Leenseed Farming: पूर्व विदर्भात जवसाचे पुनरुज्जीवन

Eastern Vidarbha Agriculture: कृषी महाविद्यालय, नागपूर येथील जवस संशोधन प्रकल्पांतर्गत पूर्व विदर्भात लागवड ते तेलनिर्मितीपर्यंत जवसाची मूल्यवर्धित साखळी विकसित करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी सुधारित लागवड तंत्रज्ञान पुरवण्यात आले.
 Vidarbha Agriculture
Vidarbha AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. स्वप्‍नील ठाकरे, डॉ. बीना नायर

Agriculture Technology: पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत धान (भात) काढणीनंतरकाही लाख हेक्टर क्षेत्र रब्बीत पडीक राहते. पूर्वी धान काढणीनंतर जवस, लाखोळी आदींची पारंपरिक पद्धतीने लागवड व्हायची. मध्यंतरीच्या काळात बदलत्या पीक पद्धतीमुळे जवस जवळपास नामशेष झाले होते. दैनंदिन आहारात त्याच्या तेलाचा वापर कमी झाला होता.

याच पिकाला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था (पुनरुज्जीवन) देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत अखिल भारतीय समन्वित जवस संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर यांनी पुढाकार घेतला. यात तंत्रज्ञान वापर व क्षेत्रवाढ अशी उद्दिष्टे ठेवली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, जवस पैदासकार डॉ. बीना नायर यांच्या मार्गदर्शनातून जवस कृषी विद्यावेत्ता डॉ. स्वप्‍नील ठाकरे यांनी प्रकल्प राबवला.

राबविलेले तंत्रज्ञान- ठळक बाबी

धान काढणीनंतर जमिनीत २५- ३० टक्के ओलावा असतो. त्याचा विचार जवस लागवड तंत्रज्ञानात केला. पाच वर्षांपासून पीक प्रात्यक्षिके घेण्यात येऊन त्यांची संख्या ३३५ पर्यंत पोहोचली. चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, अन्य कृषी अधिकारी, मेळावे, दूरचित्रवाणी, प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार.

पूर्वी शेतकरी हेक्टरी २५ किलो बियाणे वापरत. ॲग्रेस्को बैठकीतील शिफारशीनुसार हा वापर १५ किलो करण्याची शिफारस. त्यामुळे हेक्टरी १२०० रुपयांपर्यंत बियाणे खर्चात बचत होऊ लागली. प्रथम रेषीय प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत डोमा, किटाडी, डोंगरगाव, आंबोली, शंकरपूर या गावांतील १३० शेतकऱ्यांकडे जवसाच्या पीकेव्ही एनएल २६० वाणाची प्रात्यक्षिके. यात कृषी पर्यवेक्षक भास्कर फरकाडे यांचे सहकार्य.

 Vidarbha Agriculture
Agriculture Technology : कापूस वेचणी यंत्रांवर सुरू असलेले संशोधन

पूर्व विदर्भात लवकर, मध्यम आणि उशिरा कालावधीच्या अशा विविध धानवाणांची लागवड होते. यात कापणीनंतर मशागतीय कामांमुळे जवस पेरणीस उशीर होतो. त्यामुळे गादमाशीचा प्रादुर्भाव पिकाची होऊन उत्पादकता कमी होते. त्यावर उपाय म्हणून भात- जवस पद्धतीत शून्य मशागत तंत्रज्ञान व त्याच्या यंत्राचा (Zero Till Seed drill) अवलंब (विशेषतः चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात) सुरू झाला.

सिंचनाचा अभाव व लहान आकाराच्या जमिनीसाठी त्याचा वापर फायदेशीर ठरतो आहे. जितेंद्र गबणे (शिवणी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) यांनी २०२२-२३ मध्ये शून्य मशागत तंत्राधारे एक एकरात जवस पेरणी केली. त्या प्रेरणेतून २०२३-२४ मध्ये याच गावात या तंत्रावर आधारित २५ प्रात्यक्षिके घेण्यासाठी चालना मिळाली.

