Exportable Grape : संकटांशी झुंजत संगीताताई झाल्या निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार

साकोरे मिग (ता. निफाड, जि. नाशिक) येथील संगीता बोरस्ते यांच्या पतीचे अकाली निधन झाले. पण त्यातून सावरत. हिमतीने प्रत्येक संकटाशी झुंजत कौटुंबिक प्रपंच, मुलांचे पालनपोषण यासह संगीताताईंनी द्राक्षशेतीचीही समर्थ जबाबदारी पेलली.
Grape
GrapeAgrowon

Nashik Grape Story : नाशिक जिल्ह्यात साकोरे मिग (ता. निफाड) येथील द्राक्ष उत्पादक (Grape Producer) असलेल्या बोरस्ते कुटुंबातील अरुण बँकिंग क्षेत्रात नोकरीला होते. शेतीच्या वाटण्या झाल्यानंतर अरुण व संगीता या बोरस्ते दांपत्याच्या वाट्यास १० एकर शेती आली. अरुण यांनी बँकेची नोकरी सोडून पूर्णवेळ शेती (farming) करण्याचा निर्णय घेतला.

पुरेसे भांडवल नसल्याने अर्थसाह्य घेत पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते प्रयोगशीलतेने राबत होते. तीन मुली आणि एक मुलगा अशी सुखी संसाराची वेलही बहरली होती. अरुण शेतीत तर संगीता गृहिणी म्हणून जबाबदारी पाहत होत्या.

काळाची दृष्ट लागली

सन २०१४ द्राक्ष हंगामात (Grape Season) कामांची लगबग सुरू असतानाच या सुखी संसाराला काळाची दृष्ट लागली. नुकतीच गोडी बहर छाटणी झाली होती. ऐन नवरात्रीत चौथ्या माळेला रक्तदाब कमी होऊन अरुण यांचे अकाली निधन झाले. परिवारावर मोठा आघात झाला. त्यानंतर कुटुंब, शेती आणि चारही लेकरांच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी संगीताताईंच्या खांद्यावर पडली.

भोवताली सारा अंधारच दिसत होता. पूर्णपणे खचून जाण्याचीच अवस्था होता. जवळपास २५ लाखांचे शेतीकर्ज होते. पण शेतीशिवाय दुसरा पर्यायही समोर नव्हता. संसाराचा गाडा आपल्यालाच हाकावा लागणार, त्यामुळे रडून चालणार नाही. तर समर्थपणे उभे राहून लढावेच लागेल ही खूणगाठ संगीताताईंनी बांधली. शेतीची जबाबदारी घेत त्या

संघर्षाच्या मैदानातच उतरल्या. त्यानंतर गेल्या नऊ वर्षांत धैर्याने प्रत्येक संकटावर मात करत निर्यातक्षम द्राक्ष शेतीचा आदर्श त्यांनी उभा केला आहे. दुःखाने भरलेल्या आयुष्यात त्यांनी ‘सबला’ म्हणून यशाची कहाणीच जणू आपल्या कर्तृत्वाने लिहिली आहे.

Grape
Grape Farming : द्राक्ष शेतीसमोर दराचे अभूतपूर्व संकट

समजून घेतली द्राक्ष शेती

पूर्वी गृहिणी असल्याने द्राक्षशेतीचे कामकाज पाहण्याची तशी गरज भासली नव्हती. पण परिस्थिती बदलल्यानंतर कुटुंबाचा गाडा सर्वार्थाने पुढे नेण्यासाठी शेती व्यवस्थापनाचा प्रत्येक धडा समजून घेत त्यावर लक्ष केंद्रित केले.

कितीही कष्ट पडले तरी ते सोसायचे, मुलांचे भविष्य घडवायचे असा पण घेतला. भांडवल हे मोठे आव्हान समोर होते. पण दैवयोग म्हणावा की काय, पतीच्या निधनानंतर जीवन सुरक्षा विम्यापोटी १८ लाखांचा परतावा मिळाला. त्यातून भांडवल उभे राहिले.

पुतण्या सचिन द्राक्षशेतीत धावून आला. गरजेनुसार तज्ज्ञ सल्लागारांची मदतही घेतली. त्यातूनच थॉमसन व तास-ए -गणेश या वाणांचे यशस्वी उत्पादन घेत बाजारपेठाही मिळविल्या. आता आत्मविश्‍वास वाढला.

...अशी आहे संगीताताईंची शेती

-आठ एकर संपूर्ण बागायती क्षेत्र. त्यात सहा एकर थॉमसन, तर दोन एकर तास-ए- गणेश वाण.

-सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान गोड्या छाटणीचे नियोजन.

