Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्राचा राज्यभर होतोय प्रसार

Farming Update : दैनिक ‘ॲग्रोवन’च्या १० एप्रिल २०२४ च्या अंकात अग्रलेखामध्ये विना नांगरणी शून्य मशागत तंत्रज्ञानाची दखल घेतली गेली.
Zero Tillage Farming
Zero Tillage FarmingAgrowon

Indian Agriculture : दैनिक ‘ॲग्रोवन’च्या १० एप्रिल २०२४ च्या अंकात अग्रलेखामध्ये विना नांगरणी शून्य मशागत तंत्रज्ञानाची दखल घेतली गेली, याचा परिणाम आम्ही शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

विना नांगरणी शून्य मशागत हे तंत्रज्ञान मागील पाच वर्षांपासून प्रकर्षाने खऱ्या अर्थाने शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचले जाऊ लागले. मी मागील पाच वर्षांपासून कापूस, तूर आणि रब्बी ज्वारी या पिकांत या तंत्राचा वापर करतो.

सुरुवातीच्या वर्षात तंत्रज्ञानाबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे भीती वाटत होती. कारण वर्षानुवर्षे आम्हा शेतकरी मित्रांच्यावर खोल नांगरट उभ्या आडव्या पाळ्या आणि तणमुक्त शेत हा विचार बिंबवला गेला. परंतु जसजसे शून्य मशागत तंत्राचे फायदे दिसू लागले तसतसे या तंत्राचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.

Zero Tillage Farming
Zero Tillage Farming : अमेरिकेतील कृषी शास्त्रज्ञांनी केली भोर येथील शेतीची पाहणी

महाराष्ट्रातील ८० टक्के कोरडवाहू क्षेत्रात याचा वापर वाढणे गरजेच आहे. कारण सध्या ही कोरडवाहू शेतीच धोक्यात येत चालली आहे. मी माझ्या कापूस, तूर पिकांत या तंत्राच्या अवलंबनास सुरुवात केल्यानंतर चौथ्या वर्षी माझा रासायनिक खतावरील खर्च ५० टक्के कमी झाला.

त्याचबरोबर नांगरणी, वखरणी, फवारणी यावरील खर्चही कमी झाला. त्याच वेळी पारंपरिक पद्धतीने जे शेतकरी कापूस उत्पादन करतात त्यांच्या बरोबरीत माझे उत्पादन राहिले आहे. तसेच तण व्यवस्थापनामुळे पिकावरील किडींसाठी मारण्यात येणाऱ्या औषधांचा खर्चही ५० टक्के कमी झाला आहे. मावा ही प्रमुख कीड कापूस पिकातून हद्दपार झाली आहे. आज

कापूस उत्पादक शेतकरी बोंड अळी पेक्षा रसशोषक किडींच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त आहेत. शून्य मशागत तंत्रातील तण व्यवस्थापनामुळे या किडींचे प्रमाण कमी झाले आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा परिणाम आपण बघत आहोतच. कमी वेळात जास्त पाऊस, असे पावसाचे असमान वितरण वाढत आहे.

याचा प्रतिकूल परिणाम खोल नांगरणी आणि जास्त मशागत केलेल्या क्षेत्रावर प्रकर्षाने जाणवतोय. माझ्या गटात माझी शेती विना नांगरणी आणि शेजारी मित्राचे क्षेत्र हे पारंपरिक नांगरणी आणि वखर पाळ्या या पद्धतीचे होते. माझ्या विना नांगरणी च्या क्षेत्रात ७० मि.मी. पाऊस झाला असताना पाण्याचा एक थेंब कुठेही साचला नाही.

या उलट पारंपरिक पद्धतीने कापूस पीक केलेल्या क्षेत्रात वळणाला पाणी येऊन तुंबले, हा दृश्य परिणाम मी अनुभवला आहे. अतिवृष्टीत माझ्या शेतातील मातीचा एकही कण बाहेर गेलेला नाही. याउलट पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या पिकातून दरवर्षी हजारो टन माती वाहून जाऊन धरणांत साठत आहे. त्यामुळे धरणांची जलधारण क्षमता कमी होत आहे. म्हणजे शासनाने खर्च केलेला पैसा पाण्यात जात आहे.

Zero Tillage Farming
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राने फळबाग यशस्वी केलेले शिक्षक

विना नांगरणी तंत्रज्ञान वापर करीत असलेल्या शेतात तुम्ही चप्पल बूट न घालता फिरले तरी पायाला त्रास होत नाही. जास्त खोल नांगरणी आणि अति मशागतीमुळे मातीच्या कणाची रचना बदलत चालली आहे. या कणाची जलधारण क्षमता कमी होत आहे. शून्य मशागतीतील तण व्यवस्थापनाने तण वाळल्यानंतर जमीन सच्छिद्र होते.

अशा जमिनीत पिकांची वाढ चांगली होत असल्याचे दिसून येते. जमिनीत आपल्या नजरेला न दिसणारे जिवाणू हे आपल्या पिकांना दिलेल्या निविष्ठा पोहोचविण्याचे काम करतात त्यांचे खाद्य म्हणजे पिकांचे किंवा तणांचे जमिनीतील अवशेष हे आहेत. असे अनेक फायदे या तंत्रापासून मिळतात. त्यामुळे शून्य मशागत तंत्राबाबत प्रत्येक शेतकऱ्याने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

कापूस, तूर आणि ज्वारी या प्रमाणेच राज्यातील अनेक शेतकरी विनानांगरणी शून्य मशागत या तंत्रज्ञानाचा वापर मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, सीताफळ या विविध पिकांत करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांतील अनेक शेतकरी मोसंबी पिकात या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.

मागील काही वर्षांपासून ज्या मोसंबी बागेत विनानांगरणी तंत्रज्ञानाचा वापर झाला त्या बागेत फळगळीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. हा ही एक अभ्यासाचा विषय आहे. मागील सात वर्षांपासून तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील काही शेतकरी आपल्या जमिनीतील कोणताच जैविक अवशेष शेताबाहेर टाकत नाहीत, तर ते जागेवरच जिरवतात. हे शेतकरी युरोपात आपली द्राक्षे रसायन अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) या तत्त्वावर निर्यात करीत आहेत.

पैठण तालुक्यातील तुपेवाडी येथील शेतकरी शून्य मशागत तंत्रज्ञान आपल्या डाळिंबाच्या बागेत मागील सहा वर्षांपासून वापरत आहेत. आणि ते शेतकरीही परदेशात डाळिंबाची निर्यात करीत आहेत. आंबा पिकात सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शून्य मशागत तंत्रज्ञानाचे फायदे अनेक आहेत. तुमचा उत्पादनावरचा खर्च जवळपास २० ते २५ टक्के कमी होत चालला आहे. उत्पादित मालाचा दर्जा सुधारत आहे. त्यामुळे बहुगुणी अशा शून्य मशागत तंत्राचा प्रचार आणि प्रसार वाढणे गरजेचे आहे तरच नवीन युवा पिढी शेती करण्यास तयार होईल. युवकांना हे तंत्रज्ञान आपल्यासाठी कसे उपयोगाचे आहे, हेही समजून सांगावे लागेल.

दीपक जोशी,

जय जवान जय किसान शेतकरी मंडळ, देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com