प्रकल्पाची फलश्रुती

चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतील भात काढणीपश्‍चात पड क्षेत्रात रब्बी जवस क्षेत्रात २२ टक्के वाढ. त्यातून शेतकऱ्यांना रब्बीत मिळाला सक्षम पर्याय.

सन २०२१-२२ मध्ये जवसाखालील ४८४७ हेक्टर क्षेत्र २०२३-२४ मध्ये ६६७६ हेक्टरपर्यंत पोहोचले.

सन २०२३-२४ मध्ये चिमूर भागात (जि. चंद्रपूर) सुमारे सातशे एकरांत लागवड.

शेतकऱ्यांकडून जवस तेलाचा वापर दैनंदिन आहारात वाढला.

 Vidarbha Agriculture
Leenseed Cultivation : आरोग्यदायी जवस पिकाची लागवड

उत्पादकतेत १५.७२ टक्के वाढ.. पूर्वी हेक्टरी

२६४.४ किलो असलेले उत्पादन ४५७.७ किलोपर्यंत वाढले.

शून्य मशागत पेरणी यंत्राच्या वापरातून मशागतीय खर्चात १३ टक्के तसेच मानवी श्रमातही बचत.

सिंदेवाही तालुक्यातील शिवनी येथे या तंत्रज्ञानाधारे २५ एकरांत जवस पेरणी. सोबतच जमिनीत उपलब्ध ओलाव्याचा पुरेपूर वापर केल्याने लागवड खर्चात बचत. उत्पादनवाढीस मिळाली चालना.

बीड, सातारा यासह विदर्भातील नऊ जिल्ह्यात मिळून एकूण ९१० प्रात्यक्षिके. संपूर्ण ‘पॅकेज’ च्या सुधारित तंत्रज्ञानातून उत्पादनात २८ टक्के वाढ तर हेक्टरी ५६०० रुपये अतिरिक्त नफा.

दुभत्या जनावरे, कुक्कुटपालनासाठी जवस ढेप वापरल्यामुळे दूध व अंडी गुणवत्तेच्या वाढीस चालना.

तेलनिर्मितीस चालना

भांडारबोंडी (ता. रामटेक, जि. नागपूर) येथील रामसागर शेतकरी उत्पादक कंपनीसाठीही पीक प्रात्यक्षिक देण्यात आले. या भागात तेलनिर्मितीला असलेली संधी लक्षात घेऊन या कंपनीला पाच लाख रुपये किमतीची तेलघाणी जवस संशोधन प्रकल्प व भारतीय तेलबिया संशोधन प्रकल्प, हैदराबाद, यांच्याकडून योजनेतून देण्यात आली. एक लाख रुपये किमतीचे शून्य मशागत पेरणी यंत्र बिरसा मुंडा कृषक गटाला (डोमा, ता. चिमूर) देण्यात आले.

शंकरपूर (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथील तिलक करकाडे हे तेलघाणी उद्योजक आहेत. ते २०२२-२३ पासून ते जवस संशोधन प्रकल्पातील तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. तेलघाणी सुरू झाल्यानंतर त्यांचा सामाजिक-आर्थिक दर्जा वाढला आहे. शेतकऱ्यांकडून जवस खरेदी करून त्याच्या तेलाची विक्री २३० रुपये प्रति किलो दराने ते गावात आणि नागपूर शहरात करतात. त्यातून स्वतःचे उत्पन्न त्यांनी वाढवले आहे. फेब्रुवारी, २०२३ मध्ये जवस शेती दिनाला १०० शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी करकाडे यांनी तेलनिर्मितीसाठी प्रतवारीनुसार पाच हजारांपासून ते सात हजार रुपये प्रति किलोप्रमाणे शेतकऱ्यांकडून जवस खरेदी करण्याची तयारी दर्शवून काही खरेदीही केली.

अरुण नरुळे हे नागभीड (जि. चंद्रपूर) येथील प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांनी तेलगिरणी उभारल्यानंतर परिसरात जवसाचे क्षेत्र वाढले आहे. आता तेही परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करून तेलनिर्मिती करतात. नागपूर येथील ग्राहकांना विकतात.

डॉ. स्वप्‍नील ठाकरे ९०११७७८१४७

(लेखक अखिल भारतीय समन्वित जवस संशोधन प्रकल्पात कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com