
अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : राज्यातील द्राक्ष हंगाम (Grape Season) निम्म्यावर आला आहे. मात्र द्राक्ष शेतीसमोर (Grape Farming) या वर्षी दराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे.
अद्यापही दर वाढत नसल्याने द्राक्ष उत्पादक (Grape Producer) शेतकरी हवालदिल झाले आहेत. एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी प्रति किलो सुमारे २५ ते ३० रुपये इतका खर्च येत असून, सध्या द्राक्षाला प्रति किलो ३० रुपये दर (Grape Rate) मिळत आहे.
त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे.
राज्यात द्राक्षाचे सुमारे ५ ते साडेपाच लाख एकर क्षेत्र आहे. सलग दोन वर्ष कोरोनामुळे फटका बसला. तर गेल्या वर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतीवर अतिवृष्टीचे संकट ओढावले होते.
यामुळे द्राक्षाचे पन्नास टक्के नुकसान झाले होते. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.
यंदा द्राक्ष हंगामाच्या फळछाटणीपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळ छाटणी पुढे ढकलली. यामुळे द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाला.
सुरुवातीला द्राक्षाचा चांगला दर मिळाला. वाढत्या थंडीमुळे द्राक्षाचा रंग आणि गोडी वाढली नाही. त्यातच देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाला मागणी हळूहळू वाढू लागली.
मात्र जानेवारीमध्ये उत्तर भारतात थंडी वाढली आणि द्राक्षाची मागणी घटली. बाजारात द्राक्षाचा उठाव कमी होऊ लागला.
दरम्यान, या वर्षी द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून द्राक्ष दरात प्रचंड घसरण झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी मिळणारे दर आता मिळत असल्याचे अभूतपूर्व चित्र उभे राहिले आहे.
वास्तविक पाहता फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानंतर द्राक्षाच्या दर सुधारतील, असे वाटत होते, मात्र दोन महिने झाले तरीही दरात सुधारणा होताना दिसत नाही.
गेल्या वर्षी दर्जेदार द्राक्षांना प्रति किलोस ६३ रुपये असा दर मिळत होता, त्या द्राक्षांना सध्या प्रति किलोस ३० रुपये दर मिळत आहे.
एकूणच द्राक्ष दरातील घसरणीने द्राक्ष शेतकरी अक्षरशः हादरले आहेत. सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने या आगळ्या संकटातून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
खते, कीटकनाशकांचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी, पीककर्जाचे हप्ते यांचा मेळही बसू शकत नाही इतके दर कोसळण्याचा पहिलाच प्रकार या वर्षी पाहावयास मिळत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. यामुळे द्राक्षामध्ये गोडी निर्माण झाली असून, देशांतर्गत बाजारपेठेमध्ये मागणीही वाढली आहे. द्राक्षाचा उठाव होत आहे.
कोट ---
राज्यातील द्राक्ष हंगाम निम्मा झाला आहे. या वर्षी हंगामाच्या प्रारंभापासून द्राक्षाचे दर कमी आहे. उत्पादन खर्चही निघणे मुश्किल आहे.
- चंद्रकांत लांडगे, माजी विभागीय अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.