Agriculture Technology : तंत्रशुद्ध व्यवस्थापनामुळेच दर्जेदार केसर आंब्याची शेती

Article by Santosh Munde : सहाजापूर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील उन्मेष शिंदे यांनी बागेत विविध प्रयोग करून केसर आंब्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याच्या दृष्टीने तंत्रशुद्ध शेती विकसित केली आहे.
Kesar Mango
Kesar MangoAgrowon
Published on
Updated on

Technical Management of Mango Farming : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहाजापूर शिवारात उन्मेष ओमप्रकाश शिंदे यांची वडिलोपार्जित २७ एकर शेती आहे. पैकी दोन एकर शेती राज्य महामार्गात गेली. केशर आंबा हे त्यांचे मुख्य पीक १० एकरांत आहे. त्यात आल्याचे आंतरपीक ते घेतात. दहा एकर चिंच असून, त्यात चंदनाच्या एक हजार झाडांची लागवड आहे.

केसर आंब्यातील प्रयोग

केसर आंब्याच्या झाडांना सुमारे २०- २२ वर्षे झाली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यातील ३०० झाडांमधील अंतर ३० बाय ३० फूट होते. पुढील १५०० झाडांच्या लागवडीत ते १५ बाय १५ फूट केले. अलीकडे ४५०० झाडांमध्ये १५ बाय ७, ५ व ३ फूट असे सघन पद्धतीचे प्रयोग केले आहेत. जैविक व सेंद्रिय खतांवर त्यांचा विशेष भर असतो. सध्याच्या वयाची झाडे पाहता वर्षातून दोन वेळा प्रति झाड १४० किलोपर्यंत कंपोस्ट खत ते देत आहेत. पावसापूर्वी जूनमध्ये एकदा व पाऊस संपल्यानंतर दुसऱ्यांदा वापर होतो.

पाणी व्यवस्थापन

पाण्याची शाश्‍वत व्यवस्था करण्यासाठी तीसगाव धरणातून पाइपलाइन केली आहे. दोन विहिरी, दोन बोअरवेल्स व सौरऊर्जेवरील पंप बसविला आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबकवर आहे. आंब्याला पाच टक्क्यापर्यंत मोहर लाडला की पाणी देणे सुरू केले जाते. फळ नसताना १० ते १२ लिटर प्रति झाड तर फळाचा आकार वाढत जाईल तसे १०० ते १२५ लिटर प्रति झाड पाणी देण्यात येते. तळ्यातून शेतातील विहिरीपर्यंत पाणी पोहोचविण्याची सर्व सूत्रे मोबाइलवरून हाताळली जातात.

मल्चिंगचे प्रयोग

बागेत मल्चिंगच्या तीन पद्धतींचे प्रयोग केले आहेत. पहिल्या पद्धतीत गवत, पीक व तणांचे अवशेष यांचा वापर केला आहे. दुसऱ्या पद्धतीत जुने बारदान वा पोते यांचे मल्चिंग केले आहे. तर तिसऱ्या पद्धतीत ‘वीड मॅट’चा वापर केला आहे. या पद्धतींमुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळता आले. तणांचा त्रास कमी करता आला.

Kesar Mango
Kesar Mango Management : केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

कमी खर्चात फर्टिगेशन

शिंदे सांगतात, की स्वयंचलित ठिबक सिंचन सर्वच शेतकऱ्यांना परवडते असे नाही. त्यासाठी सात ते आठ लाख रुपये खर्च होतो. तो कमी करण्यासाठी म्हणजे विद्राव्य खते देण्यासाठी (फर्टिगेशन) शंभर ते दोनशे रूपयांत सोपे तंत्र वापरले आहे. यात विहिरीजवळ दोन हजार लिटरची टाकी ठेवली आहे. त्याच्या बुडास छिद्र पाडून त्या ठिकाणी ठिबकचा पाइप कॉकच्या साह्याने जोडला आहे. हा पाइप विहिरीतील मोटार पंपाला ज्या ठिकाणी ‘फुटबॉल’ चा लोखंडी बेंड असतो तेथे जोडला आहे. या यंत्रणेच्या मदतीने टाकीतील विद्राव्य खते ठिबक यंत्रणेच्या मदतीने प्रत्येक झाडापर्यंत पोचवता येतात.

वाढ नियंत्रकाचा वापर

पूर्वी डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहोर यायचा. मार्च अखेरीस किंवा एप्रिलमध्ये आंबा काढणीला यायचा. सन २०२२ मध्ये बागेत पॅक्लोब्युट्राझोल वाढ नियंत्रकाचा वापर १५ जूनच्या आसपास केला. त्यातून नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच बाग चांगली मोहरली. यंदा (२०२३-२४) तीन टप्प्यांत त्याचा वापर केला आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, तो १५ मार्चपर्यंत चालेल. पुढील टप्प्यांमधील आंबा मेपर्यंत चालेल असे नियोजन आहे.

