डॉ. सुरेंद्र पाटील, नरेंद्र रामटेके
----------------------
संत्रा कलमांची लागवड पावसाळा सुरू होताना करणे उत्तम असते. एक पाऊस पडून गेल्यानंतर आणि पुढे ढगाळ हवामानाचा काळ सुरू झाल्यानंतर संत्रा कलमांची लागवड करावी. पावसाळा संपताना किंवा संपून गेल्यानंतर लागवड करणे टाळावे. त्या दृष्टीने मध्य जुलैपर्यंतचा काळ लागवडीसाठी (Orange Cultivation) चांगला असतो.
कलमांची निवड ः
- योग्य खुंट व योग्य प्रकारचा डोळा यांच्या खात्रीसाठी कलमे कृषी विद्यापीठ, शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतूनच घ्याव्यात.
- कलमे निरोगी, जास्त उत्पादन व दर्जेदार फळे देणाऱ्या मातृ वृक्षाचे डोळे वापरूनच तयार केलेली असावीत.
- संत्र्याच्या कलमा किकरपानी, वेलिया किंवा पानसोट असलेल्या मातृ वृक्षापासून तयार केलेली नसावीत.
- कलमांची निवड करताना संत्र्याचा डोळा कोणत्या खुंटावर बांधलेला आहे हे पाहावे. कारण खुंटाचा, झाडाची शारीरिक वाढ, फळधारणाशक्ती, फळांचे गुणधर्म आणि झाडाचे आयुष्य यावर परिणाम पडत असतो.
- कलमे रोगप्रतिकारक्षम खुंटावर तयार केलेली असावीत.
- हलक्या व मध्यम जमिनीसाठी जबेरी तर भारी जमिनीसाठी रंगपूर लिंबू या खुंटावरील कलमांची निवड करावी.
- जबेरी किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर २५ ते ३० सेंमी उंचीवर बांधलेल्या कलमा निवडाव्यात. कमी उंचीवर बांधणी केलेल्या कलमा मातीच्या आणि पाण्याच्या संपर्कात येऊन बुरशीजन्य रोगास बळी पडतात.
- कलमांचे फाटे परिपक्व झालेले असणे आवश्यक आहे. फाट्यावर पांढऱ्या बारीक रेषा असल्या तर फाटे परिपक्व झाले असे समजावे.
- साधारण ४५ ते ६० सेंमीपर्यंत सरळ वाढलेल्या कलमा चांगल्या असतात. अति उंच कलमा लागवडीसाठी वापरू नयेत. त्या कलमा वेलीया प्रकारच्या असण्याची शक्यता असते.
- कलमांवर पाने पोखरणारी किंवा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नसावा. तसेच कलम रोगमुक्त असावे.
- जुन्या झालेल्या खुंटावरील कलमे लागवडीस योग्य नसतात. साधारणतः एक वर्षे वयाची कलम लागवडीसाठी निवडावी.
- कलमांना भरपूर मुळे (जाळवा) असावीत. कलमांच्या खोडावर इतर फूट नसावी.
- डोळ्यांचा सांधा चांगला भरलेला, जखम व व्रणरहित असावा.
लागवड करताना घ्यावयाची काळजी ः
- जमिनीतून कलमे काढताना आदल्या दिवशी त्यास भरपूर पाणी द्यावे. ढगाळ वातावरण असताना कलमा रोपवाटिकेतून काढणे फायदेशीर असते.
- कलमे काढताना तंतुमय मुळांना कमीत कमी इजा होईल याची काळजी घ्यावी. शक्यतो कलमे ‘डिगिंग फॉर्क’ने काढाव्यात. कलमा सबलीने काढू नयेत. सबलीने कलमा काढल्यामुळे सोटमूळ आणि तंतुमय मुळे तुटण्याची शक्यता असते.
- कलमा काढल्यानंतर सोट मुळाचा शेवटचा भाग आणि इजा झालेली मुळे सिकेटरने काळजीपूर्वक छाटून टाकावीत.
- कलमांची शेंड्याकडील कोवळी पानेसुद्धा काढून टाकावीत. फक्त परिपक्व पाने ठेवावीत. मुळांची संख्या आणि पानांच्या संख्येचे योग्य प्रमाण असावे. कारण काढणीच्या वेळी काही मुळ्या तुटतात. सर्व पाने ठेवली गेल्यास त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही. परिणामी रोपे दगावण्याचा धोका जास्त असतो.
- पॅकिंग करताना कलमांच्या मुळांना इजा होऊ न देता ओल्या मातीत गुंडाळून सभोवती तरटाने घट्ट बांधून तो भाग पाण्याने ओला करावा. त्यानंतर लागवडीच्या जागी लवकरात लवकर कलम आणावीत.
- कलमा लागवडीपूर्वी सावलीत ठेवाव्यात. पॅकिंगच्या मुळाचा भाग थोडा वेळ पाण्यात बुडवून काढावा किंवा त्यावर पाणी शिंपडावे.
- कलम जमिनीत लावण्यापूर्वी त्यांची मुळे ३ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लावावीत.
- कलमा लागवडीपूर्वी खड्डे शेणखत अधिक माती (२:१) आणि २ किलो सिंगल सुपर फॉस्फेटने भरून ठेवलेले असावेत. कलमे खड्ड्याच्या मध्यभागी जमिनीत लावावीत.
- कलम लावताना मुळे स्वाभाविक अवस्थेमध्ये ठेवावीत. नंतर मुळांचा मातीबरोबर घनिष्ठ संबंध यावा यासाठी माती घट्ट दाबावी.
- कलमांच्या डोळ्याचा भाग जमिनीत दबणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक कलमांचा डोळ्याचा सांधा जमिनीपासून २० सेंमी उंचीवर राहील अशा पद्धतीनेच कलमांची लागवड करावी. तसेच डोळे फांदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने राहील याची काळजी लागवडीच्या वेळी घ्यावी.
- लागवडीच्या वेळी कलमे एका ओळीत येण्यासाठी झाडे लावण्याचा तक्त्याचा वापर करावा.
- लागवड शक्यतो रिमझिम पाऊस सुरू असताना करावी.
- लागवड पूर्ण झाल्यानंतर पाऊस न आल्यास लगेच पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर प्रत्येक कलमाच्या चहूबाजूंनी माती घट्ट दाबून घ्यावी.
- कलमांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा.
- पाऊस नसल्यास दर तीन दिवसांनी कलमांना पाणी द्यावे.
- कलमांना नवीन जोमदार फुटवे आल्यावरच रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
----------------------------
- डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७ ३५३५३
(फळशास्त्र विभाग, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.