिवस म्हणजे २.७ रुपये प्रती किलो बटर असा आहे.
या संशोधनावर आधारित शोधनिबंधास भारतीय दुग्ध अभियांत्रिकी संघटना, भारतीय अन्न शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ संघटना, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार) तसेच श्री. वेंकटेश्वर पशू वैद्यकीय विद्यापीठ, तिरुपती यांच्याद्वारे विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
अनंत धोत्रे, ८५७१८०७२९६
(सहाय्यक प्राध्यापक, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, वरुड, पुसद,जि.यवतमाळ)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.