-केवळ एकरी उत्पादन वाढविण्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर.

-हवामानाचा अंदाज घेऊन व्यवस्थापन असल्याने गुणवत्तेत सातत्य. त्यामुळे चांगल्या दरांचा फायदा मिळतो.

-अडीच लाख रुपये एकरी खर्च.

व्यवस्थापन, तंत्रज्ञान

-पान, देठ, माती परीक्षणाद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन.

-सिंचन स्रोत बळकटीसाठी एक कूपनलिका,दोन विहिरी, गरज पडल्यास पालखेड उजवा कालवा आवर्तनाचा पर्याय. केंद्रीकृत ठिबक सिंचन यंत्रणा.

-भारनियमन असल्याने कृषी पंपासाठी सौरउर्जेचा वापर

-हवामान अंदाज व फवारणीसंबधित तांत्रिक माहितीठी फार्मसेतू ॲपचा वापर.

-काढणीपश्‍चात हाताळणी व प्रतवारीसाठी पॅकहाउस.

-मजूर निवास, खते व कीडनाशके साठवणुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था

-मातीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढीसाठी मल्चिंग वापर व आळवणीसाठी जिवामृत वापर.

Grape
Grape Market : दहा लाखांच्या द्राक्षांची परस्पर विक्री

उत्पादन प्रातिनिधिक (एकरी)

वर्ष... थॉमसन...तास-ए गणेश

२०२२...१२...११

२०२१...११....१०

२०२०...८...११

मिळालेले दर (प्रति किलो)

वर्ष... स्थानिक... निर्यात

२०२२...२५ ते ३०...५० ते ६०

२०२१...२० ते २५...४५ ते ५०

२०२०...१५ ते १८...३० ते ४०

-एकूण उत्पादनाच्या ७० टक्के निर्यात, तर ३० टक्के देशांतर्गत विक्री

- ‘रेसिड्यू फ्री’ तसेच आकार, गोडी, चकाकी असल्याने सफेद वाणांना मागणी

-मोहाडी (नाशिक) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या भागधारक असल्याने विक्री तुलनेत जोखीम कमी

संकटांशी केले दोन हात

संगीताताईंचे वैशिष्ट्य म्हणजे खरड व गोडी छाटणी, फवारणी, स्वतः ट्रॅक्टर चालवणे, काढणी ते विक्री अशी सर्व कामे त्या स्वतः हाताळतात. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये फवारणी यंत्र, ट्रॅक्टर, रासायनिकसह जैविक पद्धतींचा अवलंब यासह नवे प्रयोग करण्यामध्ये त्या आघाडीवर असतात.

पाच अश्‍वशक्ती क्षमतेचे सौर पॅनेल कार्यान्वित केल्याने गरजेनुसार सिंचन करण्यासह रात्री अपरात्री शेताला पाणी होणारी त्यांची परवड आता थांबली आहे. आलेल्या संकटांना पायदळी तुडवत हिमतीने त्यांची वाटचाल सुरू आहे. म्हणूनच घेतलेले कर्ज फेडून ऋणमुक्त झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकते.

एकेकाळी जीवन अंधारमय झाले होते. केवळ मजुरांच्या भरवशावर शेती करणे आव्हानात्मक होते. पण निर्धार करत संगीताताईंनी आपल्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी घेतली. सन २०१९ मध्ये दिवाळीच्या काळात फवारणी गरजेची होते.

अशावेळी रात्री नऊ वाजेपर्यंत बागतेच राबायालही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. कोरोना संकटातही अनेक समस्या भेडसावल्या. पण लढायचं आणि पुढे जायचं हाच मूलमंत्र जपला.

Grape
Vineyard Management : वाढत्या उष्णतेचे द्राक्ष बागेवर काय परिणाम होतील?

आदर्श मायमाउली

मोठी मुलगी स्नेहल ‘कॉम्प्युटर इंजिनिअर’, मधली कोमल सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील तर धाकटी प्रतीक्षा ‘आर्ट’ शाखेतून ‘पोस्ट ग्रॅज्युएट’ झाली आहे. संगीताताईंनी आदर्श शेतकरी कुटुंबात दोन मुलींचा विवाह लावून देण्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पेलली आहे.

मुलगा ओंकार ‘कॉम्प्युटर सायन्स’ विषयातील शिक्षण आहे. पती अरुण यांच्या स्मरणार्थ ‘अरुणोदय’ नावाने टुमदार बंगलाही बांधला आहे. तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यास शेती सुलभतेने करता येते आणि संघर्षातून पुढे जाता येते, असे संगीताताई आवर्जून सांगतात.

संपर्क : संगीता बोरस्ते, ७०६६३००७३५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com