Kesar Mango
Kesar Mango : ...तर नोव्हेंबरशेवटी केसर आंब्याला चांगला मोहर शक्य

फ्रूट कव्हरचा वापर

दोन ते तीन वर्षांपासून फळ संरक्षणासाठी फ्रूट कव्हर बॅगेचा वापर सुरू केला आहे. प्रति बॅग गुणवत्तेनुसार १ रुपया ३५ पैशांपासून २ रुपये ३५ पैशांपर्यंत त्याची किंमत आहे. आंबा १०० ग्रॅम वजनाच्या आसपास झाला की किंवा फळ लागल्यापासून ४५ ते ५० दिवसांनी बॅग लावण्यास सुरुवात होते. मराठवाड्यात उन्हाळ्यात ४२ अंशांच्या पुढे तापमान जाते. अशावेळी या बॅग तंत्रामुळे फळांना ‘सन बर्निंग’चा धोका टळला आहे. रसशोषक किडीपासून फळांचे संरक्षण झाले आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रासायनिक उपाय प्रभावी नसलेल्या फळमाशीवरही नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. फवारणी व त्यासाठीच्या मजुरीवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो आहे. या बॅगेला पांढऱ्या व काळ्या अशा दोन रंगांचे स्तर आहेत. त्यातून आत पाणीही जात नाही. तसेच फळाचा चांगला रंग विकसित होण्यासही मदत होते. या सर्व बाबींमधून आंबा गुणवत्तेचा मिळत असल्याने ग्राहकांचे समाधान होत असल्याचे शिंदे सांगतात. दरवर्षी सुमारे ५० ते ६५ हजारांपर्यंत बॅग्जची गरज भासते. त्यासाठी मजुरीही प्रति बॅग एक रुपया वा त्याहून अधिक असते. मात्र फळांची मिळणारी गुणवत्ता व दर पाहता हा खर्च भरून निघतो. ही बॅग दोन वर्षांच्या हंगामांसाठी उपयोगी ठरते.

व्यवस्थापन तंत्रातील ठळक बाबी

आंबा, चिंच बागेच्या संररक्षणासाठी १८ श्‍वान पाळले आहेत. यात जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन व गावरान जातींचा समावेश.

बागेच्या देखरेखीसाठी आठ सौरऊर्जेवरील सीसीटीव्ही कॅमेरे.

दोन पुरुष व एक महिला कायम शेतावर कार्यरत. गरजेनुसार मजुरांची मदत.

चिंचेचे प्रति झाड साडेतीन ते साडेसात क्विंटल उत्पादन.

चिंच फोडून व न फोडता अशी थेट व ‘ऑनलाइन’देखील विक्री

फोडलेल्या चिंचेला ६० ते १२० रुपये, तर ‘ऑनलाइन’ विक्रीचा २२० रुपये प्रति किलो दर.

सुमारे २० वर्षे वयाच्या प्रति आंबा झाडाचे ५ ते ७ क्विंटल उत्पादन. यंदा कमाल ४०० रुपये प्रति किलो दरापर्यंत विक्री.

प्रतवारीतून थेट ग्राहकांना विक्री

शिंदे व्हॉट्स ॲप, फेसबुक आणि अन्य ‘सोशल मीडिया’द्वारे थेट ग्राहकांना आंबा विक्री करतात. यात आई श्रीमती शोभा, पत्नी डॉ. सुषमा, मुलगी डॉ. शौर्य मुलगा श्‍वास, भाऊ शाहू, पुणे येथील बहीण डॉ. वृषाली कृष्णा पांड्या या कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत होते. २३० ते २६० ग्रॅमची फळे ए ग्रेड, २०० ते २३० ग्रॅमची फळे बी ग्रेड, तर त्याहून कमी वजनाची फळे सी ग्रेड अशा प्रतवारी होते. छत्रपती संभाजीनगर भागात १७००, तर मुंबई, आग्रा, दिल्ली कोलकाता आदी ठिकाणचे तीनशे असे मिळून सुमारे दोन हजार हजार ग्राहकांचे नेटवर्क शिंदे यांनी उभारले आहे.

‘ॲग्रोवन’ बनला मार्गदर्शक

पाणी व्यवस्थापन व कीड-रोग नियंत्रण करण्यासाठी ‘ॲग्रोवन’ आपला सदैव मार्गदर्शक असल्याचे शिंदे सांगतात. आंबा खत व्यवस्थापन व मोहर संरक्षणासाठी ॲग्रोवनमधील लेखांची त्यांना विशेष मदत होते. या लेखांचे ‘लॅमिनेशन’ करून त्यांनी हे फलक विहिरी जवळील झाडाला लावले आहेत. यापूर्वी शिंदे यांची आंबा बागेतील एक यशकथा ॲग्रोवनला प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या बागेला सातत्याने शेतकरी भेट देत मार्गदर्शन घेत असतात.

उन्मेष शिंदे ९८२२०८७३७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com